मध्ययुगीन भारतीय भक्ती संप्रदायातील मानवतावादी विचाराचे वैश्विक अस्तित्व
मध्ययुगीन भारतीय भक्ती संप्रदायातील मानवतावादी विचाराचे वैश्विक अस्तित्व
हाजी नदाफ
प्रस्तावना:
भक्ती आणि सूफी
चळवळी या दोन वेगळ्या धार्मिक आणि सांस्कृतिक चळवळी होत्या ज्या मध्ययुगीन काळात
भारतीय उपखंडात उदयास आल्या. या दोन्ही चळवळी वेगवेगळ्या शतकात वेगवेगळ्या
प्रदेशात उदयास आल्या, परंतु त्यांच्यात काही साम्य आहे. मध्ययुगीन
काळात, हिंदू आणि मुस्लिम दोन्ही धर्मांमध्ये सुधारणा
झाल्या. दोन्ही चळवळींनी परंपरा सनातनी ब्राह्मणवादी हिंदू आणि इस्लामिक श्रद्धाना
आव्हान दिले. प्रेम, करुणा, भक्ती आणि
देवाशी थेट संबंध यांचे महत्त्व अधोरेखित केले. दोन्ही चळवळींचा भारतीय समाजावर
खोलवर परिणाम झाला. धार्मिक श्रद्धा व पद्धती तसेच सामाजिक व सांस्कृतिक नियमांवर
त्यांचा प्रभाव पडला. सूफी चळवळ इस्लामिक गूढवाद व अल्लाहच्या उपासनेभोवती
केंद्रित होती, तर भक्ती चळवळ हिंदू देवतांवर उपासना
करण्यावर केंद्रित होती. दोन्ही चळवळींमध्ये वैयक्तिक अनुभवावर भर देण्यात आला. या
दोन्ही चळवळींनी अखेर मानवतावादी विचाराचा प्रसार केला. दोघांनीही त्यांच्या काळात
व प्रदेशात धार्मिक सहिष्णुता, मानवाचे एकता व अध्यात्माला
प्रोत्साहन दिले.
प्राचीन काळात
भक्ती चळवळ आठव्या शतकात सुरू झाली असली तरी, 'भक्ती'
चा उल्लेख पहिल्यांदाच इ.स.पूर्व पहिल्या सहस्राब्दीमध्ये उपनिषद
श्वेताश्वतर, उपनिषद कथा आणि गीता भागवत मध्ये करण्यात आला.
भक्ती म्हणजे मानवी देवावरील आध्यात्मिक प्रेम. भक्ती मार्ग (भक्तीचा मार्ग) हा
आध्यात्मिक विकासाचा प्राथमिक उद्देश आहे, जो पृथ्वीवरील मानवी
जीवनाच्या पलीकडे असलेल्या आनंदाची शाश्वत अवस्था आहे. भागवद्गीतेमध्ये भक्ती हा
शब्द मोक्ष प्राप्त करण्याच्या विशिष्ट साधनाचा अर्थ दर्शवण्यासाठी वापरला जातो.
तसेच प्राचीन धर्मग्रंथांमध्येही "भक्ती" हा संस्कृत शब्द "भक्त
आणि मानवी देवता किंवा प्रतीकात्मक देवता यांचे समर्पण" असा उल्लेख केला जात
असे. भक्ती चळवळीत बहुतेक भक्ती कवींनी राम व कृष्ण यांच्या प्रेमळ भक्तीमध्ये
विष्णूच्या अवतारांचे गायन गायले आहे. या चळवळीतील संतांचे कार्य क्रांतीकारी बनले,
याचे कारण तिने केवळ महान तत्वज्ञान निर्माण केली नाहीत तर समाजातील परंपरा, प्रथा, जातीभेद व असमानतेविरुद्ध बंडाची सुरुवात देखील केली. कबीर, रवी दास, मीराबाई, चैतन्य
इत्यादीद्वारे भक्ती चळवळ संपूर्ण भारतात पसरली. ज्या वेळी भक्ती चळवळ वाढत होती
आणि पसरत होती त्याच वेळी १३ व्या ते १९ व्या शतकापर्यंत भारतात इस्लामी सत्ता
अस्तित्वात होती. त्यांनी भारतातील बहुदेववाद, मूर्तिपूजा व
अतिरेकी प्रथांचा निषेध केला. वेदांत सिद्धांत आणि हिंदू धर्माच्या दोन शाखा
म्हणजे बौद्ध व जैन धर्माचा सखोल अभ्यास करणाऱ्या मुस्लिम तत्वज्ञानींवर झालेला परिणाम
म्हणजे सूफी क्रांती होय. जेव्हा दोन धर्मांमधील वैर वाढला आणि द्वेष व शत्रुत्व
वाढले तेंव्हा या सुफी विचारवंतांनी दोन्ही समुदायातील दरी कमी करण्यासाठी
दोघांमध्ये स्नेह, मैत्री व बंधुत्वाची भावना स्थापित करण्यासाठी पुढे आले.१ भारतीय समाजात प्रचलित असलेल्या कर्मकांडांना
सूफी संतांनी विरोध केला आणि तो हिंदूंशी दयाळूपणे प्रेमाने वागला. त्यामुळे येथील
लोकांचा सूफींबद्दलचा आदर वाढला आणि त्यांनी सूफींच्या दर्ग्यांवर आदराने फुले
अर्पण करण्यास सुरुवात केली. यामुळे हिंदू मुस्लिमांमध्ये धार्मिक भेदभाव आणि
अस्पृश्यता दूर होऊन समता व बंधुत्वाची भावना वावाढीस लागली.२ या काळात
अनेक संतांनी समाजातील विषमता व रूढीवादी विचारधारेवर तीव्र टीका केल्याने मानवतेचा
संदेश दिला सर्वदूर पोहचला. म्हणूनच आजही भारतीय भक्ती चळवळीतील संतांचे सम्यक आणि
मानवतावादी विचार वैश्विक पातळीवर टिकून राहिले आहे. अशा मानवतावादी भक्ती परंपरेवर
प्रकाश टाकण्याच्या हेतूने प्रस्तुत शोधनिबंचा विषय निवडीला आहे.
मध्ययुगीन भारतातील सम्यक आणि मानवतावादी विचारांचे
प्रमुख पैलू:
भक्ती चळवळ:
भारतात भक्ती चळवळीची
सुरुवात दक्षिण भारतात ८ व्या शतकात झाली. १५ व्या शतकापासून ती उत्तर व पूर्व
भारतापर्यंत पसरली आणि १७ व्या शतकापर्यंत ती संपूर्ण भारतभर पोहोचली. १७ व्या
शतकानंतर ही परंपरा आता दिसून येत नसली तरी, भक्ती
परंपरा अजूनही भारतीय साहित्याचा एक भाग आहे. भक्ती चळवळ आणि मानवतावादी विचार
यांचा जवळचा संबंध आहे. भक्ती चळवळीने जात, धर्म, लिंग यांमधील भेदभावांना विरोध करत मानवतावादी विचारांना प्रोत्साहन दिले.
भक्ती चळवळ ही कठोर जातीव्यवस्थेला, ब्राह्मणांच्या
वर्चस्वाला, भक्तीच्या प्रत्येक पायरीवर हिंदूच्या
जीवनचक्रातील इतर घटना नियंत्रित करणाऱ्या कर्मकांडांना विरोध करणारी होती. तसेच विशेषतः
इस्लाममध्ये प्रचलित असलेल्या व कोणत्याही मध्यस्थाशिवाय देवापर्यंत पोहोचण्याची
गरज म्हणून ही चळवळ कदाचित एकेश्वरवादाने प्रभावित झाली असावी. अनेक भक्ती संत
जातीच्या पदानुक्रमातील खालच्या वर्गातून आले होते. त्यांनी कोणत्याही
गुंतागुंतीच्या विधींद्वारे देवाला शरण न जाण्याबद्दल लिहिले व आपल्या गायनातून
उपदेश केला. दक्षिण भारतात तिरुप्पण अल्वर
व नंदनार हे अस्पृश्यांच्यातील भक्तीसाठी प्रतिनिधीत्व केला होता. हेच कार्य महाराष्ट्रात
चोखामेळा व उत्तर भारतात रायदास यांनी
केले होते.३
तत्कालीन कन्नड
प्रदेशातील १२ व्या शतकात बसवण्णा (११०५-६८) यांनी भक्ती चळवळ सुरूकरून स्थानिक समाजाची जडणघडण समृद्ध केली. या
प्रदेशातील वीरशैव चळवळीने समृद्ध साहित्य निर्माण केले, जे स्वतः बसव व त्यांच्या
शिष्यांनी (अक्कमहादेवी, अल्लामा प्रभू, देवरा दासीमय्या आणि इतर) रचलेले वचन साहित्य म्हणून ओळखले जाऊ लागले. बसवण्णा
यांनी सामाजिक सुधारणांचे कार्यक्रम सुरू करून मंदिरातील पूजा व लिंगभेदाविरुद्धचा
संदेश सामान्य लोकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी समाजात एक नवीन
विचारसरणी सुरू केली होती, जी आधुनिक काळातही टिकून आहे. म्हणून ते कर्नाटकात आजही
एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणून प्रचलित आहेत. बसवण्णांनी यांनी “लोकशाही संसद म्हणजेच ‘अनुभव
मंटपाची’ स्थापना केली. या अनुभव मंटपात सर्व धर्मातील लोक एकत्र येऊन सामाजिक अडचणींवर
कशी मात करावी यावर चर्चा करत असत. बसवण्णांनी समाजातील रूढीपरंपरा, वाईट चालीरीती यांना विरोध करून समाजाच्या हितकारक गोष्टींची अंमलबजावणी
करणारी नवीन यंत्रणा तयार केली.
महात्मा बसवेश्वरांनी अनेक संदेश दिले पण त्यांनी दिलेला कदाचित सर्वात एकमेव
सुंदर संदेश म्हणजे, "कायकवे
कैलास" शाब्दिक अर्थ: कर्म हेच ईश्वर प्राप्ती आहे. अर्थान्वय: कर्म
हाच ईश्वर, श्रम हाच ईश्वर किंवा काम हेच मोक्षाचा मार्ग आहे असे त्यांनी सांगितले.
भक्ती चळवळीची
सुरुवात १३ व्या शतकाच्या उत्तरार्धात महाराष्ट्रातही झाली आणि तिचे समर्थक वारकरी
म्हणून ओळखले जात होते. ज्ञानदेव (१२७५-९६), नामदेव,
सावता माळी, चोखोबा व तुकाराम (१६०८-५०) असे काही लोकप्रिय व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी
मानवतावादी विचार लोकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी
ग्रंथाच्या शेवटी विश्वात्मक देवाजवळ पसायदान मागितले आहे त्यात ते म्हणतात,
“आता
विश्वात्मके देवें| येणे वागयज्ञे तोषावे|
तोषोनि
मज द्यावे| पसायदान हे ||१||
जे
खळांची व्यंकटी सांडो| तया सत्कर्मी रति वाढो|
भूतां
परस्परे पडो| मैत्री जीवांचे|
दुरितांचे
तिमिर जावो| विश्व स्वधर्म सूर्य पाहो|
जो
जे वांछील तो ते लाहो| प्राणिजात||”
या पसायदानात
ज्ञानेश्वरांनी विश्वकल्याणाच्या भावनेने विश्वात्मक देवाजवळ जे मागणे सांगितले
आहे ते मानवतावादी होते; तर प्राणिमात्रांच्या सुखाचे, कल्याणाचे मागणे त्यांनी मागितले.
या विचारात त्यांचे विश्वात्मक मोठेपण सामावलेले दिसते.४
‘‘भक्ती
केली हीन याती । नाही वाढली महती ।
जरी
असता ब्राम्हण जन्म । तरी हे अंगी लागते कर्म ।
स्नान
नाही संध्या नाही । यातिकूळ संबंध नाही ।
सावता
म्हणे हीन याती । कृपा करावी श्रीपती ।।’’
सोवळ्या-ओवळ्याचे
पाश तोडणाऱ्या सावताच्या मनाच्या मोठेपणाचे लक्षण या वरील अभंगातून जाणवते.
हे उदाहरण म्हणजे तत्कालीन
सामाजिक, धार्मिक स्थितीतील विषमतेचे बोलके
उदाहरण आहे.५
१३ व्या शतकात
महाराष्ट्रात वर्णव्यवस्था कठोर होती. जातिभेद पाळला जाई. वर्ण व धर्मानुसार
कामाची विभागणी केली जाई. त्यामुळे चोखोबांना अस्पृश्यत्वाची सर्व कामे करावी
लागत. चोखोबा अस्पृश्य असल्याने त्यांच्या हातचे पाणीही कोणाला चालत नसे. एवढेच
काय त्यांच्या सावलीचाही विटाळ मानला जात होता. आपल्याला मिळणाऱ्या अशा वागणुकीबद्दलची खंत चोखोबांच्या अनेक
अभंगांतून व्यक्त झाली आहे. दलितांवर होणाऱ्या
सामाजिक अन्यायाची बोच व्यक्त करताना चोखामेळा म्हणतात,
‘‘कोण तो सोवळा ।
कोण तो ओवळा ।
दोन्हीच्या वेगळा
विठू माझा ।’’
चोखामेळा अशा
आध्यात्मिक उंचीवर जातात. तर, ‘‘उस डोंगा
परि रस नोहे डोंगा । काय भुललासी वरलिया रंगा ।’’ अशा परखड
शब्दांत समाजनिर्मिती खोट्या जातिव्यवस्थेचा दंभस्फोट करतात; आणि समाजाला डोळस बनविण्याचा प्रयत्न करतात. आपल्या कवितेतून सामाजिक
वेदना व्यक्त करणारे चोखोबा हे मराठीतील पहिले कवी आहेत.
संत तुकाराम महाराजांनी कीर्तनाच्या माध्यमातून
जनसामान्यांचे प्रबोधन केले. त्यांनी लोकांना अन्यायाविरुद्ध लढण्याची हिम्मत दिली. अज्ञान, अंधश्रद्धा, कर्मकांड,
विषमता याविरुद्ध त्यांनी आवाज उठविला. वर्ण, धर्म व जातीय अस्मिता अधिकाधिक तीव्र होत
असताना संत तुकारामांनी तत्त्कालिन समाजस्थितीत घेतलेली समभावाची भूमिका
महत्त्वाची आहे.
'अधिकार-जात, वर्ण-धर्म-जात|
ठाव नाही सत्य-असत्याशी ||'
ही
भूमिका घेतलेले तुकाराम 'यारे यारे लहान थोर | याती
भलते नारी नर||' अशी साद घालून सामाजिक एकोपा निर्माण करतात. प्रत्येक
समाजात त्या त्या समाजातील अज्ञानी लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन समाजशोषक
बुवाबाबा तयार होतात. तुकारामांच्या काळातही असे अनेक भोंदू साधू आणि स्वतःला
सदगुरु म्हणून मिरविणारे ढोंगी, मतलबी आणि भोगलोलुप लोक होते.
परंतु तुकारामांनी अशा मतलबी गुरुमहाराजांचा मुलाहिजा कधीच ठेवला नाही उलट 'ऐसे कैसे झाले भोंदू | कर्म करोनी म्हणती साधू ||'
अशी कठोर शब्दात त्यांची फजितीच केली. ६
उत्तर भारतात १३
व्या ते १७ व्या शतकापर्यंत संत कवींच्या संख्येत वाढ झाली. त्यांनी अवधी,
भोजपुरी, पंजाबी, मैथिली
व इतर अनेक भाषांमध्ये साहित्याचा एक मोठा वारसा निर्माण केला आहे. उत्तर भारतातील
संत कबीर हे १३ व्या व १४ व्या शतकातील एक प्रसिद्ध गायक-गीतकार-समीक्षक होते. कबीरांनी
एकेश्वरवादाचा उपदेश केला; जो गरिबांना थेट आकर्षित करत असे. त्यांनी गरिबांना मध्यस्थाशिवाय
देवापर्यंत पोहोचण्याची खात्री दिली. त्यांनी हिंदू व इस्लाम धर्मातील पोकळ
धार्मिक विधी नाकारले व ढोंगीपनाचा निषेध केला. कबीर यांचे मानवतावादी विचार आजही
प्रासंगिक आहेत व ते आपल्या समाजाला चांगले बनवण्यासाठी प्रेरणा देतात. त्यांच्या
विचारांमधून आपण जाती, धर्म व लिंगाच्या आधारावर होणारा
भेदभाव कसा संपवायचा व समाज कसा निर्माण करायचा की जिथे सर्व लोक प्रेम, शांती व सौहार्दाने राहू शकतील हे शिकू शकतो. पवित्र समर्पणाचा मार्ग
स्थापित करण्यासाठी कबीरने प्रथम संपूर्ण विश्व जोडण्याची घोषणा केली. हिंदू व
मुस्लिमांमध्ये एक उंच भिंत उभी आहे. ही भिंत तोडण्यासाठी समानतेच्या प्रवाहात येऊ
देण्याचा उत्साह ते निर्भयपणे निर्माण केले. इतके निर्भय व्यक्तिमत्व त्यांच्या पुढील
दोह्यातून दिसते,
दुनिया
कैसी बावरी पत्थर पुजन जाय।
घर
की चकिया कोउन पुजे, जिसका पीसा खाII
यात त्यांनी सांगितले आहे की साधूंच्या किंवा संतांच्या जातीची
चौकशी न करता, त्यांच्या
ज्ञानाचे मूल्यांकन केले पाहिजे. त्यांच्या मते, मानवतेचे
आणि आध्यात्मिक ज्ञानाचे महत्त्व जात, वर्ण, किंवा धर्माच्या भिंतींपेक्षा खूप मोठे आहे.
“जाति न पूछो साधु की,
पूछ लीजिये ज्ञान।
मोल करो तलवार का, पड़ा रहन दो म्यान॥”
कबिरांचा जातपात, कुलाभिमान, धर्मभेद, रूढी, व्रतवैकल्ये, कर्मकांड
इत्यादींवर त्याचा काडीमात्र विश्वास नव्हता. हिंदू अगर इस्लामी धर्ममार्तंडांच्या
दोषांवर, विसंगतींवर व चारित्र्यहीनतेवर त्याने कडाडून हल्ले
केले आहेत. त्याच्या काव्यातील दृष्टांतांतून, प्रतीकांतून,
युक्तिवादांतून व प्रामाणिक अनुभूतींतून त्याच्या असामान्य
प्रतिभेची साक्ष पटते. तत्कालीन समाजाबाबतचे त्याचे निरीक्षण सूक्ष्म असून,
त्याच्या निर्भय, साहसी आणि कलंदर
व्यक्तिमत्त्वाचे विलोभनीय दर्शन त्याच्या काव्यरचनेतून घडते. कबीराने तत्कालीन
धार्मिक मतभेदांची तीव्रता कमी करून वैष्णव आचार्यांचा भक्तिमार्ग सामान्य
जनतेपर्यंत आणून पोहोचविला. बाह्य कर्मकांडात रुतून बसलेली धर्माची मूळ मानवतावादी
तत्त्वे शोधण्याचा व त्यांचा पुरस्कार करण्याचा त्याने यशस्वी प्रयत्न केला.
अद्वैती, सूफी, योगमार्गी, भक्तिमार्गी या सर्वांनाच आपलासा वाटावा असा भक्तिमार्ग रूढ करण्याचा
त्याने प्रयत्न केला. त्यामुळे अनेक हिंदू-मुस्लीम कबीर पंथाचे अनुयायी बनले. ७
वाराणसीतील चांभार
कुटुंबात जन्मलेले रवी दास (१४५०-१५२०) यांनीही जातविरहित समाजाची गरज व्यक्त केली.
परंतु अस्पृश्य जातीचे असल्याने त्यांना इतर जातिकडून बाण व गोफणाचा मारा सहन
करावे लागले. तसेच राजस्थानातील मीराबाई (१४९८-१५४६) यांनी कृष्णाच्या स्तुतीमध्ये
भक्तीगीते रचली व गायली. भक्ती संतांमध्ये ती एकमेव प्रसिद्ध महिला आहे. राजपूत
राजघराण्यात जन्मलेल्या व लग्न झालेल्या मीराची कृष्णाप्रती असलेली भक्ती खूपच जड
होती. ज्यात ती कृष्णाला तिचा प्रियकर मानत असे. त्याकाळातील हे एक बंडखोर कृत्य
आहे. तसेच तीने पितृसत्ताक पद्धतीचेही
उल्लंघन केला.
भक्ती चळवळीने अस्पृश्य,
दलित व वंचीतांना लोकांच्यात सुधारणा घडवून स्थानिक संत साहित्याच्या वाढीला चालना
दिली. सर्वच संत आध्यात्मिक समाजसुधारक तसेच कार्यकर्ते राहिले; त्यामुळे आजही लोकांच्या
विचारांवर प्रभाव टाकत आहे. तसेच समुदायासोबत काम करणारा व असमानता नष्ट करणारा,
कोणत्याही प्रकारच्या भेदभावाला संबोधित न करणारा प्रत्येक सामाजिक
कार्यकर्ता भक्ती चळवळीची भावना पुढे नेत आहे.
सूफी संप्रदाय:
सूफीवादाची सुरुवात
पर्शियामध्ये झाली. येथील झोरोस्ट्रियन द्वैतवादाचा सूफीवादावर बराच प्रभाव पडला होता.
देव सर्वशक्तिमान असला तरी चांगले व वाईट अशी दोन्ही शक्ती अस्तित्वात आहे हे सुफी
गूढवाद्यांनी स्वीकारले होते. इस्लाममधील गूढ चळवळीची स्वतःची काही विशिष्ट
वैशिष्ट्ये आहेत. यातील एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी लोकांमध्ये सामुदायिक भावना
निर्माण करण्यासाठी व लोकांच्या नैतिक, आध्यात्मिक संस्कृतीच्या निर्मितीसाठी खानकाहांची
मोठ्या प्रमाणात स्थापन केले. त्याच्या माध्यमातून सुफी तत्वज्ञान लोकांपर्यंत
पोहचला सुरुवात झाली. आणि तेराव्या शतकापर्यंत मुस्लिम गूढ विचारसरणी पूर्णपणे
विकसित झाली. निजामीच्या मते, "इमाम
कुशैरी (१०७४), इमाम गज्जाली (११११), शेख
शिहाब अल-दीन सुहरावर्दल (१२३४), शेख मुहिउल-दीन इब्न 'अरबी (१२४०) व शेख जलाल अल-दीन रुमी (१२७३) यांसारख्या प्रख्यात गूढ
तत्वज्ञानी आणि विचारवंतांनी गूढ विचारांना एका सुसंगत विषयात व तत्वज्ञानात
एकत्रित केले होते. सुफी तत्वज्ञानाच्या विकासासाठी आता एकमेव संधी उपयोजनाच्या
क्षेत्रात होती. याच्या माध्यमातून अमूर्त गूढ तत्वे समाजाच्या ठोस परिस्थितीत
लागू करायची होती.” बगदादच्या पतनानंतर मुस्लिम राजकीय सत्ता सर्वात निम्न स्थरावर
पोहचली होती. त्यामुळे अनुशासनहीनता
सर्वोच्च पातळीवर रूढ होती. अशा काळात सूफींनी विश्वाचे आध्यात्मिक प्रदेश हाती
घेतले. त्यांनी पुढे मुस्लिमांच्या आध्यात्मिक जीवनाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी
निघाले. परिस्थितीला तोंड देण्यासाठी आध्यात्मिक व्यवस्था किंवा सिलसिला
प्रभावीपणे आयोजित करण्यास सुरु करू लागले. त्याचबरोबर खानकाह जे सुरुवातीपासून
गूढ शिस्तीचा अविभाज्य भाग बनले होते, त्यांची स्थापना इतर ठिकाणीही व्यापक
प्रमाणात करण्यात आली. भारतात मुस्लिम गूढवाद त्याच्या उत्कर्षाच्या शेवटच्या टप्प्यात
पोहोचला यामध्ये सिलसिलाहांच्या संघटनांची महत्वाची भूमिका होती. या
सिलसिलाहांच्यात भारतातील चिश्तिया व सुहरावर्दिया हे दोन गूढ पंथांचा समावेश होतो.
चिश्ती पंथ हा
भारतातील सर्वात जुना व प्रसिद्ध पंथ आहे. त्यांची आध्यात्मिक केंद्रे भारत,
पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये पसरलेली आहेत. या पंथाचा पाया
अफगाणिस्तानातील 'चिश्त' नावाच्या
शहरात घातला गेला. ख्वाजा अबू इशाक सामी चिश्ती (मृत्यू इ.स. ९४०) या पंथाचे
संस्थापक मानले जातात. या पंथातील सुफी संत ख्वाजा मुईनुद्दीन चिश्ती सन ११९२
मध्ये मुहम्मद घोरीसोबत भारतात आले. त्यांनी येथे 'चिष्टीय
परंपरा' स्थापन केली. त्यांच्या कार्याचे मुख्य केंद्र अजमेर
होते. बाबा फरीद, बख्तियार काकी, शेख बुरहानुद्दीन गरीब प्रमुख
चिश्तिया पंथातील सूफी संत होते. ख्वाजा बख्तियार काकी हे इल्तुतमिशचे समकालीन
होते. त्याने फरीदला आपला उत्तराधिकारी म्हणून घोषित केले. बाबा फरीद यांना सर्सामान्य
वर्गातील लोकांबद्दल अधिक प्रेम होते. त्यांचे दोन महत्त्वाचे शिष्य हजरत
निजामुद्दीन औलिया व हजरत अलाउद्दीन साबीर होते. चिश्तिया पंथाबारोबारच भारतात सुरवार्दी,
नक्षबंदी, कादिरी व फिरदोशी पंथ ही अस्तित्वात होते. यांनी भारतात सुफी
संप्रदायाचा प्रचार व प्रसार केला. आणि भारतातील सर्व जाती धर्मातील लोकांना समावेश
करून विश्वबंधुत्व व मानवतावादी विचार भारतभर पोहचविण्याचा प्रयत्न केला. ८
या पंथांच्या
खानक्यांमध्ये गुरु किंवा मालफुजतांशी झालेल्या संभाषणांचे संकलन सुरू झाले. ज्यामुळे
हळूहळू गूढ साहित्याचा विकास झाला.
बहुतेकदा या साहित्यामध्ये मध्ययुगीन समाज, सामान्य लोकांची सामाजिक
परिस्थिती, आर्थिक अडचणी व धार्मिक श्रद्धा यावर
प्रतिबिंबित केले गेले. महत्वाची गोष्ट म्हणजे, यापैकी
बहुतेक खानकाह हे शहरे किंवा खेड्यांमधील वस्त्याबाहेर सर्वात खालच्या स्तरातील सामान्य
लोकांसाठी स्थापन करण्यात आले. त्यामुळे अनेक हिंदू समाजातील लोक यांच्याकडे
आकर्षित झाले. कारण खानकाहमुळे सर्वसामान्य लोकांना समान जग मिळाले. सर्व जाती व
धर्माच्या लोकांना आकर्षित केल्याने एका सामान्य भाषेची गरज निर्माण झाली. त्याचबरोबर
तुर्क आणि तुर्केतर यांच्यात व हिंदू धर्मातील उच्च जातीचा इतर जातीशी भेदभाव होत
असताना खानकासमध्ये सूफी संतानी सर्वसामन्यांना उपदेश केले. सूफी संतांचे विचार हे
मानवी प्रेम आणि समानतेचे प्रतीक होते. त्यांच्या सर्व अनुयायांनी त्यांचावर
राजकीय प्रभाव न घेता हिंदू धर्मातील सर्व वर्ग, जातिना समानतेची वागणूक दिली. तसेच
भक्ती संतांप्रमाणेच सूफी संतांनीही रूढीवादाला आव्हान दिले व उलेमांच्या भूमिकेचा
निषेध केला.
सुफी साहित्यात
दोह्यांचा समावेश असल्याने त्यांनी साध्या
कथांद्वारे दैनंदिन जीवनात देवाचे सार सर्व स्तरातील लोकांना समजावून सांगितले.
भक्ताकडून धर्मशास्त्रज्ञांचे सैद्धांतिक ज्ञान किंवा सूफींच्या गूढ ज्ञानातील
बारकावे आत्मसात करण्याची अपेक्षा केली जात नव्हती. तर भक्ताला केवळ देवाच्या
एकतेत आणि वैभवात सांत्वन मिळावे अशी अपेक्षा होती. मुघल काळात सूफीवादाला चालना
मिळाली आणि अनेक मुघल सम्राट सूफी संतांचे अनुयायी बनले. मुघल काळातही मोठ्याप्रमाणात
सूफी साहित्याचा विस्तार झाला. सतराव्या शतकाच्या उत्तरार्धात आणि अठराव्या
शतकाच्या सुरुवातीपर्यंत स्थानिक भाषेत हे साहित्य लिहिणे पंजाबपासून बंगालपर्यंत सुरु
होते हे आपण पाहू शकतो. त्यातील एक महत्त्वाचा भाग सूफींनी लिहिलेल्या साहित्याचे भारतीय
भाषांच्या विकासात महत्वाची भूमिका बजावलेली दिसून येते. आजही अनेक मुस्लिम तीर्थक्षेत्रे
अस्तित्वात आहेत आणि शतकानुशतके चालत आलेली परंपरा चालवत आहेत. वेगवेगळ्या धर्माचे
भाविक दर्ग्यांमध्ये गर्दी करतात, ज्यांची
सुरुवात खानक्यांमधून होते. असे म्हणता येईल सुफी संतांनी आपल्या शिकवणी आणि
कार्यांद्वारे समाजात मानवतावादी मूल्यांचा प्रसार केला. त्यांनी विविध धर्मांमधील
लोकांमध्ये सलोखा आणि सौहार्द निर्माण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी
गरजूंना मदत करून आणि सामाजिक सेवा करून मानवतावादी कार्यांमध्ये मोठे योगदान
दिले. त्यांनी आपल्या कविता व संगीताद्वारे प्रेम, करुणा आणि
मानवतेचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवला.
मध्ययुगीन भारतीय
संतांच्या शिकवणीतील मानवी मूल्ये:
·
कबीर आणि गुरु नानक
यांसारख्या मध्ययुगीन संतांनी जागतिक बंधुत्वाच्या कल्पनेचा पुरस्कार केला.
त्यांनी जातीभेद नाकारले आणि सर्व व्यक्तींमध्ये समानतेचा प्रचार केला,
सर्व मानव एकाच दिव्य शक्तीने निर्माण झाले आहेत यावर भर दिला.
उदाहरणार्थ, खरी अध्यात्मिकता म्हणजे इतरांचे दुःख समजून
घेणे, असा कबीरांचा दावा या मानवी दृष्टिकोनावर प्रकाश
टाकतो.
·
संत सामाजिक विषमता
आणि अन्यायाचे मुखर टीकाकार होते. त्यांनी करुणा, प्रेम
आणि मानवतेची सेवा यांसारख्या मूल्यांचा प्रचार करून त्यांच्या काळातील प्रचलित
नियमांना आव्हान दिले. त्यांच्या कवितांमध्ये अनेकदा उपेक्षित आणि दलितांबद्दलची
खोल चिंता दिसून येते, समाजाला हे मतभेद दूर करण्याचे आवाहन
केले जाते. तुकाराम आणि बसव यांसारख्या संतांच्या शिकवणींनी दलितांचे उत्थान आणि
अधिक न्याय्यिक समाज निर्माण करण्याच्या
महत्त्वावर भर दिला.
·
मध्ययुगीन संतांनी
त्यांचे संदेश केवळ आध्यात्मिक ज्ञानापुरते मर्यादित ठेवले नाहीत;
त्यांनी अध्यात्मिकतेला सामाजिक जबाबदारीशी जोडले.
·
भक्ती आणि सुफी
चळवळींनी हिंदू आणि इस्लाम यांच्यात सांस्कृतिक संश्लेषण सुलभ केले,
स्थानिक भाषांद्वारे सामान्य लोकांसाठी अध्यात्मिकता सुलभ केली. या
समावेशकतेने विविध समुदायांना कठोर धार्मिक संरचनांमुळे निर्माण झालेल्या
अडथळ्यांशिवाय आध्यात्मिक विचारांमध्ये गुंतण्याची परवानगी दिली. संतांनी मानवी
अस्तित्व आणि नैतिकतेबद्दलचे सखोल सत्य संबंधित भाषेत संवाद साधण्यासाठी त्यांच्या
कवितांचा माध्यम म्हणून उपयोग केला.
भक्ती चळवळ आणि
मानवतावादी विचार:
मध्ययुगीन संतांचा
प्रभाव त्यांच्या काळाच्या पलीकडे आहे; त्यांच्या
शिकवणींनी भारतातील आधुनिक मानवतावादी चळवळींना प्रभावित केले आहे. महात्मा
गांधींसारख्या व्यक्तींनी या संतांनी पुरस्कृत केलेल्या वैश्विक मूल्यांमधून
प्रेरणा घेतली. त्यांनी समानता व बंधुत्वाच्या तत्त्वांवर आधारित अहिंसा आणि
सामाजिक सुधारणांचा पुरस्कार केला. भक्ती चळवळीतील संतांनी सर्व माणसे देवाची
लेकरे आहेतअसा विचार मांडला. त्यांनी जातीभेद, उच्च-नीचता
यांसारख्या सामाजिक विषमतांना विरोध केला. यामुळे समाजात समतेची भावना वाढण्यास
मदत झाली. भक्ती चळवळीतील संतांनी ईश्वर प्रेम आणि मानवी प्रेम यांवर भर दिला. त्यांनी
सर्व प्राणिमात्रांवर प्रेम करण्याचा संदेश दिला. यामुळे समाजात सहानुभूती व करुणा
यांसारख्या मानवतावादी मूल्यांचा प्रसार झाला. भक्ती चळवळीतील संतांनी समाजातील
रूढी, प्रथा व परंपरांवर टीका केली. त्यांनी अंधश्रद्धा, कर्मकांड
यांसारख्या गोष्टींना विरोध केला. यामुळे समाजात सुधारणा घडण्यास मदत झाली. भक्ती
चळवळीतील संतांनी मानवतेला सर्वोच्च महत्त्व दिले. त्यांनी सर्व माणसांना समान
वागणूक देण्याचा संदेश दिला. यामुळे समाजात मानवतावादी विचारांचा प्रसार झाला.
सारांश:
मध्ययुगीन भारतीय संतांच्या
मानवतावादी विचारांचा प्रभाव केवळ भारतातच नाही, तर
जगभरात दिसून येतो. या विचारांनी जगातील अनेक सामाजिक आणि धार्मिक चळवळींना
प्रेरणा दिली. आजही हे विचार जगाला शांतता, समता व न्यायाचा
मार्ग दाखवतात. मध्ययुगीन भारतीय
संतांनी समानता, सामाजिक न्याय आणि दैनंदिन
जीवनाशी अध्यात्मिकतेच्या परस्परसंबंधावर भर देणाऱ्या त्यांच्या शिकवणींद्वारे
मानवी मूल्यांच्या जागतिक अस्तित्वात महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांचा वारसा
भारताच्या सांस्कृतिक व तात्विक परिदृश्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. जो आजही विविध
समुदायांमध्ये एकतेची व करुणेची भावना टिकून आहे. सध्यस्थितीत वैश्विक राजकीय अस्थिरता
आणि अस्वस्थतेच्या सामाजिक व राजकीय व्यवस्थेत सुरु असलेल्या अमानवीय विचारला संताचे मानवतावादी विचार सांजीवनी ठरू शकते
संदर्भ सूची:
1.
Shashi Kiran, A Study on
Bhakti and Sufi Movements in Medieval India, RESEARCH
REVIEW International Journal of Multidisciplinary, Volume-04
ISSN: 2455-3085 (Online) Issue-06 June-2019, Page.1748
2.
Pathak Vivek, Impact of
Sufi Movement on Socio-Religious Life During the Medieval Period: Rise and
Spread of Sufism Movement in India, IJFMR230610290
Volume 5, Issue 6, November-December 2023, Page.2
3.
http://www.clearias.com/media/file/Bhaki-Saints-in-India.png
4.
रानडे रा.द. संतवचनामृत, पुणे, १९२६ पृ. ५६
Historicity researcH Journal, Volume - 5 | Issue - 5 | January – 2019 पृ. २, ३.
https://vishwakosh.marathi.gov.in/16686/
International Journal of Education, Modern Management, Applied Science & Social Science (IJEMMASSS) 101 ISSN : 2581-9925,Volume 06, No. 02(II), April - June, 2024,
9.
Sufi Folk Literature and the Expansion of
Indian Islam, Historia Religionum, November, 1974