Friday, 17 January 2025

भारतातील स्त्रीवादी विचाराची प्रस्तुतता, चळवळ आणि इतिहासलेखन

 

भारतातील स्त्रीवादी विचाराची प्रस्तुतता, चळवळ आणि इतिहासलेखन


प्रस्तावना:

              स्त्री अस्मिता ही एक व्यक्तिक किंवा सांस्कृतिक ओळख असली तरी, तिच्या अधिक स्वायत्ततेसाठी स्त्रीवादी चळवळीचा आधार आवश्यक आहे. स्त्रीवाद हा महिलांना त्यांच्या अस्मितेबाबत जागरूक करतो. समाजात समानतेसाठीच्या लढ्यात त्यांना सामील होण्याचं सामर्थ्य देतो. स्त्री चळवळीचा पाया, सुरुवातीपासूनच स्त्री-पुरुष असमानतेच्या अन्यायावर आधारित आहे. संपूर्ण इतिहासात स्त्री आणि पुरुष यांच्यातील संबंध हे पितृसत्ताक समाजाचे राहिले आहेत. भारतातील स्त्रीवादी चळवळीचा इतिहास खूपच समृद्ध आहे. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, पंडिता रमाबाई यांसारख्या समाज सुधारकांनी स्त्रियांच्या शिक्षण, विवाह प्रथा आणि सामाजिक स्थिती सुधारण्यासाठी लढा दिला. स्वातंत्र्यसंग्राम काळातही स्त्रियांनी सक्रियपणे भाग घेतला आणि राष्ट्रीय चळवळीसह स्त्री मुक्तीच्या चळवळीलाही चालना दिली.

              आजही भारतात स्त्रीवादी चळवळीचे अनेक स्वरूपात कार्य चालू आहे. स्त्रीवादी संस्था, कार्यकर्ते आणि समाजसेवक यांच्या माध्यमातून स्त्रियांच्या मुद्द्यांना आवाज दिला जातो. भारतातील आजच्या स्त्रीवादी लेखन प्रवाहात हा आवाज मोठ्याप्रमाणात उठवला जात आहे. त्यामध्ये स्त्रीवादी इतिहासलेखनाची भूमिका ही महत्वाची राहिली आहे. स्रीवादी इतिहासलेखन म्हणजे स्रीयांच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना होय. इतिहासाच्या लेखनात पुरुषवादी दृष्टिकोनाचाच प्रभाव अधिक होता. म्हणून त्यावर पुनर्विचार करावा आणि त्यात स्त्रियांचा अंतर्भाव करावा, अशी भूमिका स्त्रीवादी इतिहासलेखन करणाऱ्या विचारवंतांनी विचार मांडला आहे. या विचारावर प्रकाश टाकण्यासाठी शोधनिबंधात प्रस्तुत विषयाची निवड केली आहे.

स्त्रीवादी विचार, संकल्पना व अर्थ:

स्त्रीवाद (Feminism) ही एक सामाजिक, राजकीय, आणि बौद्धिक चळवळ आहे, ज्याचा उद्देश स्त्रियांना समान हक्क, संधी, आणि प्रतिष्ठा मिळवून देणे आहे. स्त्रीवादाच्या विचारधारेतून पुरुषप्रधान समाजव्यवस्थेत स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायाचा प्रतिकार आणि स्त्रियांच्या स्वातंत्र्याचा पुरस्कार केला जातो. मानवी  इतिहाच्या जडणघडणीत पुरुषांपेक्षा स्त्रियांना दुय्यम स्थान का आणि कसे आले याचे विश्लेषण, स्पष्टीकरण व ते नष्ट करण्यासाठी अवलंबण्याचे मार्ग, आव्हाने, चळवळी यांची मांडणी व अभ्यास म्हणजे स्त्रीवाद होय. स्त्रीवाद ही एक समाजपरिवर्तन घडवू पाहणारी 'राजकीय' जाणीव आहे. प्रत्येक ऐतिहासिक टप्प्यावर मानवी समाजामध्ये स्त्री-पुरुषांमध्ये विशिष्ट प्रकारचा सत्तासंबंध जोडला जातो हे भान स्त्रीवादी जाणिवेमध्ये असते. लिंगभेदाधिष्ठित विषमता जीवशास्त्रीय म्हणजे निसर्गानुसारी नसते तर मानवी संस्कृतीत घडविली जाते असे स्त्रीवादी मानतात. जात, वंश, वर्ग, धर्म आदी संरचनांप्रमाणेच पुरुषप्रधानता (Patriarchy) नावाची संरचना असते असा दावा स्त्रीवादी विचारप्रणाली करते. पुरुषप्रधानता आणि लिंगभाव (Gender) ह्या दोहोंची घडण स्त्रियांच्या (लैंगिक, सामाजिक, आर्थिक) श्रमांच्या अपहरणातून सिद्ध होते. ह्यातूनच पुरुषी वर्चस्वाच्या मूल्यव्यवस्थेचा डोलारा उभारला जातो. लिंगभावाची जडणघडण (Gender Construction) अनेक संरचनांमधून आकार घेत असते म्हणून स्त्रीवादी जाणीव ज्ञानाच्या प्रत्येक शाखेशी संलग्र विचार आणि कृती करण्याचा प्रयत्न करते. आपल्या 'स्व'ची अथवा 'अहं'ची जडणघडण कशी झाली आहे ह्याचा शोध घेण्यापासून ते आंतरराष्ट्रीय राजकारणापर्यंत स्त्रीवादाला सर्वस्पर्शी होणे भाग आहे. स्त्रीवादी जाणीव म्हणजे एकच एक साचा अथवा एकाकार (Monolith) मात्र नसतो. इतिहासाच्या भिन्न टप्प्यांवर, विविध परिप्रेक्ष्यांतून स्त्रीवादी भान घडत असते.

स्त्रीवादाचे प्रकार:

१.      उदारमतवादी स्त्रीवाद (Liberal Feminism): हा स्त्रीवादाचा सर्वात जुना प्रकार आहे, ज्यामध्ये कायद्याद्वारे आणि संस्थात्मक सुधारणा करून स्त्रियांना समान हक्क मिळवून देण्याचा आग्रह धरला जातो. शिक्षण, मतदानाचा हक्क, रोजगारामध्ये समानता या गोष्टींवर याचा भर असतो.

२.      मार्क्सवादी स्त्रीवाद (Marxist Feminism): मार्क्सवादी विचारधारेवर आधारित हा स्त्रीवाद आहे. या विचारानुसार, महिलांवरील शोषणाचे मुळ कारण आर्थिक असमानता आहे, विशेषतः भांडवलशाही. यासाठी सामाजिक व्यवस्था बदलून महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र बनवणे गरजेचे आहे.

३.      रॅडिकल स्त्रीवाद (Radical Feminism): हा स्त्रीवाद मूलगामी विचाराचा मानला जातो. हा स्त्रीवाद मानतो की पितृसत्ताक (patriarchal) समाज व्यवस्थेमुळे स्त्रियांवर नियंत्रण ठेवले जाते. समाजातील सर्व संस्था स्त्रियांचा तिरस्कार करतात, म्हणून त्यांना उखडून टाकणे आवश्यक आहे.

४.      उपरचनावादी स्त्रीवाद (Postmodern Feminism): हा स्त्रीवाद स्त्रीत्व आणि लिंग या संकल्पनांचा पुनर्विचार करतो. स्त्रीवाद हा एकच नसून तो विविध दृष्टिकोनांनी समृद्ध असतो, त्यामुळे प्रत्येक स्त्रीची अनुभूती वेगवेगळी असू शकते, असे या विचारसरणीचे मानणे आहे.

५.      आंतरविषयक स्त्रीवाद (Intersectional Feminism): स्त्रियांवरील शोषण विविध अस्मितांच्या आधारे वेगवेगळ्या प्रकारे होत असल्याचे दाखवणारा विचार, ज्यामध्ये वंश, वर्ग, कामुकता यांचा समावेश आहे.

६.      भारतातील स्त्रीवाद: भारतातील स्त्रीवादी चळवळी ब्रिटिश काळात सुरू झाल्या. समाजसुधारकांनी स्त्रियांवरील अत्याचार, बालविवाह, सतीप्रथा, विधवांचे शोषण यावर लक्ष केंद्रित केले. सावित्रीबाई फुले, ज्योतिबा फुले, पंडिता रमाबाई यांसारख्या व्यक्तींनी या चळवळीला चालना दिली.

भारतीय स्त्रीवादी चळवळीची पार्श्भूमी:

मध्ययुगीन कालखंडापासून आजपर्यंत भारताच्या सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक पद्धतीत अनेक बदल झाले; पण हे बदल पुरुषसत्ताक व्यवस्थेत झाले. स्त्रियांबद्दल परिस्थिती 'जैसे थे' राहिली. भारतीय स्त्रियांचा एक मोठा गट जात, धर्म, वर्ण, वंश यांनी निर्माण केलेले दुःख सोसत जगत होता. भारतीय स्त्रियांच्या सामाजिक स्थितीचा विचार करताना धर्म, संस्कृती, वर्ण, वर्ग, जात या सर्व संकल्पनांमुळे स्त्रियांच्या आयुष्यात कोणकोणते प्रश्न निर्माण झाले याचा विचार करावा लागतो.

१८व्या शतकापासून पाश्चात्त्य देशात स्त्रीवादी चळवळ सुरूवात झाली. मात्र  भारतातील स्त्रीवादी चळवळ विविध टप्प्यांमध्ये आणि विविध संदर्भात विकसित झाली आहे. ती केवळ स्त्रियांच्या हक्कांसाठी लढणारी चळवळ नसून, व्यापक सामाजिक बदलांची मागणी करणारी चळवळ आहे, ज्याने स्त्रियांच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक स्थितीत बदल घडवून आणला. भारतातील स्त्रीवादी चळवळीची सुरुवात १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात झाली. ब्रिटिश औपनिवेशिक कालखंडात समाजसुधारकांनी स्त्रियांच्या शिक्षण, बालविवाह, सती प्रथा, विधवा पुनर्विवाह यासारख्या विषयांवर भर दिला. राजा राममोहन रॉय, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, इश्‍वरचंद्र विद्यासागर यांसारख्या विचारवंतांनी स्त्रियांच्या हक्कांसाठी लढा दिला. २० व्या शतकात भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महिलांनी सक्रिय सहभाग घेतला, ज्यामुळे स्त्रीवादाला नवीन दिशा मिळाली. या काळात अनेक महिला नेत्यांनी राष्ट्रीय चळवळीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. महात्मा गांधींनी स्त्रियांना असहकार चळवळीत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले. त्याचबरोबर अनेक स्त्री नेत्या जसे की सरोजिनी नायडू, कमला देवी चट्टोपाध्याय यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. यामुळे स्वातंत्र्यानंतर भारतीय महिलांच्या परिस्थितीमध्ये सुधारणा होण्याच्या दिशेने पहिले पाऊल टाकले गेले.

१९६० नंतर अधिक सजगपणे मानवतावादी भान घेऊन नव्या विचारप्रणालीसह पुढे आली. या दशकात भारतात आधुनिक स्त्रीवादी चळवळ सुरू झाली. या काळात विविध महिलांच्या संघटनांनी स्त्री अधिकार, समान वेतन, बलात्कार, हुंडाबळी, आणि दहेजसारख्या प्रश्नांवर आवाज उठवायला सुरुवात केली. १९७५ हे वर्ष युनोने स्त्री-दशक म्हणून जाहीर केले. त्यानिमित्ताने संपूर्ण जगात स्त्री प्रश्नांविषयीचे विचारमंथन सुरू झाले. जगभरातील स्त्रियांचे आत्मभान जागृत करण्यासाठी ही घटना महत्त्वपूर्ण ठरली. भारतातही १९७५ नंतर स्त्रियांच्या सामाजिक स्थानाचा शोध सुरू झाला. ही स्त्रीवादी चळवळ पाश्चात्त्य आधुनिकवादाच्या प्रभावातून सुरू झालेली असली तरी भारतीय स्त्रीवादी चळवळीचा एक वेगळा असा इतिहास आहे. आणि जगातल्या सर्व स्त्रियांचे प्रश्न जरी सारखे असले तरी विविध देशांमधल्या धर्म, संस्कृती, राजकारण, समाजकारणात असलेल्या विविधतेमुळे स्त्री प्रश्नांमध्ये आणि त्या प्रश्नांच्या तीव्रतेत फरक पडलेला दिसतो

१९७०-८० च्या दशकात अनेक स्त्रीवादी लेखिका आणि विचारवंत समोर आल्या. या चळवळीने कायदे बदलण्यासाठी, सामाजिक व्यवस्थेतील विषमतेवर हल्ला करण्यासाठी मोठे योगदान दिले. १९८०-९० चे दशक: स्त्री आरक्षण, मातृत्व हक्क, कार्यस्थळी महिलांचे संरक्षण अशा विषयांवर चळवळींनी मोठे यश मिळवले. जागतिकीकरणाप्रमाणेच १९९० नंतर भारतात झालेल्या धार्मिक दंगलींत वांशिक दृष्टिकोनातून स्त्रियांच्या झालेल्या हत्या तसेच या दंगलीमध्ये स्त्रियांच्या वाढत्या सहभागामुळे अनेक नवे प्रश्न निर्माण झाले. या सगळ्या प्रश्नांची चर्चा स्त्रीवादी दृष्टिकोन अंगीकारलेल्या स्त्रियांनी आपआपल्या परीने केली आहे.

भारताने लोकशाही व्यवस्थेचा स्वीकार केला; पण या व्यवस्थेत मतपेटीचे राजकारण गतिशील झाले. जातीवर आधारित राजकीय समीकरणे गतिशील झाली. राजकारणातील गुंडगिरी वाढली. सामाजिक एकता नष्ट होऊ लागली आणि त्याचा विपरीत परिणाम स्त्रियांवर झाला. राजकीय पक्षांच्या महिला आघाड्या निर्माण झाल्या. परंतु भारतातील राजकीय पक्षांनी स्त्रीच्या पारंपरिक शक्तीचा उदो उदो करून हिंदुत्ववादी स्त्रीवाद निर्माण केला. या राजकीय पक्षांनी स्त्रियांचे स्वातंत्र्य गहाण टाकून त्यांना बंधनात जखडणे आवश्यक मानले. या सगळ्या संकल्पना नाकारून मानवतावादी स्त्रीवादाचा पुरस्कार करणे आवश्यक आहे. १९९१ नंतर जागतिकीकरणाचा रेटा वाढला आणि त्यात भारतातील बहुसंख्य चळवळी थंडावल्या, स्त्री चळवळ मंदावत गेली; पण अजूनही या चळवळीत धुगधुगी आहे. प्रश्नांची नवी आव्हाने निर्माण झाली आहेत.  त्यातून ही चळवळ प्रज्वलित व्हावी आणि नव्या सामाजिक प्रश्नांचे आव्हान स्वीकारण्याची क्षमता निर्माण व्हावी अशी अपेक्षा करायला हरकत नाही.

१९९० नंतरच्या काळात जागतिकीकरण, माहिती तंत्रज्ञान आणि शिक्षणामुळे स्त्रीवादी चळवळ अधिक व्यापक झाली. स्त्रियांच्या आरोग्य, शिक्षण, रोजगार, आणि राजकीय प्रतिनिधित्वावर विशेष लक्ष केंद्रित झाले. इंटरनेटच्या प्रसारामुळे स्त्रियांना आपल्या मुद्द्यांवर जागतिक पातळीवर आवाज उठविण्याची संधी मिळाली. आजची स्त्रीवादी चळवळ जागतिक चळवळीशी जोडलेली आहे. महिलांचे आरक्षण, ‘मिटू’ चळवळ, एलजीबीटीक्यू आयए प्लस  अधिकार, लैंगिक शोषणाच्या विरोधात लढा यांसारख्या मुद्द्यांवर कार्य सुरू आहे. त्याचबरोबर आजच्या काळात महिलांच्या हक्कांच्या चळवळींमध्ये सामाजिक माध्यमांचा मोठा सहभाग आहे. आजची स्त्रीवादी चळवळ स्थानिक व आंतरराष्ट्रीय मुद्यांवर काम करत असून, ती केवळ एक लिंग आधारित चळवळ राहिली नाही, तर विविध प्रकारच्या सामाजिक आणि आर्थिक विषमतेच्या विरोधातही लढणारी एक व्यापक चळवळ बनली आहे.

भारतातील स्त्रीवादी चळवळीची वैशिष्ट्ये:

  • भारतात स्त्रीवादी विचारांचे बीज प्राचीन काळापासूनच रोवले गेले होते. पण, ब्रिटिश काळात आणि स्वातंत्र्य संग्रामानंतर ही चळवळ अधिक सक्रिय झाली.
  • भारतातील स्त्रीवादी चळवळ एकसंध नाही. ती जाती, धर्म, वर्ग आणि प्रदेशानुसार भिन्न स्वरूपाची आहे.
  • स्त्रीवादी चळवळीने बालविवाह, सती प्रथा, हुंडा प्रथा आणि महिलांच्या शिक्षणाच्या अभावावर लढा दिला.
  • स्त्रियांना राजकीय प्रक्रियेत अधिक सक्रियपणे सहभागी करून घेण्यासाठी प्रयत्न केले.
  • स्त्रियांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी प्रयत्न केले.
  • महिलांच्या विरुद्ध होणाऱ्या सर्व प्रकारच्या हिंसाचाराविरुद्ध लढा दिला.

भारतातील स्त्रीवादी चळवळीचे आव्हान:

  • ग्रामीण भागातील स्त्रियांच्या समस्यांवर अधिक लक्ष केंद्रित करणे.
  • जाती आणि वर्णाच्या आधारे होणारी असमानता यावर लक्ष केंद्रित करणे.
  • लैंगिक अल्पसंख्यांकांच्या मुद्द्यांना अधिक प्राधान्य देणे.
  • नवीन पिढीमध्ये स्त्रीवादी विचारांची पेरणी करणे.

स्त्रीवादी इतिहासलेखन:

स्त्रीवादावरील इतिहासलेखन हे स्त्रीवादी विचारधारा, चळवळी आणि त्याच्या विविध टप्प्यांचे वर्णन करणारे अभ्यासाचे क्षेत्र आहे. स्त्रीवादाने अनेक प्रकारचे बदल घडवून आणले आहेत, विशेषतः महिलांच्या हक्कांच्या बाबतीत, आणि त्यामुळे यावरील इतिहासलेखन महत्त्वपूर्ण आहे. स्त्रीवाद हा कालानुसार आणि समाजानुसार बदललेला आहे, आणि त्याचे विविध प्रकार तसेच टप्पे आहेत. स्त्रीवादी इतिहासलेखन परंपरा ही एक विशिष्ट दृष्टीकोन आहे, जी स्त्रीवादी दृष्टीकोनातून ऐतिहासिक घटना आणि प्रक्रिया समजून घेण्याचा आणि विश्लेषण करण्याचा प्रयत्न करते. ही परंपरा प्रामुख्याने पारंपारिक इतिहासलेखनात दुर्लक्षित केलेल्या पैलूंवर लक्ष केंद्रित करते, विशेषत: स्त्रियांची भूमिका, त्यांचे अनुभव आणि त्यांचे संघर्ष. आधुनिक इतिहासलेखनाची ही एक महत्त्वाची शाखा मानली जाते, कारण ती केवळ ऐतिहासिक घटना पुन्हा समजून घेण्याचा प्रयत्न करत नाही तर समाजातील स्त्रियांची भूमिका एका नव्या दृष्टिकोनातून मांडते.

स्त्रीवादी इतिहासलेखनाची मुख्य उद्दिष्टे:

१.             पारंपारिक इतिहासलेखनात स्त्रियांची भूमिका अनेकदा दुय्यम मानली गेली आहे. स्त्रीवादी इतिहासकार स्त्रियांची भूमिका आणि योगदान मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करतात, जेणेकरून स्त्रियांचा इतिहास समाजासाठी त्यांचे वास्तविक योगदान प्रतिबिंबित करेल.

२.             स्त्रीवादी इतिहासलेखन लिंग-आधारित असमानता, भेदभाव आणि दडपशाहीचे विश्लेषण करते. हे ऐतिहासिकदृष्ट्या महिलांना उपेक्षित ठेवणाऱ्या सामाजिक संरचना आणि व्यवस्थांचा अभ्यास करते. विविधता आणि छेदनबिंदू: स्त्रीवादी इतिहासकार स्त्रियांच्या अनुभवांमधील विविधता समजून घेण्यावर भर देतात. ते वेगवेगळ्या वंश, वर्ग, धर्म आणि सांस्कृतिक पार्श्वभूमीतील स्त्रियांच्या अनुभवांचे विश्लेषण करतात आणि लिंग-आधारित असमानता इतर प्रकारच्या असमानतेशी कशी जोडलेली आहेत हे दाखवतात.

३.             स्त्रीवादी इतिहासकार पारंपारिक इतिहासलेखन हे पुरुषकेंद्रित आणि पक्षपाती मानतात. तिचा असा विश्वास आहे की, इतिहास हा पुरुषांनी आणि पुरुषांसाठी लिहिला गेला आहे, ज्यामुळे स्त्रियांचे योगदान कमी किंवा पूर्णपणे दुर्लक्षित केले जाते.

४.             या परंपरेत मातृत्व, घरगुती जीवन, लैंगिकता, स्त्रीवादी चळवळींचा विकास आणि स्त्रियांच्या हक्कांसाठी संघर्ष यासारख्या अनेक नवीन विचार आणि संकल्पना समाविष्ट आहेत.

स्त्रीवादी इतिहासलेखनातील टप्पे:

भारतातील स्त्रीवादी इतिहासलेखनाचा मुख्य उद्देश वसाहतवादी आणि पारंपारिक समाजातील स्त्रियांच्या स्थानाचे पुनर्मूल्यांकन करणे हा आहे. येथे ठळकपणे सावित्रीबाई फुले, ताराबाई शिंदे आणि इतर स्त्रीवाद्यांनी स्त्री मुक्ती आणि हक्कांसाठी आवाज उठवला. भारतीय स्त्रीवादी इतिहासकारांमध्ये, उमा चक्रवर्ती, गीता सेन, कुमकुम संगरी आणि राधा कुमार या विद्वानांनी ही परंपरा पुढे नेली. आणि या विचारप्रवाहातून स्त्रीवादाच्या इतिहासातील महत्त्वाचे टप्पे निर्माण होऊन ते पुढीलप्रमाणे विभागले गेले आहेत.

१.      १९ व्या शतक ते २० व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत मेरी वॉल्स्टोनक्राफ्ट, एलिझाबेथ कॅडी स्टॅन्टन, सुसन बी. अँथनी यांनी महत्वाचे योगदान दिले. यांच्या कार्यामुळे महिलांना मतदानाचा हक्क, (विशेषतः अमेरिका आणि इंग्लंडमध्ये) शिक्षण, आणि कायदेशीर समानता मिळवून देण्याचा प्रयत्न झाला. त्याचबरोबर याकाळात स्त्रियांच्या आर्थिक आणि सामाजिक हक्कांसाठीही आंदोलन केले गेले.

२.      १९६० ते १९८० या दोन दशकात लैंगिक समानतेचे मुद्दे अधिक पुढे आले, जसे की समान वेतन, प्रजननाधिकार, लैंगिक शोषणाविरोधातील लढाई, आणि महिलांच्या शरीरावर स्वतःचा अधिकार. याव्यतिरिक्त, महिलांच्या घरगुती जबाबदाऱ्या आणि व्यावसायिक जबाबदाऱ्या यामधील संघर्षालाही महत्त्व दिले गेले. सिमोन द बोवोआ, बेट्टी फ्रीडन, ग्लोरिया स्टाइनम यांनी विपुल लेखन करून प्रजननाधिकारांचे आंदोलन, "रोजगारातील समानता" आणि बलात्कारविरोधी कायदे विषयी विचार मांडले.

३.      १९९० ते २०१० या दरम्यानच्या तिसऱ्या टप्प्यात स्त्रीवादाने अधिक विविधता स्वीकारली. या लाटेत स्त्रीवादातील समावेशकतेवर भर दिला गेला, विशेषतः वंश, वर्ग, कामुकता आणि इतर अस्मितांच्या दृष्टीने विचार मांडण्यात आले. हे विचार पोस्ट-कोलोनियल विचारांसोबत एकत्र आले. या काळात किम्बर्ले क्रेन्शॉ, रेबेका वॉकर यांनी महत्त्वाचे कार्य केले आहे. यांनी विविध अस्मितांचा अंतर्भाव करणारा स्त्रीवाद, आंतरविषयकता या मुद्द्यांवर भर दिले.

४.      २०१० ते आजपर्यंतच्या लेखनप्रवाहात आधुनिक काळातील डिजिटल स्त्रीवाद, मि-टू सारख्या चळवळींनी स्त्रीवादाला नवे रूप दिले आहे. यामध्ये सोशल मीडियाचा प्रभाव मोठा असून, लैंगिक शोषण, हिंसा आणि समलिंगी अधिकारांसाठीही आवाज उठवला जातो. हे आवाज आपल्या लेखणीद्वारे उठवण्याचा कार्य ताराना बर्क, एम्मा वॉटसन यांनी केला आहे. यामध्ये ऑनलाइन सक्रियता, मि-टू हक्कांचा समावेश होतो. स्त्रीवादावरील इतिहासलेखनामध्ये वरील लाटा आणि विविध विचारधारांचा समावेश होतो. त्याच्या माध्यमातून महिलांच्या संघर्षाचा आणि सामाजिक परिवर्तनाच्या प्रक्रियेचा अभ्यास आज केला जात आहे.

इतिहास लेखनातील स्त्रीवादी दृष्टिकोन:

इतिहास लेखनात स्त्रीवादी दृष्टिकोणाने महिला इतिहासकारांनी नवीन पद्धतीने इतिहासाचा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला आहे. पारंपरिक इतिहास लेखनात मुख्यत्वे पुरुषांचे योगदान आणि त्यांच्या कामगिरीवरच अधिक लक्ष दिले जाते. पण स्त्रीवादी इतिहासकारांनी महिलांच्या योगदानावर प्रकाश टाकण्याचे काम केले आहे. हे काम पुढील दृष्टीकोनातून झाल्याचे दिसून येते.

  • स्त्रीवादी इतिहासकारांनी गृहिणींच्या कामाचे आर्थिक आणि सामाजिक महत्त्व दाखवून दिले आहे, जे पारंपरिक इतिहासात दुर्लक्षित होते.
  • स्त्रियांनी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये दिलेले योगदान, विशेषत: कामगार वर्गातील स्त्रियांची भूमिका, त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्याचा संघर्ष यांचा अभ्यास केला जातो.
  • इतिहासात लिंगभेदावर आधारित सत्ता कशी कार्यरत होती, हे स्पष्ट करण्यासाठी स्त्रीवादी इतिहासकारांनी विशेष काम केले आहे. त्यांनी स्त्रियांच्या दमनाचे विविध स्वरूप उलगडून दाखवले आहे.

स्त्रीवादी इतिहासकार आणि त्यांचे योगदान:

सिमोन डी ब्युवॉयर यांने "द सेकंड सेक्स" (१९४९) द्वारे महिलांच्या सामाजिक स्थितीवर आणि समाज महिलांना द्वितीय श्रेणीतील नागरिक म्हणून कसे वागवतो यावर खोलवर प्रतिबिंबित केले. “जेंडर ट्रबल" (१९९०) या ग्रंथात ज्युडिथ बटलर  यांनी स्त्रीवादाची समज एका नवीन स्तरावर घेऊन लिंग आणि ओळख या संकल्पनांवर आधारित कल्पना मांडल्या. गेर्डा लर्नर यांनी स्त्रीवादी इतिहासाच्या लेखनात महत्त्वपूर्ण योगदान दिले, विशेषत: स्त्रियांची भूमिका आणि त्यांचा इतिहास मुख्य प्रवाहात आणण्यासाठी योगदान दिले आहे. जॉन स्कॉट हिने स्त्रीवादी दृष्टिकोनातून इतिहासाच्या अभ्यासातील "Gender as a useful category of historical analysis" या संकल्पनेचा प्रचार केला. त्याचबरोबर गेरदा लर्नर हिने महिलांच्या इतिहासाचे स्वतंत्र अस्तित्व दाखवण्यासाठी केलेले कार्य महत्त्वपूर्ण आहे. तिचे "The Creation of Patriarchy" हे पुस्तक अत्यंत प्रभावी मानले जाते.

समारोप:

स्त्रीवादी विचार म्हणजे महिलांच्या अधिकारांसाठी आणि लिंग समानतेसाठी चालविलेल्या चळवळींचा एक सैद्धांतिक पाया आहे. स्त्रीवादी विचारांमुळे संपूर्ण समाजाच्या विचारसरणीत आणि स्त्रियांवरील दृष्टिकोनात क्रांतिकारी बदल घडून आले आहेत. स्त्रीवादी इतिहासलेखन इतिहासाला अधिक समग्र दृष्टिकोण देण्याचे काम करते. हे इतिहासाला अधिक न्याय्य आणि निःपक्षपाती बनवते. स्त्रीवादी इतिहासलेखन केवळ इतिहासकारांपुरते मर्यादित न राहता, सर्वच क्षेत्रातील लोकांनी याचा अभ्यास करणे आवश्यक आहे. स्त्रीवादी विचार आणि चळवळ ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे. या चळवळीमुळे स्त्रियांच्या जीवनात मोठा बदल घडून आला आहे. परंतु, अजूनही बरेच बदल करायचे राहिले आहे. स्त्रीवादी चळवळीला नवीन आव्हानांचा सामना करावा लागत आहे. या आव्हानांना तोंड देण्यासाठी सर्व स्तरावरून प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर आजच्या स्थितीला भारतातील स्त्रीवादी चळवळीने आपले उद्देश्य साध्य केले आहे का? भारतातील स्त्रीवादी आधुनिक युगात स्त्रीवादी चळवळीला कोणत्या नवीन आव्हानांचा सामना करावा लागत आहे? यावरही चिंतन करणे आवश्यक आहे. तरीही भारतातील स्त्रीवादी विचार, चळवळ व लेखनाची भूमिका आज महत्वाची राहिले असल्याचे दिसते. 

संदर्भ सूची:

१.             भागवत विद्युत, स्त्री-प्रश्नांची वाटचाल, प्रतिमा प्रकाशन, पुणे, २००४

२.             महाजन वंदना, स्त्रीवाद आणि समाज परिवर्तन, अथर्व प्रकाशन, धुळे, २०२३

३.             गोखले करुणा, सिमोन दे बोव्हार,  “द सेकण्ड  सेक्स ”, पद्मगंध पब्लिकेशन, पुणे, २०१०

४.             https://mr.wikipedia. wikipedia.org/wiki/मी_टू_मोहीम

५.             https://mr.wikipedia. org/wiki/स्त्रीवादी_इतिहासलेखन

६.             https://www.researchgate.net/profile/Vasanti-Rasam/publication/299431090_FEMINISIM_NEW_ARTICAL_MArathi

७.             https://edukemy.com/blog/womens-movement-in-india-modern-history-notes/

८.             Nadaf Haji, स्त्री अस्मितेचा अविष्कार: 19 वे शतक, Mane Ranjit, Contribution of Women in India's Struggle for Freedom, Publisher, Principal Dr. Babasaheb Ambedkar College, Peth Vadgaon, ISBN-978-81-931944-0-9, 2018.

९.             Patil Padmaja, Bharatiya Itihasatil Striya, Phadake Publication, Kolhapur, 2011