Saturday, 25 July 2020

मराठेकालीन ग्राम: रचना व जीवन

मराठेकालीन ग्राम: रचना व जीवन  
]
प्रस्तावना: महाराष्ट्राच्या इतिहासात १७ वे शतक हे  क्रांतिकारी शतक म्हणून ओळखले जाते. या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठा राज्याची स्थापना केली. हे मराठ्यांचे राज्य या नावाने प्रसिद्धीस आले. राज्यात अनुक्रमे शिवाजी, संभाजी, राजाराम, ताराबाई यांच्या काळापर्यंत हा कालखंड शिवकाळ म्हणून ओळखला जातो. विश्राम मावजी यांनी त्यांच्या स्वराज्याचा जबता या ग्रंथामध्ये एकूण ३५ सुभ्यांचा उल्लेख करतात. त्याप्रमाणे कारवार, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्याचा पश्चिम भाग, तसेच जिंजी परिसरातील दोन किल्ले व यात पुणे, ठाणे आणि नासिक, कुलाबा, रत्नागिरी जिल्ह्यांचा समावेश होता. सभासद बखरीमध्ये साल्हेरी किल्ल्यापासून गोदावरी नदीपर्यंतचा भूप्रदेश व तुंगभद्रेच्या बाजूने कोल्हापूर ते बाळापूर, कावेरी नदी पर्यंतच्या दुसर्‍या भागाचा उल्लेख आढळतो. महसूल आकारण्यासाठी स्वराज्याचे तीन भाग पडण्यात आले, यामध्ये सुभा, तर्फ, परगणा-कर्यात अशी विभागणी करण्यात आली. प्रत्येक परगणयामध्ये ४० खेडे आणि साधारण प्रत्येक खेड्यात २० ते ४० घरे असत. बहुसंख्य लोक खेड्यात राहत असल्याने खेडे हे स्वयंपूर्ण बनले. खेड्यामध्ये सर्व जाती-जमातीचे लोक समन्वयाने राहत होते. हस्त उद्योग व व्यवसायावर आधारित समाजरचना अस्तीत्वात असल्याने आर्थिक साधन हे खेड्यातूनच उपलब्ध होई. मराठा राज्याच्या प्रशासनात खेड्याची एक स्थानिक घटक म्हणून स्वतंत्र विभागणी करण्यात आलेली असल्याने ग्रामरचना व व्यवस्थेस विशेष महत्व होते. खेड्यातील आर्थिक, सामाजिक, संस्कृतिक व्यवस्था वैशिष्ट्यपूर्ण असल्याने हे ज्ञात व्हावे या हेतूने ग्रामीण व्यवस्थेतील सर्व घटकांवर ओझरतं प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
ग्रामरचना:
 मराठेकालीन मानवी जीवनातील सगळ्या घडामोडी या खेड्यांशी निगडीत होत्या. खेडी स्वयंपूर्ण व सर्व घडामोडीचे केंद्र होते. गाव हे प्रशासकीय, लष्करी, सामाजिक, आर्थिक, आणि सांस्कृतिकदृष्ट्या घडणाऱ्या सर्व गोष्टीचे साक्षीदार म्हणून ओळखले जाते. मराठेकालीन कागदपत्रात ग्राम, दोहे, मौजा, कसबा असा गावांचा उल्लेख आढळतो. जर गावाचा वाढीव भाग असेल तर त्याचा उल्लेख माजरा, वाडी, पाडी व खारी इत्यादी संज्ञांनी करीत असत. मुख्य गावाला बुद्रुकतर गावाला जोडून वस्ती असेल तर त्यास खुर्दम्हणत असत. तसेच वाडी-पाडीअसे कोकणातील गावांसाठी तर समुद्रकिनारी असलेल्या गावांसाठी खारीअसे म्हंटले जाई. देशातील गावांना मजरातर ज्या गावात आठवडी बाजार भरत असे त्यास कसबाम्हणत असत. समुद्रकिनाऱ्यावर ज्या खेड्यात व्यापार होत असे यास मिरेअसे संबोधत असत. कोकण, सह्याद्रि, देशातील भूप्रदेशानुसार गावांची रचना वेगळ्या स्वरुपात पाहावयास मिळते. प्रत्येक गावातील घरांची निर्मिती त्या ठिकाणच्या भौगोलिक परिस्थितीनुसार होत असे. सरकारी अधिकारी व वाणी हे मध्यमवर्गीय लोक दगडी बांधकाम केलेल्या घरात राहत. जमीनदार व अधिकाऱ्यांची घरे चिरेबंदी तर काही ठिकाणी वाड्यांची असत. घरांच्या बांधकामासाठी दगड, मातीच्या विटा, चुना व खापरी कौले यांचा वापर करण्यात येई. श्रीमंत लोकांची घरे साधारणपणे एक ते तीन खोल्यांची, तर गरीबांची घरे पाम झाडाच्या पानांनी विणलेल्या झोपडया असत. कोकणात कौलारू, वाळवलेल्या गवतांची आणि झाडाच्या पानानी किंवा भाताच्या तणीसांनी बनवलेली छपराची घरे होती. त्याचप्रमाणे सामान्य लोकांची घरे वेळूच्या भिंतीने बनलेल्या एक-दोन खोल्यांची मात्र साध्या स्वरुपाचे असत.
ग्रामरचनेतील वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे आळी, बोळ व गल्ली होय. या विभागणीनुसार गावाची संरचना तयार होत असे. ही संरचना लोक वसाहतीची वाढ काशी होत राहते त्या नुसार तयार होत असे. काही गावामध्ये आळीमध्ये प्रवेश करताना प्रवेशद्वार बसविले जात. कारण रात्रीच्या वेळी दुसऱ्या आळीतून माणूस सहजासहजी आत येवू नये, तसेच त्याकाळात मोठे दरोडे पडत असत त्यांना रोखण्यासाठी दरवाजे बसविण्याची पद्धत होती. देशमुख किंवा पाटील यांच्या घराच्या आजूबाजूस अलुतेदार व बलुतेदारांची घरे वसविले जाई, कारण हे लोक दैनंदिन जीवनात सातत्याने गरजेस पडणारे होते. पण बलुतेदारांपैकी महार व मांग यांची घरे बहुदा गावाबाहेर असत. गावातील गल्ल्यांची निर्मिती समाजरचनेनुसार तयार केल्या जात असत. (उदा. पाटील गल्ली, कुंभार गल्ली) प्रत्येक जातीच्या नावाने या गल्ल्यांची ओळख रहात असे. विहीर, तलाव, नदी, ओढा  हे पाणिपूरवठयाचे साधन होते. जी गावे नदीच्या काठावर नाहीत अशा गावांमध्ये विहिरीद्वारे (बावडी) पाण्याची व्यवस्था केली जात असे. या विहिरी आकाराने गोल व साधारण खोलीचे असत. विशेषकरून त्यावेळची परस्थिती ही सामाजिक विशेषीकरणाची असल्याने जातींनुसार या विहिरी पाडण्यात येत असत. सामाजिक विलगिरणाची पद्धत रूढ असल्याने त्या त्या जातीच्या लोकांना त्यांनी राहत असलेल्या ठिकाणीच पाण्याची व्यवस्था काही प्रमाणात करण्यात येई. या प्रत्येक विहिरींना एक विशिष्ठ नाव असे; त्या नावाने विहिरी ओळखल्या जात होत्या. जी गावे नदीकाठावर वसलेले आहेत अशी गावे नदीतून पाणी उपलब्ध होईपर्यंत येथून पाणी वापरत असत. तसेच उन्हाळ्यात नदिपत्रातील पाणी कमी झाल्यास नदीमध्ये खोल खड्डे (गुंड) मारून पाणी उपलब्ध करत तर काही प्रमाणात गावातील विहिरींचा ही वापर करत. 
 दैनंदिन जीवनात नदीघाट हे गावाचे अविभाज्य घटक होते. या घाटावर पिण्याचे पाणी भरणे, कपडे धुणे, जनावरे धुणे, स्नान करणे, लग्न समारंभातील प्रथा, सामाजिक रूढी-परंपरा, प्रत्येक जातीतील सण-उत्सव, पूजा व विधी करणे, रक्षा विसर्जन आदी दैनंदिन गोष्टी नित्य नियमाने चालत असत. त्याचबरोबर वर्षातील प्रत्येक सण, उत्सव, आमवस्या व पौर्णिमेला या घाटाची पूजा केली जाई. त्याचबरोबर ग्रामप्रशासनाचे मुख्य केंद्र म्हणजे गावातील चावडी. चावडी हे विशेषकरून गावाच्या वेशीत बांधण्याची पद्धत होती. ग्रामधिकार्‍याकडून चावडीमध्ये न्यायनिवाडा करणे, गावाच्या विकासाबाबत चर्चा, गावातील गुन्हे व तंटे सोडविणे, परकीय आक्रमण थोपविणे आदी कार्य पाहिले जात होते. येथूनच गावाच्या विकासात्मक कार्याची हालचाल चालत असे. हे एक प्रशासकिय ठिकाण म्हणूनही ओळखले जाई. तसेच ग्रामप्रशासन व अधिकाऱ्यांची जागा म्हणूनही त्यास महत्व होते.
ग्रामव्यवस्थेत गावची वेश मुख्य स्थानी असे. प्रत्येक गावात वेशीच्या प्रवेशद्वारातून व्यावहारीक हालचाली होत असत. गावावर परकीय हल्ला झाल्यास संरक्षण व्हावे या हेतूने काही गावात संरक्षणासाठी गावाभोवती भिंतीबरोबरच अनेक दरवाजे बसविले जात. वेशीच्या आतल्या बाजूस मुख्य रस्त्याच्या बाजूने दुकाने व दैनंदिन बाजार भरत असे. लोकांना लागणाऱ्या दैनंदिन वस्तूंची विक्री हे वेशीच्या आतल्या बाजूस चालत असे. काही प्रमाणात वस्तूंची विक्री करणारे अलुतेदार व बलुतेदार यांनी स्वत:च्या घरातच विक्रीची व्यवस्था करून धान्याच्या मोबदल्यात वस्तू पुरवित असत. त्याचबरोबर बाजार समुहात असणार्‍या दुकानदारांचे घर प्रमुख रस्त्याला लागूनच बांधण्याची पद्धत होती. त्या घरांच्या पुढील बाजूस दुकान व मागील बाजूस दुकानदार स्वतः राहत असे. वस्तुच्या खरेदी-विक्रीत धान्याच्या स्वरुपात वस्तूविनिमय चालत असे. यामध्ये केवळ उपजीविकेच्या साधनांची विक्री मोठ्या प्रमाणात होई. लोकांच्या भौतिक गरजा ह्या मर्यादित असल्याने वस्तूंची त्या मापातच देवाण घेवाण चालत असे.
लोकांच्या श्रद्धेचे ठिकाण म्हणजे गावतील मंदिर. स्वराज्याच्या पूर्वेकडे बहुतांशी गावाच्या वेशीत हनुमान देवालये दिसून येतात. त्याचबरोबर गावाच्या बाहेरच्या बाजूस महादेव, मासोबा अशी मंदिरे तर आतील बाजूस वेगवेळ्या देवी-देवतांच्या मंदिरे होती. येथील स्थानिक प्रथेनुसार या मंदिरांची पुजा अर्चा चालत असे. देशामध्ये गुरव या समाजाकडे मंदिराच्या देखभालीची जबाबदारी होती. केळशीचे बाबायाकूत दर्गा असे मुस्लिम सुफिंची दर्गे काही गावात आहेत. या दर्ग्याच्या दिवाबत्तीची व्यवस्था करण्याची जबाबदारी मुलाणी व फकीर या समाजाकडे होती. 
भौतिक सुविधांच्या बाबतीत त्यावेळी खेड्यांमध्ये आजची परिस्थिती नव्हती. गावांत रात्री प्रकाश राहण्यासाठी ठीक ठिकाणी मशालीचे बांधकाम करण्यात येत असे. याची विशेषकरून वेशीच्या मुख्य रस्त्यावर उभारणी होत असत. याचे बांधकाम दगड, माती, चुन्यानी बांधकाम केले जात असे. तसेच बहुतांशी लोक अंधारात ये-जा करण्यासाठी हतातील मशालींचा वापर करत होते. त्याचबरोबर ग्राम प्रशासनाकडून गावातील लोकांना विश्रांती घेण्यासाठी सार्वजनिक ठिकाण म्हणून एक खास शेरी या वास्तूची निर्मिती करण्यात येई. या वास्तूस धर्मशाळा असेही म्हंटले जात असे. सर्व स्तरातील लोकांसाठी ही वास्तू खुली राहण्याची परवानगी होती तर काही ठिकाणी याची निर्मिती वेगवेगळ्या गल्लीनुसार असे. पाटील, कुलकर्णी, मुकदम, मिरासदार यांनी पाळलेल्या घोड्यांना बांधण्याची जागा म्हणजे पागा होय. पाटील हे गावाच्या रक्षणासाठी काही घोडे पाळत असत. त्याचप्रमाणे कुलकर्णी परगण्याकडे जाण्यासाठी तर मिरासदार आपल्या जमिनीकडे जाण्यासाठी घोड्याचा वापर करीत असत. या सर्वांनी आपल्या घोड्याला बांधण्यासाठी पागांची निर्मिती करत असत. त्यामुळे पगा हे एक महत्वाची वास्तू मानली जात असे.
शेतकर्‍यांकडून वर्षाकाठी जमा करण्यात आलेला शेतसारा गावामध्ये धान्याच्या कोठारामध्ये जमा करत असत. मोकदम व महार बलुतेदार यांच्याकडे या कोठाराच्या संरक्षणाची संपूर्ण जबबदारी होती. मोकदम व पाटील यांनी नियमानुसार हे धान्य परगणा व सुभ्याकडे पाठवून देण्याची व्यवस्था करत असत. राजा किंवा सरदाराचा लष्करी तळ ज्या ठिकाणी पडलेला असे, तेथे यांना काही धान्य पोहचविण्याची व्यवस्था करावी लागत असे. 
आडमार्ग व उभामार्ग या दोन मार्गावर गाव वसाहत निर्माण होत असे. स्वराज्यातील मुख्य मार्गांना उभेमार्ग तर मुख्य रस्त्याहुन आत जाणाऱ्या मार्गांना आडमार्ग असे म्हंटले जाई. या दोन्ही मार्गाची गाडेवाट, घोड्वाट व पायवाटांमध्ये विभागणी केली जात असे. यानुसार लोक या रस्त्यांवर उपलब्ध साधनांद्वारे ये-जा करत असत. ज्याठिकाणी मुख्य रस्ते आहेत अशा गावामध्ये देशमुख व हवालदार वास्तव्य करत होते. तर काही गावांमध्ये ठाणी असत, तेथे त्या ठाण्याचे प्रमुख राहत असत. अशा दोन्ही ठिकाणी ग्रामव्यवस्थेचे स्वरूप गावासारखेच पण थोडे वेगळे होते. कारण पाटील राहत असलेल्या गावापेक्षा देशमुख राहत असलेल्या गावास जास्त महत्व होते. देशमुख व हवालदार यांच्याकडे सत्तेचे अधिकार जास्त असल्याने सामान्य जीवनावर त्याचे प्रभाव होते. गावाच्या हद्दीस (परीघ) गावकूस म्हंटले जाई. गावकूस म्हणजे गावाचा एकूण क्षेत्रफळाचा परिघ. गावकुसाच्या आतील भागाची संपूर्ण रचना म्हणजेच ग्रामरचनाहोय. एकंदरीत मराठेकालीन संपूर्ण गावाची साधारण रचना पाहील्यास आजच्या गावाच्या तुलनेत त्यावेळची रचना मर्यादित स्वरूपाचे, स्वतंत्र व स्वयंपूर्णता असल्याचे दिसून येते.
गावगाडा:
मराठेकालीन ग्रामव्यवस्थेत गावगाडयास अनन्यसाधारण महत्व होते. गावगाडा म्हणजे गावाची व्यावहारिक व्यवस्था. गावात राहत असलेल्या लोकांमध्ये प्रशासकीय अधिकार, लष्करी अधिकारी, पारंपारिक वर्ग व जाती अशी वर्गवारी होती. प्रशासकीय अधिकारी, मिरासदार व उपरी, बलुतेदार-अलुतेदार, वतनदार, पेठेचे वतनदार हे गावगाडयातील महत्वाचे वर्ग होते. खेड्यातील बहुतांशी लोकांचे शेती हाच प्रमुख व्यवसाय होता. सण, उत्सव, करमणूकीची साधने, आहार, पोषाख, रूढी, प्रथा परंपरा, धार्मिक जीवन आदी घटक गावगाड्यातील दैनंदिन जीवनाला प्रभावित करणारे महत्वाचे घटक होते.
गावगाडयामध्ये दिवाणसत्ता, गोतसत्ता, धर्मसत्ता व व्यापारीसत्ता ह्या चार सत्ता रूढ होत्या. दिवाणसत्तेमध्ये हवालदार, कारकून या राज्यसंस्थेतील अधिकारी असत. या सत्तेच्या माध्यमातून राजा हा स्वराज्यातील गावांचा कारभार पाही. दुसरे म्हणजे गोतसत्तेमध्ये पाटील, कुलकर्णी, देशमुख, देशपांडे, शेटे, महाजन या वतनदार मंडळीचा समावेश असून यांच्या हाती गावाची सूत्रे होती. धार्मिक गोष्टींचा वाद निर्माण झाल्यास निर्णय घेण्याचे अधिकार मात्र धर्मसत्तेच्या हाती होते. व्यापारी सत्ता ही कसबा अथवा पेठ येथे कार्यरत असून शेटे व महाजन हे या सत्तेचे मुख्याधिकारी होते. 
अ) पाटील हा गावाचा प्रमुख वतनदार होता. पाटील हा सामान्यतः वंशपरंपरागत मराठा जातीचा असे; अपवाद प्रसंगी ब्राह्मण, जैन, लिंगायत, धनगर आणि महार जातीकडे वतन असल्याचे आढळते. त्यांना मोकदम, पाटील, ग्रामणी, ग्रामगोपक इत्यादी नावाने संबोधले जात होते. पाटलाला सरकारी आणि वाटणीच्या कामाव्यतिरिक्त गावची अर्थव्यवस्था मजबूत ठेवणे, जास्तीत जास्त जमीन लागवडीखाली आणणे, न्यायदान करणे, शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित करणे, सरकारी दरबारी गावाचे नेतृत्व करणे आदी कामे करावी लागत असे. ब) गावाचा दुसरा महत्वाचा वंशपरंपरागत वतनदार व अधिकारी म्हणजे कुलकर्णी, हा ब्राह्मण जातीचा असे. त्याला गाव कुलकर्णी आणि ग्रामलेखक म्हणत असत. त्याला राज्यकारभारात पाटलांना मदत करणे, दफ्तर सांभाळणे, जमिनीची नोंद ठेवणे व जोशीपणाचे काम करणे आदी कामे करावी लागत असे. त्याचबरोबर काहीवेळा अनेक गावांचा हिशेब ठेवण्याची ही जबाबदारी कुलकर्णीकडे असे. जर कुलकर्णी पद एखाद्यास द्यावयाचे असल्यास शेरनी या नियमाने या पदाची खरेदी-विक्री केली जात असे. क) चौगुला हा वतनदार, विशेषता: मराठा जातीचा असे. चौगुला हा पाटलाचा मदतनीस म्हणून काम पाही. पटलाप्रमाणेच चौगुला याचीही निशाणी नगर असे. त्याला न्यायदान, सारा वसुली, खजिन्याची व्यवस्था, जमीन मोजणी इत्यादी कामात पाटलास मदत करावी लागत असे. ड) पेठ व कसबा याठिकाणचे वतनदार अधिकारी म्हणजे शेटे-महाजन. यांच्याकडे अनुक्रमे गावात पेठ वसविणे व पेठेचा हिशोब ठेवण्याची जबाबदारी होती. गावातील सर्व सार्वजनिक कार्यात आणि न्यायदानात यांचा सहभाग असे. यांना रीती-रीवाजाप्रमाणे गावकर्‍यांकडून काही हक्क व मानपान मिळत असे. ई) अस्पृश्य समाजातील महत्वाचा वतनदार म्हणजे महार. तो गावातील अधिकाऱ्यांचा शिपाई किंवा वेठबिगार म्हणून ओळखला जाई. त्याला वर्षाकाठी या कामाच्या मोबदल्यात बलुता मिळत असे.                   
ग्रामीण अर्थव्यवस्था:
गावाची सामाजिक, आर्थिक जडणघडण स्वयंपूर्ण आणि स्वायत: होती. कला, संस्कृतीमुळे गावांना सामाजिक स्थैर्य लाभले होते. जाती संस्था, पंचायत, जातींच्या न्यायालयाद्वारे लोकजीवनावर नियंत्रण निर्माण झाले. खेडी स्वयंपूर्ण असून खेडी परस्परांशी संबंध नसलेल्या गणराज्यासारखीच होती. कारण प्रत्येक गाव आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण होते. सामाजिकदृष्ट्या एकसंघ असून ती साध्या-सुध्या ग्रामीण हस्तव्यवसायधीष्टीत अर्थव्यवस्था व सुसंघटीत लोकजीवनाचे केंद्र बनले होते. या काळातील गाव आणि वस्त्या संरक्षण आणि आर्थिक व्यवहाराच्या बाबतीत स्वयंपूर्ण होते त्यामुळे गावकऱ्यांची स्थानिक पातळीवर दैनंदिन गरज पूर्ण होत असे.
लोकांच्या चरीतर्थाचे शेती हेच एकमात्र साधन असल्यामुळे सर्व आर्थिक व्यवहार शेतीच्या उत्पन्नाशी निगडीत होते. वेगवेगळ्या विभागातील लोक वेगळ्या प्रकारचे जीवन जगणारे दिसून येतात. शेती व्यवस्थापनाचे सर्वसाधारणपणे रयतवारी आणि सामाईक असे दोन प्रकार होते. रयतवारी पद्धतीमध्ये गावकरी आपआपल्या जमिनीचे मालक असत आणि सामाईक पद्धतीमध्ये सर्व पिकाऊ व पडीक जमीन ही गावातील सर्वच गावकऱ्यांची एकत्रित मालकीची असे. त्याचबरोबर इनाम, मिराशी, उपऱ्याची जमीन अशी तीन प्रकारची जमीन पाहावयास मिळते.
शिवशाही काठी व दोरीचा वापर करून जमिनीची मोजणी करत असत. शिवशाही काठी ५ हात व ५ मुठ लांबीची असे. जमीन महसूलासाठी बिघाहे परिणाम निश्चित होते. अधिकारी जमिनीची पाहणी करून एकूण उत्पनातून २/५ टक्के उत्पन्न महसूलच्या स्वरुपात जमा करीत असत. या पद्धतीतील दोष दूर करण्यासाठी शिवाजी महाराजांनी रयतवारी पद्धत सुरु केली. शेतकऱ्यांना आपत्कालीन परस्थितीत शेतसाऱ्यात सूट देण्यात येत असे. तसेच पाठस्थळ व मोठस्थळ या दोन पद्धतीने जमिनीच्या वर्गवारी होत होत्या, तर जिरायत व बागायत जमिनीनुसार सारा वसूल केले जात असे. त्यानुसार प्रत्येक पिकाला वेगळा कर आकारला जाई. एखाद्या गावात लागवडीखालील जमिनीपेक्षा पडीक जमीन जास्त असेल तर त्या गावचा पाटील अशी जमीन कमी करण्यास सूचना देत. नकदी, खरीप, रब्बी याप्रकारच्या वर्गीकरणानुसार शेतकरी शेतीचे पिके घेत असत.
शेती हे पर्जन्यवृष्टीवर अवलंबून असल्याने शेतकऱ्यापुढे अनेक समस्याही होत्या. बागायत पेक्षा जिरायत जमीनीचे अधिक प्रमाण अधिक असल्याने शेतकऱ्याना जास्त कष्ट करावे लागत होते. त्याचबरोबर बहुतांशी तरुण वर्ग हा लष्करात सामिल झाल्यामुळे शेतीसाठी कष्टकरी वर्गाची सातत्याने कमतरता भासत असे. त्याचबरोबर दुष्काळ हे पाचवीला पुजलेला असल्याने मनुष्यबळाची मोठी हानी होत असे. अशावेळी सरकारकडून काहीप्रमाणात मदत मिळत असे. उदा. १६५७ साली सुपे प्रांतात दुष्काळ पडला त्यावेळी शिवाजी महाराजांनी शेतकर्‍यांना कर्ज दिले. याशिवाय शेतकऱ्यांना शेतीची अवजारे, बैलजोडी, बी-बियाणे व खताची मदत केली. दुसरे उदाहरण म्हणजे शिवाजी महाराजांनी ५ सप्टेंबर १६७६ च्या पत्रानुसार शेतकऱ्याना बैलजोडी व रोख रक्कमेच्या स्वरुपात मदत करण्याचे आदेश दिल्याचे पाहावयास मिळते. 
काही गावात घरगुती हातमागाच्या सहाय्याने कापडनिर्मिती उद्योग चालत असे. या उद्योगात गरीब व श्रीमंत वर्गास उपयोगी असलेल्या स्त्रीपु-रुषांच्या कापडाची निर्मिती करण्यात येई. सासवड, सुपे, टाकळी या ठिकाणी धोतराचे उत्पादन करणारे अनेक हातमाग होते. येथून स्वराज्यात मोठ्याप्रमाणात कापड निर्यात होई. कोटगिरी, शहदा, पैठण येथे साडया, धोतर, फेटे, रुमाल, शेला इत्यादी स्वरूपाचे रेशमी कपड्याची निर्मिती केली जात असे. लाकूड उद्योगासाठी वसई प्रसिद्ध होते, येथून बांधकामासाठी लाकडी सरसोट, तुळयांचे आयात केली जाई. याबरोबरच देशात सातारा, कोल्हापूर या भागात गुळ निर्मिती उद्योग चालत होता.
गावात कारागीर करणारा वर्ग कारागिरीच्या माध्यमातून उपजीविका चालवत होता. तो वर्ग म्हणजे सोनार, लोहार, तांबट, सुतार, चांभार, कुंभार, विणकरी, मांग, तेली, धनगर, कोमटी, शिंपी, न्हावी, परीट, माळी, कोळी, गवंडी, रंगारी. हे सर्व हस्तउद्योग व व्यवसाय करून आपली उपजीविका चालवित होते. याशिवाय काही धंदेवाईक गायक, पटवेकरी, टाळकरी, कलाल, कासार, मूर्तीकार असे लोक हस्तव्यवसायाच्या रूपाने आपल्या वस्तू आठवडा बाजारात विकत. हे सर्व उद्योग जातीवर आधारित असल्याने या उद्योगांना एक प्रकारची सुरक्षितता लाभली होती. 
आठवडा बाजाराचे ठिकाण म्हणजे कसबा. येथील बाजाराचे दिवस निरनिराळे असून त्यानुसार बाजारातील व्यवहार चालत होते. कसबा येथील पेठेची जबादारी शेठे तर येथील हिशोब ठेवण्याची जबाबदारी महाजन यांच्याकडे होती. त्यांच्या मदतीला बिडवाई या अधिकार्‍याची करारावर नेमणूक करण्यात येई. शेटे हा गोतसभेचा सदस्य या नात्याने गोतसभेत हजर राहून महजरावर निशाणी उठवत असे. पेठेत येणार्‍या सर्व व्यापाऱ्याची नोंद करून त्यांच्याकडून जकात वसूल करण्यात येई. पेठेत काही व्यापाऱ्यांची कायमस्वरूपी दुकाने असत, त्यामध्ये तेली, चांभार, कोष्ठी, विणकर, शिंपी, कलाल, सराफ व सोनार आदींचा समावेश होता. कसब्याच्या ठिकाणी भरणार्‍या आठवडा बाजारात कापड, नारळ, लोणी, विड्यांची पाने, सुपाऱ्या, फळे, भाज्या, मांस, पादत्राणे, कांबळी, लाकडी वस्तू, सोन्या-चांदीचे दागिने, मसाल्याचे पदार्थ, सुगंधी द्रव्ये, सौंदर्य प्रसाधनांची खरेदी विक्री चालत असे.
गावातील आय व्यवस्था:
जमीन महसूल हे गावाच्या उत्पन्नाचे प्रमुख साधन होते. राज्याकडून परगण्याच्या प्रत्येक गावातील जमिनीवर महसूल आकारणी केली जाई. त्यानुसार गावातील अधिकाऱ्यानी महसूल गोळा करून सरकार जमा करत असत. शेतकर्‍यांनी उत्पादित केलेल्या पिकांवर पिकनिहाय शेतसारा आकारला जाई. शेतसारा आकारताना बिघा हे परिणाम लक्षात घेण्यात येई. पिकांची नगदी, खरीप, रब्बी असे वर्गीकरण करण्यात आले होते त्यानुसार शेतसारा आकारले जाई. त्याचबरोबर पाटस्थळ व मोटस्थळ जमिनीनुसारही सारा आकराले जात होते. उदा. पाटस्थळ उस अडीच होन, तर मोटस्थळ उसास दोन होन. दुसरे म्हणजे पिकनिहाय शेतसारा आकारणीनुसार सुद्धा शेतसारा वसूल केला जात होता. जिरायत जमीन बिघ्यास दोन मण, बागायत जमिनीस पाच मण, शेरी जमीला प्रत्येक चावराला बारा खंडी, तर पडीक जमिनीस बिघ्यास सव्वा मण शेतसारा वसूल केला जात असे.  
गावातील गृहउद्योगातून निर्माण होणाऱ्या कापडावर नाममात्र कर आकारले जात होते. आठवडी बाजारामध्ये विक्रीसाठी येणाऱ्या जनावरांवर कर आकारले जात असे. उदा. म्हैस सहा रुके शिंगोटी’, घोडा अडीच रुके तेजीअसे अप्रत्यक्ष जकात सुद्धा घेतले जात. इनामदारांकडून इनामपट्टी, मिरासदाराकडून मीरासपट्टी, देशमुखांकडून देशमुखी कर वतनदार अधिकाऱ्यांकडून प्रत्यक्ष वसूल करण्यात येई. तसेच कुलकर्णी २०० होन, चौगुला १४ होन, शेटे-महाजन यांच्याकडून ३० होन मिरासपट्टी घेतली जात असे. व्यक्तीचे वैयक्तिक उत्पन्न, विविध व्यवसाय आणि मालमत्ता यावरही रोख रक्कम किंवा वस्तूच्या स्वरुपात प्रत्यक्ष कर आकरले जाई. सोने-चांदी व्यवसाय करणार्‍यांवर सराफी, धनगरांच्या लोकरी व्यवसायावर पासोडी, घोंगडी व्यवसायावर एक मेंढी धनगरपट्टी, विणकर, साळी, कोष्ठी, मोमीन यांच्याकडून मागटका कर, चांभाराकडून कराच्या बदल्यात एक चप्पल जोडी पायपोसी, तेल्यांना प्रत्येक घाण्यामागे दिड शेर तेल द्यावे लागे. परीट, सुतार, शिंपी, न्हावी, सोनार, लोहार, गुरव, तराळ, चांभार, मांग, कुंभार, कोळी या व्यावसायिकांकडून वस्तूंच्या स्वरुपात पाव टक्का कर वसूल करण्यात येत असे.
किराणा व्यापारी, कापड दुकानदार, फळ विक्रेते, भाजी विक्रेते यांच्याकडून मोहतर्फा कर घेतला जात असे. जंगलामधील झाडे, औषधी मुळ्या, मसाल्याचे पदार्थ हवे असल्यास कर भरून ग्राम अधिकाऱ्याची परवानगी घ्यावी लागत असे. त्याचबरोबर जंगलात कुरणे चारण्याच्या मोबदल्यात वनचराई कर भरावे लागत असत. तसेच गावातील सार्वजनिक खर्चासाठी गावखर्च म्हणून एक विशेष कर वसूल केला जात असे. गावातील स्थानिक लोकांकडून मोहीमपट्टी, ठाणेपट्टी, तोरणपट्टी, मेजवानीपट्टी, दसरापट्टी, जंगपट्टी, उल्फापट्टी आदी कर स्थानिक खर्चासाठी आकारले जात होते. एखादी मोठी व्यक्ती गावास भेट देण्यासाठी येत त्यावेळी तोरण पट्टी घेतली जाई. गावात ठाणे असल्यास तेथील खर्चासाठी ठाणेपट्टी, तर गावात येणाऱ्या साधू संतांची राहण्याची व्यवस्था करावी लागे त्यासाठी मेजवानी पट्टी, दसरा सण साजरा करण्यासाठी दसरापट्टी, लिंगायत धर्मगुरुसाठी जंगमपट्टी वसूल करण्यात येई. सरकारी अधिकारी गावात दौऱ्यावर येत असत; त्यावेळी काही शिधा दिला जात त्याला उल्फा असे म्हंटले जाई. एखाद्या गावात नदीमध्ये बोट चालत असेल तर नावाडयाकडून नदिटोकडा कर, तसेच तंबाखू उत्पादकाकडून गडीतंबाखू कर घेण्यात येई. त्याचबरोबर काही कर इस्लामकाळापासून सुरु होते; त्यामध्ये बकरीईद, ईदशब्बेरात, कोंबडीपट्टी, उरूसपट्टी, भूतपरोशीपट्टी, शिकेपट्टी यांचा समावेश होता. या काळात करपद्धतीमध्ये बरीच लवचिकता होती. करपद्धती विषयी कोणतेही नियम व कायदे अस्तित्वात नव्हते. त्यामुळे तत्कालीन गरज पाहून ते वसूल केला जात असे. 
शासन सुविधा:
खेड्यातील लोकांना सुविधा पुरविण्याच्या हेतूने शासनाकडून काही सुविधा पुरवण्यात येत असत. ग्राम प्रशासनावर फारसा खर्च होत नव्हता, तरीही काही प्रसंगी खर्च करण्यात येत असे. उदा. पाटगाव येथे दररोज एक हजार माणसांना जेवू घालण्याइतके धन्य दिले जात होते. तसेच शिवाजी महाराजांनी कर्नाटकातील कोटीश्वर मंदिराची दुरुस्ती केली. अशा सुविधा किंवा खर्चातून शासन सुविधा पुरवीत असे. गाव प्रशासनात पाटील, कुलकर्णी, शेटे महाजन, चौगुला या अधिकाऱ्यांना रोज पगार दिला जात होता. तसेच त्यांच्या कामाच्या मोबदल्यात त्यांना काही सरामुक्त जमिनी देण्यात आले. सरकारकडून शेतकऱ्यांना शेती विकासासाठी सुधारित बी-बियाणे, शेतीची अवजारे, बैल खरेदी करण्यासाठी तगाई रक्कम देवू केले जात होते. त्या रकमेवर शासनाकडून कसलेही व्याज आकारले जात नव्हते. पण तगाईपोटी मिळालेली रक्कम शासनाला टप्या-टप्याने परत करावा लागे. शिवाजींने प्रभावलीच्या अधिकाऱ्याला दोन लाख लारी शेकऱ्यामध्ये वाटावेत व त्यावर कोणत्याही प्रकारचे व्याज आकारू नये असे आदेश दिले होते. शेतकामाची सुगी संपून धान्य घरी येईपर्यंतच्या काळासाठी शेतकऱ्याला खर्चासाठी बिनव्याजी पैसा पुरवावा असे हुकूम होते. यावरून शासन वेळोवेळी ग्राम विकासासाठी प्रयत्न केल्याचे दिसते.  
स्थानिक चलनपद्धती:
गावपातळीवर नाणी पाडणारी एखादी विशिष्ट अशी टंकसाळ किंवा सरकारी संस्था नव्हती. खाजगी व्यक्तींना विशिष्ट काळाकरिता कांही अटीवर नाणी पडण्याची परवानगी दिली जात होती. ग्रामीण भागात चलनात सोने, चांदी आणि तांबे या तीन धातूंची नाणी होत्या. होन या नाण्यामध्ये २१ प्रकारचे होन चलनात होते. मराठाकाळात स्वराज्यात वेगवेगळ्या विभागानुसार चलन प्रकारात बदल असल्याचे दिसून येते. पुणे परिसरात खेड्यात मोहर नाणी, मुंबई परिसरात गंबर होन, कर्नाटकात देवराई व रामचंद्राई होन, पश्चिम किनाऱ्यावर इब्राहिमी होन, वेंगुर्ला भागात डचांची वेंगुर्ला होन व आदिलशाहीचे निशाणी होन, हुबळी परिसरात इंग्रजांची टिपकी होन, देशामध्ये महमद्शाही होन, रायगड परिसरात शिवराई होन व बेळगाव परिसरात हुक्केरी होन प्रचलित होते. याकाळात चांदीची नाणी पाडण्यात आलेली नव्हती, पण पूर्वीपासून प्रचलित असलेल्या या नाण्यामध्ये पुणे परिसरात शहजनी, आलमगिरी रुपया, अश्रफी, गोवा परिसरात झेफारीन, मुंबई व गुजरात परिसरात अब्बासी, देशात महमुदी नाणे, चौल, दाभोळ, भिवंडी परिसरात आदिलशाही लारी ह्या चांदीच्या नाणी प्रचलित होत्या. त्याचबरोबर तांब्याची नाणी ही चलनात होती; त्यामध्ये शिवराई, रुका, पैसा, दाम, अडका, जितल, शिवराई पैसा, बाझारुक्को इत्यादी. पैसा, दाम, महमुदी ह्या ईस्लामी राजवटीच्या नाणी ही काही ठिकाणी चलनात होत्या. गाव कोणत्या सुभ्यामध्ये आहे त्यावरून त्या परिसरातीलच नाण्यांचा वापर स्थानिक लोक करत असत.
ग्रामीण कुटुंब आणि सामाज:
कुटुंबजीवन हे दैनंदिन जीवनातील महत्वाचे घटक होते. गावात प्रत्येक समाजात संयुक्त कुटुंबपद्धती अस्तित्वात होती. कुटुंबातील वयोवृद्ध पुरुष हेच कुटुंबप्रमुख असे. कुटुंबातील स्त्री-पुरुष, लहान-थोर किवा वेगवेगळ्या नात्यांना एकमेकांशी जोडलेले लोक हे त्यांच्या जीवनात गुरफटलेले असत. कुटुंबाचा आचार आणि विचार हे दैनंदिन जीवनात व्यक्त होत असे. जातीनिहाय, धर्मनिहाय, पंथनिहाय, वर्गनिहाय, प्रत्येक कुटुंबाला स्वतःचे एक स्वतंत्र अस्तित्व प्राप्त झालेले होते. त्यानुसारच त्यांची दैनंदिनी चालत असे, म्हणून आपणास दैनंदिन जीवनासंबधी असलेल्या घटकामध्ये फरक जाणवतो. आणि तो फरक अपरिहार्य होता. याकाळात सामान्यतः शेती हा कुटुंबाचा मुख्य व्यवसाय होता. काहीकाळ पुरुष लष्करात असल्याने स्त्रियांनाच शेतीची देखभाल करावी लागत असे. त्याकाळात दुष्काळ, दारेडेखोर, लुटारु किंवा शत्रूच्या फौजेची धाड केंव्हा पडेल याची भरवसा नसे अशा स्थितीत एकत्र कुटुंबपद्धती हिताची ठरत असे. कुटुंबातील पूजाअर्चा, देवधर्म व कुलाचार हे सर्व घरच्या स्त्रियांनाच करावे लागत असत. यावरून कुटुंबव्यवस्था ही दैनंदिन जीवन प्रभावित करणारे अत्यंत महत्वाचे घटक होते म्हणता येईल.
समाजव्यवस्थेत वर्णव्यवस्थेचा प्रभाव होता, त्यानुसार ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शुद्र या चार वर्णांचा समावेश होता. याशिवाय अतिशूद्र नावाचा आणखीन एक वर्ण समाजात प्रचलित होता. जात हे समाजव्यवस्थेचा प्रमुख आधार असल्याने अनेक जाती, जमाती आणि पोट जातींनी मिळून समाज बनलेला होता. ही समाजरचना जातीसंस्थेवर आधारित होती. याकाळातील समाजरचनेची वैशिष्ठ्ये याप्रमाणे, अ) गावगाडयातील बलुतेदार व अलुतेदार यांचा उल्लेख, सामाजिक व धार्मिक क्षेत्रात निरनिराळ्या जाती म्हणूनच चाले. ब) समाजाची विभागणी तीन विभागात झाली होती ते १.ब्राह्मण जाती  २. शुद्र तत्सम (ब्राह्मणेतर) जाती,  ३. अतिशूद्र किंवा अस्पृश्य जाती.
            जातीव्यवस्थेमध्ये ब्राह्मण समाज प्रमुख असून यांना समाजात सर्वोच्च स्थान होते. अध्ययन करणे, यज्ञ करणे, दान करणे, धार्मिक विधी पार पाडणे आदी कर्तव्य ते करत असत. ब) शूद्र व तत्सम ब्राह्मणेतर जातीमध्ये मराठा, कुणबी, लेवा कुणबी, तिरोळे व मन्वा कुणबी, न्हावी, कुंभार, सुतार गुरव, तेली, शिंपी, माळी, गोंधळी, धनगर, लोहार, परीट, कोळी, तांबोळी, रामोशी, साळी, सनगर, ठाकूर, गोसावी, कोष्टी, कलावंत इत्यादींचा समावेश होता. तसेच यामध्ये कैकाडी, बुरुड, फासेपारधी, बेलदार, पाथरवट, ढवडा,लगर, मदारी या भटक्या जाती ही मोडत होत्या. समाजात ब्राह्मणानंतर मराठा जातीला महत्त्वाचे स्थान होते. मराठा जातीची लोकसंख्या इतर जातीच्या तुलनेत अधिक होती. मराठा जातीमध्ये मराठा आणि कुणबी या दोन प्रमुख शाखा आहेत. कुणबी या जातीत देश कुणबी व कोकण कुणबी असे दोन भाग पडतात. कुणबी म्हणजे गरीब शेतकरी व शेतमजूर म्हणून शेती कसणार्‍यांना कुणबी अशी संज्ञा होती. वरील सर्व ब्राह्मणेतर जातीतील लोकांचा समावेश शूद्र समाजात होत असे. क) अस्पृश्य जातीमध्ये महार, मांग, चांभार, ढोर या प्रमुख जातीही होत्या. तसेच त्यांच्यामध्ये पोटजाती ही होत्या.
समाजात जातीव्यतिरिक्त लिंगायत, जैन, मुस्लिम, आदिवासी, भटका समाज यांचासुद्धा समावेश होता. आणखीन एक वर्ग म्हणजे सावकार जो पैसे उसनवारीने देणे त्याची देवघेव करण्याचे काम करत. ब्राह्मण, गुजर, व वाणी आदी लोक सावकारकी करत असत. मराठेकालीन समाजात वतनदार समाज हा स्वतंत्र होता. यामध्ये पाटील, कुलकर्णी, शेटे, महाजन, चौगुला, महार, देशमुख आणि देशपांडे यांचा समावेश होता. यांना समाजात प्रतिष्ठा व सन्मान असे. त्याचबरोबर एक महत्त्वाचा वर्ग म्हणजे बलुतेदार. बलुतेदारांकडून गावाची सेवा होत असे म्हणून त्यांना ग्रामसेवक म्हटले जाई. मराठाकाळात बलुतेदारांची संख्या बारा असून हे बदलत राहिली आहे. बलुतेदारांपैकी काही वतनदार तर काही अधिकारी ही होते. हे सर्व बलुतेदार गावात राहून गावकऱ्यांची सेवा करत असत. यामध्ये कुंभार, कासार, चांभार, परीट, न्हावी, सुतार, लोहार, गुरव, जोशी, कोळी, तराळ, महार या सेवकर्‍यांचा समावेश होता. बलुतेदारास सेवेच्या बदल्यात वर्षाकाठी मोबदला मिळत असल्याने त्यांना शेतकऱ्यावर अवलंबून राहावे लागत असे. अलूतेदारामध्ये तेली, तांबोळी, साळी, माळी, जंगम, कलावंत, ठाकूर, घडशी, तराळ, सोनार व चौगुले यांचा समावेश होता. समाजात प्रत्येक जात आपल्या व्यवसाया गुरफटली गेल्याने त्यांना उपजीविकेचे प्रश्न उपस्थित होत नव्हते. कोणत्या जातीने कोणता व्यवसाय करावा व कोणत्या चाली पाळाव्यात यासंबंधीचे सूक्ष्म व स्थूल नियम असत. तसेच समाजरचनेचे विविधांगी स्वरूप त्या-त्या जाती-उपजातीचे कुलाचार, श्रद्धा-अंधश्रद्धा, रूढी परंपरेशी निगडित होते. त्यांच्या जीवनात असलेली विविधता त्यांच्या दैनंदिन जीवनात ही प्रतिबिंबित होत असे. यातून त्यांच्या दैनंदिन जीवनाच्या व्यापक कक्षा लक्षात येऊ शकतात.
वंशपरंपरेने अस्तित्वात असलेला दुसरा वर्ग म्हणजे मिरासदार व उपरे. खेडयातील लागवडीखालील जमीन कसण्याचे काम हे दोन प्रकारचे लोक करीत असत. मिरासदार हा स्वतःच्या जमिनी स्वत: कसत. मिरासदार शेतीच्या कामाव्यतिरिक्त गोतसभेत सहभाग घेत असे. गावात पोट भरण्यासाठी आलेल्या कामकरी लोकांचा वर्ग म्हणजे उपऱ्या. यांना गावामध्ये स्वतःचे घर व जमीन नसल्याने ते फक्त लोकांच्या जमिनीवर मजूरी करून राहत असत. या दोन्ही वर्गातील लोकांनी गावाच्या कृषीव्यवस्थेबरोबरच ग्रामविकासामध्ये महत्वाची भूमिका असल्याचे दिसून येते.
व्यापारी समाजामध्ये स्थायिक व भटके व्यापारी, दुकानदारी करणारे मुस्लीम, मोची, खाटिक, मिठाई विकणारे, किराणा-भुसारी व्यापारी, दुकानदार, दिवाबत्ती विकणारे, बकरी विकणारे व विविध वस्तू विकणार्‍यांचा समावेश होता. आठवडा बाजार म्हणजे एका ठराविक ठिकाणी ठराविक दिवशी आसपासच्या खेड्यातील लोकांसाठी बाजार भरविला जात असे. या बाजारात खरेदी विक्रीसाठी सकाळपासून संध्याकाळ पर्यंत त्याच परिसरातील लोक व्यापार करण्यासाठी येत असत. श्रॉफ, बनिया, शिंपी, तेली, तांबोळी, कासार अत्तार, सोनार, बागवान, मोमीन, कलाल, जिनगर, होलार, मिठाईवाले, मुनारी, पटवेकरी, घिसाडी, शिकलगार हे व्यापारी कायमस्वरूपी कसब्यात बसून तर, बंजारा आणि लमाण हे लोक भटक्या स्वरुपात फिरून एका गावातून दुसऱ्या गावात व्यापार करत होते. 
पुरोहीतामध्ये जोशी, गुरव, मुलांणा, जंगम यांचा समावेश होता. जोशी हा ब्राह्मणांचा पुरोहित, गुरव ब्राह्मणेत्तरांचा पुरोहित, मुलांना मुस्लिमांचा पुरोहित तर जंगम हा लिंगायतांचा पुरोहित मानला जात असे. गावगाडयामध्ये पुरोहित हा बलुतेदार म्हणून ओळखला जाई पण धार्मिक क्षेत्रातील त्यांच्या स्थानामुळे गावातील सर्व धार्मिक जीवनावर त्यांचा प्रभाव असे. घरातील जन्म, लग्न, मृत्यू व तत्संबंधिचे सर्व विधी पूरोहित करत असत. गावातील धर्मप्रमुखत्वच त्यांच्याकडे असल्याने समाजातील दर्जा, मानपान अशा गोष्टीत त्यांची प्रतिष्टा होती. याचबरोबर आणखीन एक वर्ग म्हणजे बैरागी समाज. शेतकऱ्यांच्या पिकाची जेंव्हा सुगी असे त्यावेळी हे लोक धर्माच्या नावावर भटकंती करत असत. लग्न सोहळा, बारसं, नामकरण समारंभावेळी त्यांची उपस्थिती आवश्यक मानले जात असे.
स्त्रीजीवन:         
            ग्रामव्यवस्थेत स्त्रियांचे स्थान आणि दर्जा दुय्यम मानले जात असे. त्यांना कुटुंबातील प्रमुख पुरुषांच्या आणि पतीच्या आज्ञेशिवाय राजकीय, सामाजिक, धार्मिक आणि आर्थिक संबंधात कार्य करण्याचे स्वातंत्र्य नव्हते. या काळात बालविवाहाची प्रथा प्रचलित असल्याने अगदी लहान वयातच स्त्रियांना संसाराचे ओझे सहन करावे लागत. विधवा स्त्रियांना पुनर्विवाह करण्याची परवानगी नसल्याने त्यांचे उर्वरित जीवन अत्यंत दयनीय असे. स्त्रियांचे केशवपन करण्याची प्रथा प्रचलित होती. स्त्रियांना शिक्षण घेणे व राजकारणात सहभाग घेण्याचा अधिकार नव्हता. मराठा समाजात पुनर्विवाहाला थोडी मुभा होती; त्या विधवा विवाहाला पाटम्हंटले जाई. समाजात पडदा पद्धतही प्रचलित होती. त्याचबरोबर कुणबीण, बाटकी व वेश्या हा स्त्रियांचा आणखी एक वर्ग समाजात अस्तित्वात होता. समजात स्त्रियांना गुलाम व कुणबिण म्हणून ठेवण्याची पद्धत रूढ होती. गावातील अधिकाऱ्याना खरेदी विक्रीद्वारे कुणबीण व बटिक पुरविण्याचे काम हेडे व चारण हे लोक करत असत.
मराठाकाळात स्त्रियांना जवाहीर, मोती, हिरे व माणिक यांचे दागदागिने घालण्याची अप्रूप होते. पण स्त्रीचा मुख्य सौभाग्य अलंकार मंगळसूत्र हाच मानला जात असे. स्त्रिया नासिका भूषणे म्हणून नथ, लवंग, लोलक, चमकी व मोरणी तर, कानात बुगडी, कर्णफुले, बाली, कुडी, कुंडल घालीत असत. त्याचबरोबर दंडात वाकी, कमरेला कमरपट्टा, पायात साखळ्या, तोरड्या, वेणीत सोन्या-मोत्याची फुले इत्यादी दागिने दैनंदिन वापरात होते. मनगटात चांदीच्या बांगड्या, गोठ, कोपरात चांदीच्या वेळा, दंडात चांदिच्या वाकी व गळ्यात पुतळ्या ही दागिने स्त्रिया वापरत असत.
स्त्रियांच्या वेशभूषेमध्ये साडी-चोळीचा पेहराव ही प्रमुख वेशभूषा होती. मुली परकर नेसित तर क्वचित प्रसंगी काचोळीही चढवीत असत. स्त्रियांच्या नेसण्यात लुगडी, साड्या, चीरड्या, पातळे, पितांबर, शालू, पैठणी होत्या. विशेष प्रसंगी अंगावर शेले घेण्याचीही पद्धत होती. पुष्कळ स्त्रिया दोन पायामधून विभागलेल्या निऱ्याचा कसोटाही घालत असत. कासोटा घालण्याची चाल ब्राह्मण, क्षत्रिय व इतर वर्गातील स्त्रियांच्यामध्ये असे. समाजातील प्रत्येक स्त्रियांना साडीचा पदर डोक्यावर घेण्याची पद्धती होती. साडीशिवाय चोळी हे दुसरे वस्त्र स्त्रिया वापरत असत. चोळीचे गाठ मागे बांधायची की पुढे याचे संकेत जातीनुसार होत्या त्यानुसार प्रत्येक जातीतील स्त्रिया चोळी वापरत होते.
सामाजव्यवस्था:
            ग्रामीण समाजजीवनात वेठबिगारी पद्धत अस्तीत्वात होती. व्यक्तीकडून सक्तीने विनामुल्य काम करुन घेणे म्हणजे वेठबिगारी होय. पाटील, कुलकर्णी, शेठे, महाजन व देवस्थानचे प्रमुख यांना वेठबिगारी घेण्याचा अधिकार होता. महार, मांग, चांभार, सुतार, लोहार, कुंभार, न्हावी, परिट, गुरव, तेली, तांबोळी, साळी, घनगर, शिंपी, माळी, गोंधळी, भट, ठाकूर, गोसावी, जंगम, मुलाणा, वाजंत्री, घडसी, अधेर्ले, खलक व वाडवळ आदी लोकांना वेठबिगार म्हणून घेता येत असे. या वेठ्बिगारांकडून सरकारी बांधकाम व दुरुस्ती, अधिकाऱ्यांची घरे बांधणे, पाणीपुरवठा करणे, पिके काढणे, लाकडे तोडणे, ओझे वाहणे, गवत कापणे अशी पडतील ती कामे करवून घेत असत. दैनंदिन जीवनात मदत करणारी व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे पहिले जात होते.
            मराठेकालीन समाजामध्ये अस्पृश्यता मानण्यात येत असे. महार, मांग आणि चांभार या जातीतील लोकांना अस्पृश्य आणि अतिशूद्र संबोधले जाई. अस्पृश्य लोकांना त्यांचा स्पर्श होऊ नये म्हणून गावकुसाच्या बाहेर रहावे लागे. अस्पृश्यांना सार्वजनिक पाणवठे आणि मंदिरप्रवेश त्याज्य मानण्यात येई. याशिवाय त्यांना शिक्षण घेण्याचाही अधिकार नव्हता. अस्पृश्यांच्या स्पर्शाने झालेला विटाळ घालविण्यासाठी स्पृश्य लोकांना प्रायश्चित घ्यावे लागत असे. शिवकाळात अस्पृश्यतेचे प्रमाण कमी होते, मात्र पेशवेकाळात अस्पृश्यता मानण्याच्या प्रमाणात वाढत होत गेले.
ग्रामपातळीवर शिक्षण हे काही वर्गापुरतेच मर्यादित होते. या काळात लिहिणे, वाचणे, हिशोब करणे एवढयापुरतेच शिक्षण दिले जात होते. वैदिकविद्या ग्रहण करण्याचा व शिकण्याचा अधिकार फक्त ब्राह्मण वर्गालाच होता. गावात शाळा ह्या पाठशाळा, देऊळ, मठ व झाडाखाली भारविले जात. त्याचबरोबर प्राथमिक शिक्षणात लिहिणे, वाचणे, पाठांतर बरोबरच व्याकरण, तर्कशास्त्र, गणित, हस्तउद्योग शिकविले जात. प्राथमिक स्वरूपाच्या शिक्षणात मोडी लिपीचा समावेश होता. मोडी लिपी ही प्रशासकीय आणि व्यवहाराची एकमेव सर्वसाधारण लिपी होती. विद्यार्थी हे ब्राह्मण, प्रभू, सोनार, मराठा, वाणी इत्यादी जातीचेच असत. या काळात मल्लविद्या आणि लष्करी शिक्षण यांना प्राधान्य दिले जात होते. त्याचबरोबर वडीलधारी मंडळी आपल्या कुटुंबातच मुलांना पारंपारिक व्यवसाय शिकवीत असत. 
विवाहपद्धती मध्ये ब्राह्म, प्राजापत्य, दैव, आर्ष या चार विवाहांना समाजमान्यता होती. विवाहप्रसंगी वराचा वडील वधूच्या वडिलास पैसे व धान्याच्या स्वरुपात हुंडा देत असे. समाजात बालविवाह प्रचलित होते. वधूचे वय आठ वर्षापेक्षा कमी आणि वराचे वय बारा वर्षापेक्षा जास्त असे. बालविवाहामुळे विधवा होण्याचे प्रमाण अधिक होते. विधवांना पुनर्विवाहाची संमती नव्हती. समाजात विषम विवाह होत असत. जर वराचा दुसरा विवाह असेल तर तो ३२-३५ वर्षाचा असला तरीही त्याला ७-८ वर्षाची वधू मिळे. त्याचबरोबर ग्रामीण समाजात बहुपत्नीत्वाची पद्धतही रूढ होती. मराठा कुणबी जातीत सोडचिठ्ठी घेण्याचा प्रघात होता. सोडचिठ्ठी दिलेल्या स्त्रियांना पाटाच्या वीधीप्रमाणे दुसरे लग्न लावता येत असे.
साधारणपणे पुरुष आपआपल्या दर्जाप्रमाणे सोने-चांदीचे दागिने वापरत असत, त्यामध्ये कलगी, तुरा, शिरपेच ही हिरोभूषणे, भिकबाळी व चौकडा कर्णभूषणे, कंठी, व गोफ ही कंठभूषणे तयार करवून वापरत. लहान मुलांच्या पायात वाळे व घागऱ्या, गळ्यात कंठी, पायात व कंबरेलाही दागिने घालण्याचा प्रघात होता.
दैनंदिन लोकजीवनात पारंपारिक वेशभूषा करण्याची पद्धत होती. धोती आणि साडी हेच पोषाख स्री पुरुषांची खरी वेशभूषा म्हणून ओळख होती. याशिवाय जातीनिहाय वेशभूषा हेही एक वैशिष्ठ्य होते. पुरुषांची वेशभूषा दोन विभागात असे, पैजमा, अंगरखा, निमा, झगा, डगला, कुडता, कुड्ती व अंगडे हे वरचे वस्त्र म्हणून वापरत असत. झगा घोटयाइतका, अंगरखा डगला गुढग्याइतका, अंगडे मांडयाइतके व कुडते कंबरेबरोबर अशी कपड्यांची रचना असे. या वस्त्रांची कापडानुसार वैशिष्ट्य म्हणजे, झगा बारलीचा व जराचा, डगला जराचा व बुटेकर छिटाचा, अंगडे शालुचे व औरंगजेबी कापडाचे असे. पुरुष जे खालचे वस्त्र परिधान करीत असत त्यामध्ये; तुंबा, पायजमा, विजार, चोळणा, तुमन आणि धोतर या वस्त्रांचा समावेश होता. सर्व समाजात धोतर हे वस्त्र लोकप्रिय होते, पण समाजातील अस्पृश्य जातीतील बहुतांशी लोक वस्त्रहीन असत, ते धोतर ऐवजी लंघोटी घालीत असत. त्याचबरोबर दुपट्टा ऐवजी अंगावर घोंगडीपासोडी सारखे पटकूर टाकीत, डोक्याला पागोटे ऐवजी चिंधी बंधित असे. समाजात लोकांनी डोक्यावर बोडक राहणे अशुभ मानले जात होते, त्यामुळे लोक पटका, टीवटे, पागोटे, चिरा, मंदिल, फेटा, पगडी, रुमाल, मुंडासे, टोपी घालत असत. या वस्त्रांचा जास्तकरून वेगवेगळ्या प्रसंगी, समारंभात व सणासुदीला वापर केले जाई, तर दररोजच्या जीवनात यातील काही पोषाख परिधान करत असत. 
लोकांच्या दैनंदिन आहारासंबंधी माहिती घेण्यापूर्वी महाराष्ट्राच्या भौगोलिक रचनेचा आहारावर प्रभाव असल्याचे दिसते. जसे कोकणातील लोकांच्या भोजनात आजही भात व मासे हेच प्रमुख अन्न म्हणून वापरले जाते. या उलट देशावरील लोकांच्या भोजनात ज्वारी आणि बाजरीचा वापर विपुल प्रमाणात होता. जातीनुसार दैनंदिन आहारामध्ये वेगवेगळे प्रकार पहावयास मिळतात. ब्राह्मण व मराठा, कुणबी, शेतकरी व इतर प्रजा सर्वजाती-जमातीमधील लोकांचे भोजन सर्वसाधारणपणे बाजरीची-ज्वारीची भाकरी, भात, दुध व डाळीची आमटी असे. तिखट, कांदा व भाकरी हा तर सामान्य लोकांच्या दैनंदिन जीवनातील एकमेव आहार होता. लोकांच्या दैनंदिन आहारात पेयांचाही वापर असे, पण यातील पेयांचा वापर समारंभ व खास उत्सवाच्या निमित्ताने केला जाई.
गावात मनोरंजनाची विविध साधने होती ते याप्रमाणे, तमाशा, विभिन्न खेळ, किर्तन, नाटक, कोल्हाटी व डोंबारी खेळ, हत्ती व रेड्यांची झुंझ, नंदीबैलवाल्यांचा खेळ. या काळात कोल्हाटी, गारोडी, नंदीबैलवाले, भवगारोडी, डोंबारी, दरवेशी व कलावंतीण इत्यादी कलाकार गावोगाव फिरून आपले पारंपारिक खेळ व नृत्य सादर करीत असत. यातून या लोकांची उपजीविका होत असे. समाजात मनोरंजनाची साधने गावापुरते मर्यादित असल्याने गावपातळीवर लोकनृत्याला याकाळात महत्वाचे स्थान होते. मुलांची गाणे, झिम्मा फुगडी, गोफ नृत्य, धनगर नृत्य, आदवासी नृत्य, फेरनृत्य, गोंधळ नृत्य व कोळी नृत्य ही केले जात होते. झिलकरी, हलगी, ढोलकी हे वाद्य वाजवून मनोररंजन केले जात, या मनोरंजनाच्या बदल्यात गावातील लोक यांना धान्य देत असत.
ग्राम पातळीवरील गुन्हे व शिक्षा:
राजद्रोह व फंदफितुरी हा सर्वात मोठा गंभीर गुन्हा समजले जावून सरकारविरोधी कृत्य मानले जात असे. राज्याच्या वोरोधात विश्वासघात, कट, मसलत, गोंधळ, बंड, शत्रूला जावून मिळणे, शत्रूकडे नोकरी करणे, हेरीगिरी, शत्रूला मदत, दगाबाजी करणे इत्यादी गुन्हे राजद्रोह म्हणून समजले जात होते. उदा. भिकाजी कृष्ण यांचे नावे सनद की कर्यात आटपाडी येथील देशपांडे हैदर याजकडे जाऊन चाकरीस राहिला आहे.दुसऱ्याकडे जावून चाकरीस राहणे म्हणजे तो राज्याविरोधी गुन्हा समजला जाई. जनहित संबंधातील गुन्ह्यामध्ये लबाडी, ठगबाजी, खोटा आरोप, खोटी फिर्याद, खोटी साक्ष, बनावट कागदपत्र तयार करणे आणि चहाडी करणे इत्यादी गुन्ह्यांचा समावेश होता. उदा.मौजे नागेवाडी येथील पाटीलकी मुलनागनाक महाराची होती. नागेवाडी येथील नागवडसिद्ध ह्या देवाची पूजा करून राहण्यासाठी धांडेधर व गौडाली येथील मोरोजी आणि चिंतामणी हे दोन गुरव आणले. ह्या दोघांनी मारेचुरे व फसवणूक करून नागेवाडी येथील पाटीलकी बळकावली. या व्यतिरिक्त चोरी करणे, दरोडा टाकणे, लुटालूट करणे, फसवणूक करणे आदी मालमत्ता संबंधी गुन्हेही घडत असत. उदा. मोकदम मौजे परबारे परगणे गंडापूर यांनी हरबाजी कोनेर कुलकर्णी व जोशी मौजे मजकूर याचा चुलतभाऊ शामराज व त्याचा पुत्र असे दोघे दरवडा घालून जीवे मारून घरांतील मालमवेशी नेली यास्तव.ग्रामीण समाज हा अनेक नियमांनी बांधलेला होता. प्रत्येक व्यक्ती रूढी परंपरेनुसार आपले धार्मिक व्यवहार करीत आणि रूढी परंपरेप्रमाणेच आचरण केले पाहिजे असे सरकारचे नियम होते. रूढी परंपरेविरुद्ध वागल्यास तो गुन्हा समजला जात असे. उदा. लख्या ठाकूर नाशिककर हा श्री त्रिंबकेश्वराचे देवळांत गेला, यास्तव त्यास अटकाविला आहे म्हणोन विदित जाहाले; ऐशास ठाकूर मजकुराकडे गुन्हेगारीबद्दल ऐवज रुपये एक हजार रुपये घेऊन त्यास सोडावयाची आज्ञा केली असे तरी सदरहू हजार रुपये घेऊन तालुके त्रिंबक येथील हिशोबी जमा करणे.याकाळात विविध प्रकारचे सामाजिक आणि नैतिक गुन्हे प्रचलित होते. यामध्ये लग्न, बदकर्म, बलात्कार, गर्भपात, गर्भधारण, दारू पिणे, दारूची निर्मिती करणे आणि गोवध आदी गुन्ह्याचा समावेश होता. उदा. राघु बिन मल्हारी कोळी मौजे कोलवडी याचे बाईकोने मानाजी बुरुड मौजे मारी रहात होता त्याचे लेकासी, रानात बद्कर्म करून बुरुड सुद्धा पळोन गेला. त्यास राघूचे बाईकोने बुरुडासी बद्कर्म केले.व्यक्तिगत संबंधी गुन्ह्यामध्ये खून, मारहाण, दुखापत करणे, जखमी करणे, आत्महत्या, बद्कर्म, अपहरण, पळवून नेणे व बलत्कार या गुन्ह्यांचा समावेश होतो. हे सर्व गुन्हे मानवी शरीराशी संबंधित आणि वैयक्तिक स्वरूपाचे असत. उदा. गंगी परदेशीण इणे आपला दादला सोमल घालून जीवे मारिला सबब अटकेत ठेवावयास किल्ले सिंहगड येथे पाठविली आहे. 
राजदंड आणि ब्रह्मदंड, मसाला, हरकी, गुन्हेगारी व सेरणीनुसार गुन्हेगारांना शिक्षा निश्चित झाल्यानंतर शिक्षेची विविध गुन्ह्यासाठी पैशाच्या स्वरुपात दंड करण्यात येत असे. अंमलबजावणी करण्याचे अधिकार मात्र साधारणपणे स्थानिक अधिकाऱ्यांना होता. त्याचबरोबर गुन्हेगारांना विविध गुन्ह्यासाठी विविध शिक्षा दिल्या जात होत्या. ते म्हणजे अटक करणे, पारिपत्य करणे, बहिष्कृत करणे, प्रायश्चित करणे, बंदोबस्त करणे, वतनाची जप्ती, मालमत्ता जप्त करणे, ताकीद देणे, गावाबाहेर काढून देणे, देशाबाहेर काढणे, तोफेच्या तोंडी देणे, हत्तीच्या पायी देणे, मृत्युदंड, फाशी देणे, कडेलोट करणे, तुरुंवास, ओलीस ठेवणे, जमीन देणे, हवाला घेणे, अवयव तोडणे इत्यादी. गावातील लोकांना शिक्षा कारण्याचे कारण म्हणजे गुन्हा करण्यापासून रोखणे किंवा परावृत्त करून गुन्हेगारांवर  दहशत बसविणे हा उद्देश होता. त्यासाठी गुन्हेगारांना लोकांच्या समोर जाहीररीत्या फाशी देण्यात येई. गुन्हेगारांची शिक्षा निश्चित झाल्यानंतर शिक्षेची अंमलबजावणी करण्याचे अधिकार मात्र स्थानिक अधिकाऱ्यांना देण्यात आलेले होते. उदा. १) १६४१ ची घटना, सोनप्रभू बिन कोडप्रभू धर्माधिकारी आणि त्याची बायको हे गोघे कोकणात गेले, तेथे त्यांनी शुद्राच्या हातचे अन्नग्रहण केले, त्यामुळे त्यांना ब्राह्मणांनी वाळीत टाकले. २) अंदुखान याने कर्नाटक प्रांती काटकाई करून बंडे करीत होता, त्यास धरून आणून तोफेचे तोंडी दिला. ३) तळेगावकर सिकलगार मुसलमान ब्राह्मणाची बायको घात घातली. त्यास धरून आणून हत्तीच्या पायी बांधून ठार मारला. तसेच जातीवर अवलंबून ही शिक्षा दिली जात होती. एकाच गुन्ह्यासाठी ब्राह्मणांना अगदी सौम्य तर शूद्रांना मृत्यूदंडाची शिक्षा दिली जाई. न्यायदानाचे काम धर्म, रूढी, परंपरा चालीरीती, जाती व जाती नियम याप्रमाणे चालत असे.
न्यायसंस्था (गोतसभा व मजलीस):
स्थानिक न्यायव्यवस्थेत जी न्यायसंस्था होती त्यास मजलिस असे म्हंटले जाई. ग्राम मजलिस हे स्थानीय न्यायव्यवस्थेतील सर्वात कनिष्ठ न्यायालय होते. ग्राम मजलिसमध्ये मुकादम, चौगुल, मुजुमदार हे अधिकारी महत्वाची भूमिका बजावत असत. ग्राम मजलिसचे अधिकरी आणि कार्यक्षेत्र त्या-त्या ग्रामपुरतेच मर्यादित होते. ग्रामाधिकारी बरोबरच बलुतेदार, थळकरी, उपरे आणि इतर रयत उपस्थित राहत असत. तंटयाचे स्वरूप पाहून ते संबंधित बलुतेदारांना पाचारण करत असत. न्यायनिवाड्यात बारा बालूतेदारापैकी महार हा घटक अत्यंत महत्वाचा होता. गावाच्या सीमेचा तंटा महार बलुत्याच्या सहभागाशिवाय सोडविला जात नसे. मजलिस बहुदा गावाच्या वडाच्या अथवा पिंपळाच्या झालाखाली पारावर, एखाद्या मंदिरात, चावडीवर, पाटलाच्या घरी अथवा तिर्थस्थळाच्या ठिकाणी भरविण्यात येत असे. मजलिसच्या सदस्यापैकी कोणाकडेही तक्रार नोंदविता येत असे. फिर्याद नोंदवलेल्या कागदपत्रांना करीनाअसे म्हंटले जाई. तर माजलीसच्या प्रमुखाला ‘सभानायकम्हणत. एखदा खटला कोणत्या सभेपुढे चालवायचा हे निश्चित झाल्यावर करीना अथवा तकरीरलिहिली जात असे. वादी-प्रतीवाद्यांमध्ये स्वतंत्र वेगळे तकरीर लिहिले जात. तकरीर दाखल झाल्यानंतर उभयपक्षीकडून राजीनामे लिहून घेतले जाई. करीन्यातील तक्रार मजलीसपुढे वाचून सांगितल्या नंतर करीन्यात नामोल्लेख असलेल्या व्यक्तीस बाजू मांडण्याची संधी दिली जाई. जर आरोपी गुन्हा मान्य केला तर मजलिसचे काम लवकर पूर्ण होत असे.
गोतसभेने दिलेल्या दोन पिढ्यापूर्वीच्या निकाल पत्रास जयपत्र म्हंटले जाई. न्यायदान करणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यात काझी सारख्या मुस्लीम व्यक्तीलाही न्यायनिवाडयात महत्वाचे स्थान होते. न्यायदान करत असताना धर्मिक ग्रंथांचा आधार घेतला जात असे. न्यायव्यवस्थेतील शेवटचा पर्याय म्हणजे दिव्य होय. न्यायदान करीत असताना गोतसभा आणि पंचायत लेखी पुरावा किंवा साक्ष यावर भर देवून तंट्याचा निर्णय देत असत, परंतु वादी-प्रतिवादी लेखी पुरावा व साक्ष देण्यास असमर्थ ठरले तर संबंधित तंट्याचा निकाल दिव्य करून दिले जाई. दिव्य करण्यासाठी निवडलेली जागा सामान्यपणे गावाची पांढरी, मशिद, मंदिर, नदीचा संगम अशा ठिकाणी असे. गोतसभा, जातपंचायत, पाटील, कुलकर्णी, बलुतेदार व मुकदम यांच्या समोर राहून दिव्य करावे लागे. दिव्य दोन्ही पक्षातील लोकांसाठी असे. दोन्ही पक्षातील लोकांना जलदिव्य, अग्नीदिव्य, ऐरणीदिव्य, धारदिव्य, शितलदिव्य, तप्तकटाक्षदिव्य, दैव्यदिव्य या दिव्यापैकी एक दिव्य करून सिद्ध करावे लागत असे. दिव्य झाल्यानंतर वादी-प्रतिवादीकडून गुन्ह्यानुसार रक्कमेच्या स्वरुपात शेरनी’, ‘हरकीगुन्हेगारीआकारण्यात येत असे. गोतसभेने दिलेल्या निवाडयाला गोत महजरअसे म्हणत. माजलीसच्या लिखाणाचे काम संपल्यानंतर उपस्थित असलेल्यांची नावे आणि त्यांच्या जातीनुसार असलेल्या निशाण्या (उदा. शिंपी-कात्री) त्याच शाईने काढले जात होते.
समाजाचे परस्परावलंबन:  
शेतकऱ्यांची गरज भागविणे हा बलुता पद्धतीचा मुख्य भाग असे; हे खरे असले तरी हीच पद्धत सामाजिक अभिसरणाची प्रभावी वाहिनीही ठरली. समाजाच्या परस्परावलंबनातून निर्माण झालेले व्यवहार हे प्रगतिचे घोतक बनले होते. बलूतेदाराकडून सर्व गावकऱ्यांना जीवन उपयोगी वस्तूंचा पुरवठा होत असल्यामुळे प्रत्येक गावात या मंडळीचे वास्तव्य अपरिहार्य ठरले. ज्यांचे बलुतेदारामध्ये समावेश होत नव्हते असे वैद्य, शिक्षक, गवंडी, व्यापारी, पुरोहित, सावकार व सर्व अलुतेदार यांच्या एकत्रीकरणाने ग्रामरचना व समाजजीवन सिद्ध होत असे. अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण व आरोग्य हे प्रत्येक माणसाच्या मुलभूत गरजा मानल्या जातात. त्यांच्या पूर्ततेसाठी समाजजीवनाचे धागे विणले जातात. अन्नाची गरज शेकरी भागवत असला तरी इतर गरजांसाठी त्याला दुसऱ्यावर अवलंबून रहावे लागत असे. साळी-सणगर हे अलुतेदार वस्त्र निर्माण करीत असले तरी त्यांच्या गरजा इतरांसारख्या होत्या. घरे, मंदिरे, धर्मशाळा बांधणारे, आजाऱ्याना  रोगमुक्त करणारे अशा प्रत्येकालाच इतरांकडून वस्तू व सेवा घेण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे गावातल्या गावात राहणारे सर्व गावकरी परस्परावलंबनाच्या धाग्यांनी एकमेकांना घट्ट बांधलेले होते. त्यातूनच अनेक सांस्कृतिक प्रथा परंपरांचा उदय झाला. थोडक्यात, परस्परावलंबन हे विविधतेतील एकता साधणारे प्रभावी मध्यम बनले. म्हणजेच गरजांची पूर्तता करीत सामाजिक जीवन जगायचे या भावनेतून सर्वसमावेशक भूमिकेतून ग्रामव्यवस्थेतील समाजजीवन स्थिर होण्यास मदत झाली. ग्राम स्वावलंबन आणि ग्रामांतर्गत परस्परावलंबन या दोन तत्वांनी त्या समाजजीवनास कित्येक वर्षे स्थैर्य मिळून दिल्याचे दिसून येते.
धार्मिक जीवन :
ग्रामदेवता ही गावाची रक्षक देवता मानले जात असे. ग्रामदेवतांमध्ये तुकाई, नानाई, मरीआई, म्हसोबा, भैरव इत्यादी स्त्री पुरुष देवतांचा समावेश होता. लोकांमध्ये धार्मिक कल्पना व लोकब्रह्म विचित्र असत. ग्रामीण समाजावर अवतारवादाचा प्रचंड पगडा होता. साक्षात्कार, दृष्ठांत, स्वप्नात दर्शन होणे यास धार्मिकदृष्टीने महत्व दिले जात होते. नवस, सायास, मुहूर्त, शुभाशुभ कल्पना, चमत्कार, भूतबाधा, शपथ व अंगात येणे असे लोकब्रह्म समाजात प्रचलित होते. संत-महंत, विद्वान, साधू, संन्यासी, फकीर यांना लोकांच्या धार्मिक जीवनात खूप महत्व होते. त्याचबरोबर तुकाराम, रामदास, मोरया, गोसावी, वामन बाबा, निंबाजी बाबा, परमानंद बाबा, बोधले बाबा, अचलपुरी गोसावी, बाबा याकूत, मौनी बाबा, शेख महमद, बहिणाबाई, वेणाबाई, अंबाबाई या स्त्री-पुरुष संत तर ज्योतिषी, पुराणिक व कीर्तनकार यांच्या विचारांचाही प्रभाव समाजावर होता.
ब्राह्मणेत्तर समाजात पूजाअर्चा संबंधात भिन्नत्व असलेले पाहावयास मिळते. यांच्या देवता ह्या बहुतांशी ग्रामदेवता असत. या देवतांची उपासना सण, उत्सव, जत्रे ह्या वेगळया असत. त्यांच्या देवतांना दारू, बकरी, मेंढा, रेडा व बैल यांचे बळी देण्याची पद्धत होती. देवतांना प्रसन्न करण्यासाठी नवस बोलत असत. त्याचबरोबर मराठा काळात किल्ले, धरण, बांधकाम करीत असतांना पशुबळी किंवा आर देण्याची प्रथा होती. ईस्लामी पीरांना आणि दर्ग्याच्या ठिकाणी नवसाप्रमाणे पशुबळी दिले जात होते. तत्कालीन समाजात असलेले भागतांचे अस्तित्व, बुवाबाजीचे स्त्रोत, स्वामीं किंवा महाराजांच्या शब्दाला मानने म्हणजे त्यावेळीची श्रद्धा मानले जाई. या काळातील ग्रामजीवनात लोकांचे दैनंदिन जीवन श्रद्धा व कर्मकांडानी व्यापलेले होते.
खेड्यातील सण व उत्सव:
खेड्यातील शेतीप्रधान जीवनात सण आणि उत्सवांना धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक जीवनास अत्यंत महत्व होते. गावातील लोक वर्षातील ठराविक दिवशी एकत्र येत. यास जत्रा, मेळा असे संबोधले जाई. पूजा अर्चा करून तो दिवस व्यथित करीत असत. गावातील सण मोठया दिमाखाने साजरा करत, या सणांमध्ये पाडवा, होळी, शिमगा, अक्षयतृतीया, रामनवमी, नागपंचमी, विजयादशमी, वसंतपंचमी, गणेश चतुर्थी, दसरा, दिवाळी व महाशिवरात्री यांचा समावेश होता. मुस्लीम समाजात मोहरम, पिरांचा उत्सव, रमजान व बकरी ईद यांना पवित्र स्थान होते. आदिवासी समाजातील लोक गांव दिवाळी, नोवापुंडम हे सण मोठ्याने साजरा करत असत. त्याचबरोबर यात्रेच्या निमित्ताने गावामध्ये अनेक करमणुकीचे कार्यक्रमही आयोजित केले जात होते. यात्रांमध्ये नर्तकी, सापवाले, विदुषक, जादुगार, गारुडी या लोकांनी आपली कला दाखवल्याने लोकांची करमणूक होई. यात्रांमधील विशेष आकर्षक म्हणजे बाजार. बाजारात अनेक प्रकारची खेळणी, कपडे, मेवा, मिठाई आणि इतर अनेक वस्तू विकण्यासाठी येत असत. उदा. कुणकेश्वर येथील कुनकेश्वरी यात्रा. या गावातील मंदिराचे बांधकाम आणि त्याच्या घूमटाचे बांधकाम एका मुस्लीम व्यापाऱ्याने केले. १६७० मध्ये शिवाजीने या मंदिराची दुरुस्ती केली होती. माघ महिन्याच्या शेवटच्या दिवशी कुणकेश्वर यात्रा भरून पुढे ही यात्रा जवळजवळ सात दिवसापर्यंत चालू राही. यात्रेमध्ये साधारण यात्रेकरू उपस्थित राहत असत. जोशी व गुरव या वर्गाला समाजात धर्मिक विधी पार पडायचा अधिकार होता. तसेच गावात रूढी व प्रथा पाळणाऱ्या वर्गास पंचांग सांगण्याचे कार्यही करत असत. तसेच मंदिराची संपूर्ण व्यवस्था करण्याची जाबदारी या वर्गाकडे असे. या मोबदल्यात त्यांना सरकारकडून अनुदान व सवलतीही दिल्या जात होत्या.
मिश्रित सांस्कृती व समन्वय:
गावातील सामाजिक आणि सांस्कृतिक लोकजीवनात प्रामुख्याने हिंदू मुस्लिम या दोन संस्कृती परस्परपूरक म्हणून ओळखले जात होते. खेडेगावात देशमुख व देसाई ह्या पदावर अनेक मुस्लिम लोक होते. शिवकालीन प्रशासनात ही अनेक मुसलमान अधिकारी होते. गावातील प्रत्येक धार्मिक व सामाजिक व्यवहारात मुस्लिम लोकांचा सहभाग असे. त्याचबरोबर अनेक धर्मांतरीत मुस्लिम लोक पूर्वीचे प्रथा परंपरा पळत असत. उदा. नेवासे येथील मोहिते घराण्यातील काही लोक इस्लाम धर्म स्वीकारला होता. ते मोहिनिराजाच्या देवळात होणाऱ्या उत्सवांत सातत्याने हजर राहत होते. हिंदू-मुस्लिम या दोन्ही संस्कृती पूर्वीपासून एकत्र नांदत असल्याकारणाने त्या दोन्ही संस्कृतींचे प्रभाव एकमेकांवर राहिला आहे. हिंदू प्रथेप्रमाणे लहान मुलाच्या कनात आझान हे उपनयन विधीसारखा मकतब विधीकेला जाऊ लागला. त्याचप्रमाणे जवळचा नातेवाईक मृत्यू पावल्यानंतर मुंडन करणे, मृताचे स्मृतिदिन करणे, मृत माणसाच्या घरात समारंभपूर्वक दिवे लावणे या हिंदू प्रथा इस्लाममध्ये सुरु झाल्या. आहार व पोशाखामध्ये ही या दोन्ही धर्मात एकमेकांमध्ये स्वीकारला गेला. यावरून खेड्यातील समजजीवन मिश्रित व समन्वयाचे होते हे दिसून येते.
सारांश:
           मराठेकालीन स्थानिक घटक म्हणजे ग्राम किंवा खेडे होय. याकाळातील स्थानिक इतिहासात स्वतंत्र स्थानिक घटक व गावगाड्यामुळे खेड्यास अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले. मराठेकालीन गाव हे सर्वांगीण व्यवस्थेच्या दृष्टीने स्वयंपूर्ण होते. ग्रामरचनेतील व्यवहार सुविधा व सेवा या दोन घटकावर आधारित असल्याने संपूर्ण खेड्याच्या विकास प्रक्रियेस एक वेगळे महत्व होते. समाजव्यवस्थेतील प्रत्येक व्यक्ती एकमेकांवर अवलंबून होती. शेती हे गावातील अर्थव्यवस्थतील केंद्रभूत घटक असल्याने उद्योग व व्यवसाय शेतीशी निगडीत होते. त्यामुळे या अर्थव्यवस्थेत मोडणारा घटक बलुतेदार आणि अलूतेदार वर्गाची गावातील समजरचना, अर्थव्यवस्था, प्रशासनामध्ये महत्वाची भुमिका राहिली आहे. गावातील समाजरचना ही व्यवसायावर होती, त्यामुळे सातत्याने एकमेकांशी संबध येत राहिल्याने सामाजिक भावना दृढ व समन्वयाची बनण्यास मदत झाली. पुढील काळात, पुरोगामी महाराष्ट्रातील सामाजिक समन्वयाची विचारसारणी टिकून राहण्यामध्ये मराठेकलीन स्थानिक व्यवस्थेचे मूळ आहे असे म्हणू शकतो.
संदर्भ सूची:
अत्रे त्र्यं. ना, गावगाडा, पुणे, वरदा प्रकाशन, १९९५, पृ, १८१
सरदेसाई गो. स., मराठी रियासत, उत्तर भाग, पृ.४७०
गवळी पी. ए., पेशवेकालीन महाराष्ट्र, कैलास पब्लिकेशन, औरंगाबाद, २०००, पृ. १२९-१३०
गवळी पी. ए., मराठ्यांचा इतिहास, पृ.९९
सरदेसाई गो. स., मराठी रियासत, भाग-२, पृ.५१-५४
दिवेकर स. म.(सं.), कवींद्र परमानंदकृत, शिवभारत, पृ.१९१-१९४
देशमुख शारदा, शिवकालीन व पेशवेकालीन स्त्रीजीवन, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे, १९७३, पृ.१०७-११० 
साळवे दीपा, मराठेकालीन दागदागिने आणि अलंकार, कैलास पब्लिकेशन, औरंगाबाद, २००७, ८१
खोबरेकर वि. गो., मराठेकालीन कोकणचे सामाजिक व आर्थिक जीवन, मुंबई मराठी ग्रंथालय,मुंबई, १९९७, पृ.३४
जोशी शं. ना., मराठेकालीन समाजदर्शन, पुणे, अनाथ विध्यार्थी गृह प्रकाशन, १९६०, पृ. १२२
Gune V.T., The Judicial System of the Maratha, Pune, Deccan College, 1953, pp. 46
Ghurye G.S., Caste and Race in India, Bombay Popular Prakashan, 1969, P. 201-202
कर्वे इरावती, मराठी लोकन्ची संस्कृती, पुणे, देशमुख & कंपनी , १९६२, पृ. २०
ओतूरकर रा. वि., पेशवेकालीन सामाजिक  व आर्थिक पत्रव्यवहार, पुणे, १९५०
कठारे अनिल, शिवकाळ व पेशवाईतील महारांचा इतिहास, सुधीर प्रकाशन, वर्धा, २००८,पृ.१८८
कर्णिक शशिकांत, पेशवेकालीन महाराष्ट्र, इतिहास संशोधन मंडळ, मुंबई, १९८८,१४३.
कुलकर्णी अ. रा., शिवकालीन महारष्ट्र, राजहंस प्रकाशन, पुणे. १९९७. पृ.४१, २५१
वाड ग. ची.(संपा), सातारकर राजे व पेशवे ह्यांच्या रोजनिशीतील निवडक उतारे, (पेशवे रोजनिशी) खंड-7, पुणे, डेक्कन व्हर्नाक्युलर ट्रान्स्लेशन सोसायटी, १९९१, नोंद ५६९.
गवळी पी. ए., पेशवेकालीन समाज व जातीय संघर्ष, प्रचार प्रकाशन, कोल्हापूर, १९८२, पृ.६९
बेंद्रे वा. सि., (संपा), महाराष्ट्रेतिहास साधने, विभाग ३, मुंबई, मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय, १९३७, लेख ५१०, पृ.११
श्रीवास्तव ए.एल., मेडीअवल इंडियन कल्चर, पृ. १२९
मेजर जेविर्सन, कोकणाचा इतिहास, पृ. १४६
आपटे डी.व्ही., महाराष्ट्र इतिहास मंजिरी, पृ. ९७
James Grant Duff, The Marathas, Longman press, London
बाळ कृष्ण, द आर्यन बुक डेपो, कोल्हापूर, १९४०

सहा. प्राध्यापक, विभागप्रमुख, इतिहास विभाग, पी.डी. व्ही. महाविद्यालय, तासगाव
सहा. प्राध्यापक, इतिहास विभाग, एल. बी. एस. कॉलेज, सातारा
मराठेकालीन ग्राम: रचना व जीवन  

डॉ. हाजी नदाफ,[1] डॉ. दिपक जाधव[2]

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home