Friday, 3 May 2024

भारतीय इतिहासलेखन आणि सबाल्टर्न इतिहासलेखन परंपरा Indian historiography and subaltern historiographic tradition

 


भारतीय इतिहासलेखन आणि सबाल्टर्न इतिहासलेखन परंपरा


प्रस्तावना:

भारतीय इतिहासातील दुर्लक्षित गटाला केंद्रस्थानी आणून इतिहासाची पुनर्मांडणी करण्याचे काम वंचित इतिहासानी केली. भारतात वंचितांच्या कर्तुत्वाला केंद्रस्थानी ठेवून वंचित इतिहासकारांनी ‘सबाल्टर्न हिस्ट्रीचा’ प्रकल्प राबविला. या प्रकल्प अभ्यासातून निरनिराळ्या भागातील आदिवासी, स्त्रिया, शेतकरी, कामगारांचे योगदान नोंदविले गेले. यातूनच सामन्यांच्या व बहुजन्यांचा अस्मितांचा शोध घेतला गेला. यामुळे इतिहास अभ्यासाची ही नवी शाखा आता स्थिररूप झाली आहे. ‘सबाल्टर्न’ हा शब्द लॅटिनमध्ये सब (खाली, खाली) आणि अल्टर (अन्य) किंवा अल्टरनस (पर्यायी) पासून बनला आला आहे. ज्यामुळे सबाल्टर्नसची (गौण) निर्मिती झाली. भारतात ‘सबाल्टर्न’  इतिहासलेखन भारतात १९८० नंतर प्रचलित झाला. खऱ्या अर्थाने  ‘सबाल्टर्न’  इतिहासलेखनाचा दृष्टीकोण इंग्लंडमध्ये उदयास आलेल्या ‘हिस्ट्री फ्रॉम बिलो’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या लेखनप्रवाहाशी काही अंशी जुळणारा आहे. ‘सबाल्टर्न’ विचारप्रवाहाचा उदय वस्तुतः दक्षिण आशियाई राष्ट्रांच्या व्यापक इतिहासाच्या संदर्भात झाला. भारतीय समाजाच्या तळागाळातील जनसमूहांच्या कार्याची माहिती करून घेतल्याखेरीज तत्कालीन इतिहासाचे दर्शन होणार नाही या धारणेतून असे संशोधन व लिखाण करण्याच्या हेतूने डॉ. रणजीत गुहा यांनी ‘सेंटर ऑफ साउथ एशियन कल्चरल स्टडीज’ या संस्थेची पायाभरणी केली. भारतातील आधुनिक काळातील वंचित इतिहासावर लेखन करण्यासाठी काही इतिहासकार एकत्र येऊन सामूहिकरीत्या जाणीवपूर्वक इतिहासक्षेत्रात नव्या प्रयोगाचे पर्व सुरु केले. समविचारी अभ्यासकांनी एकत्र येऊन असा सामूहिक उपक्रम सुरु करण्याचा इतिहास क्षेत्रांतील हा अभिनव प्रयोग होय. ‘सबाल्टर्न  स्टडीज’ च्या पहिला अंक हा नव्या विचारप्रणालीचा मूर्त अविष्कार होता. हा उपक्रम पुढे चालू राहिला व त्याचा एक प्रवाह बनला. गुहा यांनी पुरस्कृत केलेल्या सबाल्टर्न प्रवाहाचा तात्विक आधार अन्तोनिओ ग्रामची ह्या इटालियन मार्क्सवादी विचारवंताच्या लिखाणात आढळून येतो. ‘हेजिमनी’ ह्या संकल्पनेचे विवेचन करताना ग्रामची सबाल्टर्न ही संज्ञा वापरला. ग्रामचीचा हा विचार गुहा यांनी स्वीकारला आणि तो इतिहासाच्या अध्ययनाला लागू केला. समाजातील वंचित समूहाचा आणि गटांचा इतिहास अभ्यास किंवा नव्या प्रवाहाला सबाल्टर्न  असे नामकरण केले गेले.

सबाल्टर्न व मार्क्सवादी विचार:

भारतात विसाव्या शतकात मार्क्सवाद, राष्ट्रवाद, उत्तर-वसाहतवादी सिद्धांत आणि स्त्रीवाद यांच्या प्रभावाखाली, सामाजिक, राजकीय, धार्मिक आणि आर्थिक पदानुक्रमांमध्ये अधीनतेचे प्रतिनिधित्व करण्यासाठी सबाल्टर्नचा व्यापकपणे वापर केला जाऊ लागला. या स्तरीकरणामुळे विस्थापित झालेल्या उपेक्षित किंवा सबाल्टर्न सहभागींच्या भूमिका पुनर्प्राप्त करण्यासाठी समाज, इतिहास आणि इतर मानवी परिस्थितींचे विविध पैलू राष्ट्रीय, सांप्रदायिक आणि वैयक्तिक स्तरावर तपासले जावू लागले. भारतीय सबाल्टर्न स्टडीज ग्रुपच्या अभ्यासकांनी त्यांच्या ऐतिहासिक हस्तक्षेपांमध्ये राष्ट्रवादाच्या संक्रमणाच्या मार्क्‍सवादी विश्‍लेषणासंबंधी समीक्षेचा समावेश केला. मार्क्सवादाच्या समीक्षेने "आधुनिकता आणि प्रगतीची राष्ट्र-राज्याची विचारधारा" यासंदर्भात "उत्पादन-पद्धती" वरील मार्क्सवादी अवलंबित्वाला लक्ष्य केले. "सबाल्टर्न" हा शब्द सूचित करतो की, मार्क्स आणि मार्क्सवादी विचारांशी या गटाचा संबंध देखील मार्क्सच्या औपनिवेशिक शोषणातून जात असलेल्या समाजांमधील राजकीय परिवर्तनांच्या ऐतिहासिक आणि सैद्धांतिक समजांशी होता.

सबाल्टर्नची वैचारिक बैठक:

सबाल्टर्न  इतिहासलेखनामागील वैचारिक बैठक गुहा यांनी सबाल्टर्न  स्टडीजच्या पहिल्या अंकातील प्रस्तावनेत विशद केली आहे. त्यांच्या भूमिकेचे पैलू नकारात्मक आणि सकारात्मक आहेत. नकारात्मक पैलू म्हणजे आजवरच्या इतिहासलेखनाची भूमिका व दृष्टीकोण ते नाकारतात आणि त्यानंतर इतिहासलेखनाबाबतचा आपला दृष्टीकोण मांडतात, हा त्यांच्या वैचारिकतेचा सकारात्मक भाग होय. आजवरच्या इतिहासलिखनासंबंधी त्यांनी आक्षेप घेततात ते असे कि, आजवर लिहिला गेलेला आधुनिक भारताचा इतिहास अभिजन वर्गाने लिहिलेला असून तो त्या वर्गाच्या वैचारिक भूमिकेतून लिहिला गेला आहे. तसाच तो अभिजन वर्गासाठीच लिहिला गेला आहे. त्यामुळे त्यांचे लिखाण अभिजन केंद्रित झाले आहे. त्याचबरोबर काही इतिहासकारांनी जनसमुहांचा, गटांचा, शेतकरी, कामगार, महिला इत्यादी गटांच्या सहभागाचा निर्देश लिखाणात केला असला तरी त्यांचे स्थान, विचारशक्ती, अंत:प्रेरणा यांचा अनाकलनीय सूचित केले आहे. हे इतिहासदर्शन वास्तव नसल्याने ही भूमिका अनैतिहासिक आहे.

सबाल्टर्न विचाधारणेमधील सकारात्मक मुद्दे याप्रमाणे आहेत, सबाल्टर्नना केंद्रस्थानी ठेवून इतिहास लिहिणे आवश्यक आहे. वंचित, शोषित गटांच्या कार्याचा, कृतीचा इतिहास नव्हे; तर कृतीमागील त्यांच्या मानसिकता, त्यांच्या आंत: प्रेरणा, जीवनपद्धती, जीवनमुल्ये व अनुभव यांचाही विचार निकडीचा आहे.  त्याचबरोबर भातीय समाज एकजिनसी नसून आडवा उभा विभागलेला आहे. तो केवळ आर्थिकदृष्ट्या नव्हे, तर जात, धर्म, लिंग, प्रदेश, अशा विभिन्न स्तरावर विभागलेला आहे. बौद्धिकदृष्ट्या हे गट स्वायत्त असतात. त्यांची स्वतःची अस्मिता असते, परंपरागत अनुभवजन्य शहाणपण असते. ह्या गटावर अभिजन प्रभाव गाजवतात, त्यांचे शोषण करतात, हे इतिहासाने स्पष्ट करणे गरजेचे आहे. उपरोक्त निर्दिष्ठ केलेलं विचार हे सबाल्टर्न  इतिहासलेखकांची तात्विक बैठक होय. या वैचारिक धारणेच्या आधारे एका व्यासपीठावर आलेल्या इतिहासात सबाल्टर्न अभ्यासकांची भूमिका महत्वाची आहे. ह्या विचारसरणीच्या अनुषंगाने केलेलं लिखाण ‘सबाल्टर्न  स्टडीज’ ह्या नियतकालीकाच्या दहा अंकात आजवर प्रकाशित झाले आहेत.

सबाल्टर्न इतिहासलेखनाची टप्पे:

भारतातील सबाल्टर्न स्टडीजचा ऐतिहासिक विकास हा दोन टप्यात पाहता येईल. १) पहिल्या टप्प्यात रणजित गुहा, शाहिद अमीन, ज्ञानेंद्र पांडे, स्टीफन हेनिंगहॅम, डेव्हिड हार्डीमन, सुमित सरकार इत्यादींनी वंचित इतिहासलेखन केले. हे लेखन हेजीमनिक उच्चभ्रू आणि दडपलेले सबाल्टर्न यांच्यातील संघर्षावर होते. या टप्प्यात, लेखन खालच्या, शोषित वर्गाच्या चिंतेवर आणि उच्चभ्रू किंवा शोषित वर्गावर टीका करण्यावर केंद्रित होते. विद्वानांच्या लिखाणातून स्पष्ट झाल्याप्रमाणे या टप्प्यावर ग्रामचियन विचारांचा प्रभाव प्रचंड होता. २) दुसऱ्या टप्प्यात पार्थ चॅटर्जी, गौतम भद्र, ज्ञान प्रकाश, दीपेश चक्रवर्ती, इतरांचे लेखन महत्वाचे मानले जाते. या टप्प्यात उत्तर आधुनिकतावादी आणि उत्तर-वसाहतवादी विचारसरणीचा प्रभाव सबअल्टर्न विद्वत्तेचा मुख्य आधार बनला. सबाल्टर्न स्टडीज प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यातील भारतीय इतिहासाच्या ‘सबाल्टर्न’ लेखनात मिशेल फुकॉल्ट आणि जॅक डेरिडा यांच्या उत्तर-वसाहतवादी लेखनाचा प्रभाव प्रचंड होता. सबाल्टर्न इतिहासलेखनाच्या या प्रवाहामध्ये लक्षणीय बदल झाले, ज्यामध्ये वर्गाकडून समुदायाकडे, भौतिक विश्लेषणापासून ते संस्कृती पर्यंत लक्ष केंद्रित केले गेले. 

भारतीय सबाल्टर्न इतिहासकार:

रणजित गुहा, पार्थ चॅटर्जी, ज्ञानेंद्र पांडे, डेव्हिड अरनॉल्ड, डेव्हिड हार्डीमन, शाहिद अमीन, दीपेश चक्रवर्ती, गौतम भद्रा, ज्ञान प्रकाश, सुझी थारू, प्रदीप जेगनाथन, शैल मायाराम, एम.एस.एस. पांडियन, अजय स्कारिया, डेव्हिड अरनॉल्ड, सुदिप्त कविराज, सरोजिनी साहू, गायत्री चक्रवर्ती स्पिवाक, एरिक स्टोक्स, इंजिन सुस्तम आणि उमेश बागडे आदि भारतीय सबाल्टर्न इतिहासकारांनी सबाल्टर्न विचारप्रवाहातून विपूल लेखन केले आहे. भारतामध्ये 'सबाल्टर्न' इतिहासलेखन हे आधुनिक दक्षिण आशियातील इतिहासकारांच्या एका गटाच्या लेखनातून तयार झाले आहे. 'सबाल्टर्न' ग्रुपने प्रथम सबाल्टर्न इतिहासलेखन 1982 मध्ये 'सबाल्टर्न स्टडीज’ नावाच्या मालिकेत प्रकाशित केले. सबाल्टर्न स्टडीजने स्वतःला भारतीय इतिहासाच्या विशेष संदर्भात इतिहास-लेखनाचे एक मूलगामी स्वरूप म्हणून प्रतिपादन केले. भारतातील संशोधन आणि शैक्षणिक कार्याचा मुख्य आधार असलेल्या अभिजात पूर्वाग्रहाला दुरुस्त करणे हा या नवीन ऐतिहासिक लेखनाचा उद्देश होता. अनादी काळापासून उच्चभ्रू लोकांनी सबाल्टर्नवर वर्चस्व गाजवल्याने या सुधारणावादी कृतीने वंचित इतिहासलेखनाची सुरुवात केली. 'सबाल्टर्न स्टडीज’ मालिकेत लेखन करून पुढील इतिहासकारांनी आपले योगदान दिले. रणजित गुहा, सबाल्टर्न स्टडीज I–VI (दिल्ली: ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस, 1982-9), पार्थ चॅटर्जी आणि ज्ञानेंद्र पांडे, सबाल्टर्न स्टडीज VII (दिल्ली: ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस, 1992), पार्थचॅटर्जी आणि प्रदीप जेगनाथन, सबाल्टर्न स्टडीज इलेव्हन (दिल्ली: पर्मनंट ब्लॅक, 2000), डेव्हिड अर्नोल्ड आणि डेव्हिड हार्डीमन, सबाल्टर्न स्टडीज VIII (दिल्ली: ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस, 1992), शाहिद अमीन आणि दिपेश चक्रवर्ती, सबाल्टर्न स्टडीज IX (दिल्ली: ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस, 1996), गौतम भद्र, ज्ञान प्रकाश, आणि सुसी थारू, सबाल्टर्न स्टडीज X (दिल्ली: ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस, 1999), शैल मयाराम, M.S.S. पांडियन, आणि अजय स्कारिया, सबाल्टर्नस्टु-डायज XII (दिल्ली: परमनंट ब्लॅक, 2005) आदि.

भारतीय सबाल्टर्न इतिहासलेखन:

भारतीय इतिहासलेखनाच्या क्षेत्रातील सबाल्टर्न  लेखनप्रवाहाचे प्रणेते म्हणून डॉ. रणजीत गुहा यांचे नाव सुप्रसिद्ध आहे. रणजित गुहा यांनी सबाल्टर्न स्टडीजच्या पहिल्या खंडात असे घोषित केले की, "भारतीय राष्ट्रवादाच्या इतिहासलेखनात अनेक काळापासून अभिजातवाद- वसाहतवादी अभिजातता आणि बुर्जुआ राष्ट्रवादी अभिजातता यांचे वर्चस्व राहिले आहे." गुहा यांच्या मते 'लोकांचे राजकारण हे उच्चभ्रूंच्या राजकारणापेक्षा वेगळे होते. प्रथम, त्याची मुळे लोकांच्या पारंपारिक संघटनेत आहेत जसे की, जात आणि नातेसंबंध, आदिवासी एकता, प्रादेशिकता इत्यादी. दुसरे, तर उच्चभ्रूंचे एकत्रीकरण उभ्या स्वरूपाचे होते. तिसरे, उच्चभ्रू जमाव कायदेशीर आणि शांतप्रीय होते, पण सबअल्टर्न एकत्रीकरण तुलनेने हिंसक होते. चौथे, उच्चभ्रू जमाव अधिक सावध आणि नियंत्रित होते, तर सबअल्टर्न एकत्रीकरण अधिक उत्स्फूर्त होते. गुहा यांच्यासाठी 'सबाल्टर्न' म्हणजे 'ते स्पष्टपणे निश्चित अस्तित्व आहे, जे एकूण भारतीय लोकसंख्या आणि ज्यांचे आम्ही उच्चभ्रू म्हणून वर्णन केले त्यांना सोडून असलेला वर्ग. गुहा यांनी असे प्रतिपादन केले की, सबाल्टर्नननी इतिहासात स्वतःहून म्हणजे उच्चभ्रूंपासून स्वतंत्रपणे काम केले होते आणि त्यांचे राजकारण एक स्वायत्त क्षेत्र बनले होते. कारण उच्चभ्रू राजकारणातून वंचितांचे अस्तित्व उद्भवलेले नाही किंवा त्याचे अस्तित्व नंतरच्या राजकारणावर अवलंबून राहिले नाही.

सबाल्टर्निस्टांच्या सुरुवातीच्या लिखाणात प्रामुख्याने ग्रामीण भागात राजकीय एकत्रीकरणावर लक्ष केंद्रित केले जात असताना, कामगार-वर्गीय राजकारणाचे विश्लेषण देखील सबाल्टर्न स्टडीजमध्ये आढळते. रणजित गुहा यांनी प्रामुख्याने औपनिवेशिक भारतातील कामगार-वर्ग आणि सबाल्टर्न राजकारण यांच्यातील संबंधावर थोडक्यात स्पष्टीकरण दिले. त्यांनी असे म्हटले होते की 'कामगार वर्ग अजूनही त्याच्या सामाजिक अस्तित्वाच्या वस्तुनिष्ठ परिस्थितीत आणि वर्ग म्हणून चेतनेत पुरेसा विकसित झालेला नाही. ते स्वतःसाठी किंवा ते अजूनही शेतकरी वर्गाशी घट्टपणे जोडलेले नव्हते. आणि त्याकाळी कामगारवर्गीय राजकारण खूप 'विखंडित', 'विभागीय' आणि 'स्थानिक' होते.

डेव्हिड हार्डीमन यांनी ‘पश्चिम भारतातील कृषी समाजाच्या वर्गीय विश्लेषणावर’ लक्ष केंद्रित केले, ज्यामुळे राष्ट्रवादी चळवळीतील शेतकऱ्यांचा उदय आणि सहभाग स्पष्ट करण्यात मदत झाली. गुजरातमधील खेडा जिल्ह्याच्या त्यांच्या तपशीलवार स्थानिक अभ्यासामुळे “मध्यम शेतकरी” हा कृषी राष्ट्रवादाचा अग्रेसर होता हे स्पष्ट झाले. त्यांच्या मते या गटाने गुजरातमध्ये सबअल्टर्न वर्ग तयार केला. हार्डिमन यांनी स्पष्ट केले की गरीब शेतकरी, श्रीमंत शेतकरी किंवा जमीनदार उच्चभ्रू लोकांपेक्षा मध्यम शेतकरी हे ग्रामीण समाजातील राजकीयदृष्ट्या सर्वात कट्टरपंथी वर्ग होते. त्यांच्या मते मध्यम शेतकरी स्वायत्तपणे काम करत होते आणि इतरांवर प्रभाव टाकून राष्ट्रवादी चळवळीला पाठिंबा मिळवत होते.

डॉ. शाहीद आमीन हे डॉ. रणजीत गुहांचे निकटचे सहकारी म्हणून ओळखले जातात. काही काळ यांनी सबाल्टर्न  स्टडीजचे संपादक म्हणून काम पाहिले. आमीन हे दिल्ली विद्यापीठातील इतिहास विषयाचे अध्यापक होते. शाहिद अमीन यांनी Making the Nation Habitable या लेखात असे मत मांडले की, 1921-22 मध्ये शेतकरी राजकारणाच्या हजारो वर्षांच्या आणि खोल विध्वंसक भाषेचा सामना करणारे भारतीय राष्ट्रवादी शेतकऱ्यांच्या बंडाना स्वतःचे आणि गांधीवादी असल्याचा दावा करण्यास तत्पर होते. शेतकर्‍यांना गांधींचा बंडखोर विनियोग मान्य करता न आल्याने, भारतीय राष्ट्रवादींनी रूढीवादी संबंधात त्याचे प्रतिनिधित्व केले. 1922 मधील शेतकरी हिंसाचारामध्ये अनेक पोलिसांचा मृत्यू झाला आणि गांधींनी ब्रिटिश राजवटीविरुद्ध असहकार आंदोलन स्थगित केले. भारतीय राष्ट्रवादी इतिहासातील या वादग्रस्त तारखेकडे परत येताना अमीन यांनी असा युक्तिवाद केला की, ही हिंसक घटना वसाहतवादी न्यायिक प्रवचनात 'गुन्हेगार' ठरली ती उच्चभ्रू राष्ट्रवाद्यांनी 'राष्ट्रीयकृत' केली. एकीकडे ते शेतकरी हिंसेला राष्ट्रवादी म्हणून मान्यता देऊ शकत नव्हते आणि दुसरीकडे त्यांना शेतकरी गुन्हेगार हा राष्ट्राचा एक भाग म्हणून मान्य करावे लागले.

ज्ञानेंद्र पांडे यांनी असा युक्तिवाद केला की, ‘अवधमधील शेतकरी चळवळी असहकार चळवळी’च्या आधी आणि स्वतंत्रपणे उभ्या होत्या. आणि स्थानिक सत्तेविषयी शेतकऱ्यांची समज आणि औपनिवेशिक सत्तेशी त्याची युती अधिक होती. जिथे काँग्रेस संघटना मजबूत होती तिथे शेतकऱ्यांची दहशत कमी होती. पांडे सुचवतात की भारतीय राष्ट्र-राज्याचे एक राष्ट्रीय समुदाय म्हणून कल्पना करायची होती, तो समुदाय राजकीय स्वरूप म्हणून ओळखू शकला नाही.

स्टीफन हेनिंगहॅम यांच्या मते, बिहार आणि पूर्व संयुक्त प्रांतातील भारत छोडो चळवळी’च्या त्यांच्या लेखात, 'उच्चभ्रू आणि सबाल्टर्न स्पष्टपणे परिभाषित आणि एकमेकांपासून वेगळे होते'. 1942 च्या बंडात एक उच्चभ्रू राष्ट्रवादी उठाव आणि सबाल्टर्न बंडाचा समावेश होता असे त्यांचे मत आहे. त्यांच्या मते 'राष्ट्रवादी उठावात सहभागी झालेल्यांनी काँग्रेसच्या सरकारी दडपशाहीविरुद्ध आंदोलन करण्याचा प्रयत्न केला आणि मागणी केली. याउलट, सबाल्टरर्न बंडखोरीमध्ये सामील झालेल्यांनी एकांतातून सुटका मिळवण्यासाठी त्याच्या निषेधार्थ कार्य केले. तो असेही म्हणतो की, बंडाच्या या दुहेरी स्वभावामुळेच ते फार काळ टिकू शकले नाही.

दिल्ली विद्यापीठातील इतिहासाचे प्राध्यापक डॉ. सुमित सरकार प्रतिभासंपन्न प्राध्यापक इतिहासकार म्हणून ख्यातनाम आहेत. मार्क्सवादावर त्यांचा अभ्यास असून त्यांनी भारतीय राष्ट्रीय चळवळीतील दुर्लक्षित जनसामान्यांचा इतिहासावर त्याचे महत्वाचे लेखन केले.  यांनी ‘द कंडीशन्स अँड नेचर ऑफ सबाल्टर्न मिलिटन्सी’ या विषयावर चर्चा केली आहे. बंगालमधील असहकार चळवळीमुळे जनतेला मागे टाकणाऱ्या नेत्यांचे चित्र समोर आले. सरकारच्या मते, 'सबाल्टर्न' हा शब्द मुळात आदिवासी, शेतकरी, निम्न-जातीचे शेतमजूर तीन सामाजिक गटांना सूचित करू शकतो.

पार्थ चॅटर्जी यांच्या लेखनात प्रक्रिया आणि अधीनतेचे परिणाम शोधण्यासाठी दिलेला विचार लक्षात येतो. भारतीय संदर्भातील भांडवलशाही पद्धती समजून घेण्याचा मार्ग म्हणून ‘फूकॉल्ट’च्या लेखनात रमणारे ते कदाचित पहिले ‘सबाल्टर्निस्ट’ होते. चॅटर्जी यांनी मार्क्सवादी सामाजिक सिद्धांताचा फूकॉल्ट विचारांशी संबंध जोडून सबाल्टर्न स्टडीजमध्ये 'समुदाय' हे राजकीय एकत्रीकरणाचे प्राथमिक आयोजन तत्व म्हणून चर्चा करण्यासाठी एक मार्ग दिला. त्यांनी भारतीय राष्ट्रवादाचे वर्चस्व कसे प्राप्त झाले याचा अभ्यास केला. त्याचबरोबर त्यांनी राष्ट्रवादी विचारातील गंभीर बदल शोधून काढले, ज्यामुळे ‘निष्क्रिय क्रांती’ झाली. त्यांच्या मते, 1947 मधील भारतीय स्वातंत्र्य ही एक जनक्रांती होती ज्याने सामान्य लोकांची चळवळ निर्माण केली. द नेशन अँड इट्स फ्रॅगमेंट्स या त्यांच्या दुसर्‍या ग्रंथात, चॅटर्जी यांनी असे मत मांडले की, राष्ट्राची कल्पना प्रथम सांस्कृतिक क्षेत्रात करण्यात आली आणि नंतर उच्चभ्रू वर्गाने राजकीय स्पर्धेसाठी तयार केले. ज्याने आधुनिक राष्ट्र निर्माण करण्याच्या मोहिमेमध्ये समुदाय आणि चळवळीच्या विविध सबाल्टर्न आकांक्षा तयार केल्या.

दीपेश चक्रवर्ती यांनी सबाल्टर्न स्टडीज प्रकल्पात 'कामगार-वर्गाच्या इतिहासाचा पुनर्विचार' या दिशेने सर्वात व्यापक योगदान दिले. संस्कृतीचे विशिष्ट तर्क हे केवळ राजकीय अर्थव्यवस्थेद्वारे स्पष्ट केले जाऊ शकत नाही. त्यांच्या मते, ‘संस्कृती ही भारतीय मार्क्सवादाचा अविचार आहे. चक्रवर्तींसाठी, सांस्कृतिक विश्लेषणाकडे वळणे हे भारतीय उदारमतवादी आणि मार्क्सवादी इतिहासलेखनाचा ‘अर्थवाद’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या मूलभूत गोष्टीपासून दूर जाणे होय. बंगालच्या सांस्कृतिक पार्श्वभूमीतील कामगार वर्गाबद्दल लिहिण्याच्या समस्या आणि मोठ्या वसाहती संदर्भाची त्यांनी पुनर्रचना केली. यांच्या मते, भांडवलशाही सत्तेच्या अंतर्गत सामाजिक संबंध टिकून राहिल्याने बंगालमध्ये कामगार-वर्गीय संस्कृतीच्या उदयासाठी विशिष्ट परिस्थिती निर्माण झाली होती. त्यांनी यावर जोर दिला की, ताग-गिरणी कामगार हे उत्तर आणि पूर्व भारताच्या शेजारील प्रदेशातील मुख्यतः स्थलांतरित शेतकरी होते आणि ते 'पूर्व-भांडवलवादी, असमानतावादी संस्कृतीत वसलेले होते. ज्यामध्ये समुदाय, भाषा, धर्म, जात आणि नातेसंबंध यांच्यात मजबूत निष्ठा होती. या संस्कृतीने ज्यूट-मिल कामगारांमधील राजकीय एकत्रीकरणाचे स्वरूप स्पष्ट करण्यास मदत केली.

ग्यान प्रकाश यांनी असा युक्तिवाद केला की, भारतीय सबाल्टर्ननी त्यांच्या स्वतःच्या नोंदी सोडल्या नाहीत म्हणून पाश्चात्य मॉडेलचे अनुकरण करून ‘हिस्ट्री फ्रॉम डाउन’ हा दृष्टिकोन स्वीकारला. त्यामुळे, सबाल्टर्न अभ्यासांना 'सबाल्टर्नची वेगळ्या पद्धतीने कल्पना करावी लागली आणि वेगवेगळे इतिहास लिहावे लागले. त्यांच्या मते, 'सबाल्टर्न कल्पनेच्या सुधारणेची हमी देणारे वंचितता हा ‘चर्चात्मक परिणाम’ म्हणून पाहणे महत्त्वाचे आहे. प्रकाश यांच्या म्हणण्यानुसार दक्षिण आशियाई इतिहासाच्या अशा पुनर्परीक्षणांमध्ये त्यांच्या समालोचनाची रचना करताना वास्तविक सबाल्टर्नचा उपयोग होत नाही. या चर्चेच्या चक्रव्यूहात सबाल्टर्न ठेवून, ते त्यांच्या वास्तविकतेवर अविचारी प्रवेशाचा दावा करू शकत नाहीत.

भारतीय-अमेरिकन उत्तर-वसाहतवादी स्त्रीवादी समीक्षक गायत्री चक्रवर्ती स्पिवाक यांच्या सहभागाने सबाल्टर्नची संकल्पना आणखी गुंतागुंतीच्या सैद्धांतिक वादाकडे वळली. स्पिवाकने जागतिकीकृत जगात क्रांतिकारक आवाज आणि कामगार विभागणी कमी करण्याच्या भांडवलशाही राजकारणामुळे आणलेल्या नवीन ऐतिहासिक घडामोडींमध्ये वंचिततेच्या समस्यांचा पुनर्विचार केला. सबाल्टर्न ग्रुप्सच्या स्वायत्ततेबद्दल ग्राम्सीचे प्रतिपादन तिने नाकारले. तिच्या मते, या स्वायत्ततेचा परिणाम सबाल्टर्न ग्रुप आणि सबाल्टर्न व्यक्तिपरक ओळख यांच्यात एकजिनसीपणा येतो. सबाल्टर्न स्टडीज ग्रुपवरील तिची दुसरी टीका म्हणजे विद्वानांनी कोणतीही नवीन पद्धत अवलंबली नाही या आधारावर होती. वसाहतिक काळात लिंग आणि विशेषत: भारतीय महिलांच्या समस्या हाताळून स्पिवाक सबाल्टर्न गटांच्या समस्यांवर पुनर्विचार करते. ब्रिटीश औपनिवेशिक राजवटीत सती प्रथेच्या प्रकरणाच्या तिच्या विश्लेषणामध्ये भारतीय स्त्रियांच्या स्थितीवर त्यांनी मत प्रतिबिंबित केले. त्यांनी सबाल्टर्नच्या क्षेत्रात महिलांचा समावेश करण्याचा प्रयत्न केला. त्या म्हणतात कि, ‘बंडखोरीमध्ये महिलांचा प्रश्न सहभागाचा किंवा श्रमाच्या लैंगिक विभाजनाच्या मूलभूत नियमांचा नाही, उलट दोन्हीचा उपयोग वसाहतवादी इतिहासलेखनाचा विषय म्हणून आणि बंडखोरीचा विषय म्हणून केला गेला.

सबाल्टर्न स्टडीज प्रकल्पाच्या जातीय अंधत्वाबद्दल उमेश बगाडे यांची टीका भारतीय इतिहासातील राष्ट्रवादी आणि मार्क्सवादी प्रवाहावर टीका म्हणून उदयास आली आहे. वर्गाशिवाय व्यापक मार्क्सवादी फ्रेमवर्क टिकवून ठेवण्यासाठी सबाल्टर्न इतिहासकारांनी अँटोनियो ग्राम्सचीची "सबाल्टर्न" संकल्पना कशी उधार घेतली हे दाखवून दिले. परंतु दडपशाही आणि आर्थिक शोषणावर ग्रामचीने महत्त्वाचा भर टाकून दिला. जेव्हा त्यांनी सबाल्टर्नचे त्यांचे मॉडेल गौण किंवा स्वायत्त म्हणून तयार केले, तेव्हा ते जात चुकीच्या पद्धतीने वाचतात. जातिव्यवस्थेने पितृसत्तेशी जवळचा संबंध असलेली श्रेणीबद्ध असमानता म्हणून कार्य केले. ज्यामध्ये खालच्या जातींवर स्वायत्ततेऐवजी अत्याचार, शोषण आणि अधीनस्थ केले गेले. अशा प्रकारे एकसंध “सबाल्टर्न” स्थितीमुळे अत्याचारित कनिष्ठ-जातीतील शेतकरी, आदिवासी शेतकरी, उच्च-वर्णीय वर्ग शेतकऱ्यांसह दूर राहिला. पण खालच्या जाती आणि स्त्रियांच्या बळजबरीने सबाल्टर्न विद्रोहाचा पाया वाढवणारी एकता प्राप्त झाली हे मान्य केले नाही. जात पंचायतींची सबाल्टर्न सांस्कृतिक जी या प्रकल्पाच्या ज्ञानशास्त्राच्या केंद्रस्थानी होती, ती ब्राह्मणी धर्म आणि संस्कृतीद्वारे शासित होती. सबाल्टर्न स्टडीज प्रकल्पाला उत्तर-आधुनिकतावादाशी जवळचा संबंध आढळला आणि त्याने मुक्तीवादी राजकारणाचा प्रश्न टाळला. त्यामुळे या प्रकल्पाने जाती-विरोधी एकत्रीकरणांना "सबाल्टर्न विद्रोह" च्या कक्षेतून वगळले आणि त्याचवेळी जातिव्यवस्था आणि पितृसत्ता यांचे विश्लेषण आणि विरोध करता येईल अशा सर्वसमावेशक ऐतिहासिक व्याख्येची गरज नाकारली. सबाल्टर्न इतिहासलेखनाचे पूर्वाग्रह आणि उणीव उघड करताना, बागडे इतिहासाच्या वास्तविकतेवर प्रभाव टाकण्याच्या क्षमतेवर इतिहासाचे वैज्ञानिक निरीक्षण देतात. इतिहासलेखनाच्या सबाल्टर्न विचाराला भूतकाळात विद्वानांकडून तीव्र टीका सहन करावी लागली आहे. तथापि, याचा पुनरुच्चार केला जाऊ शकतो की सबाल्टर्न स्टडीजने भारतीय इतिहासाच्या लेखनात एक निश्चित रोख चिन्हांकित केला आणि अभिजात वर्गाच्या इतिहासावरून 'लोकांच्या इतिहासाकडे' लक्ष केंद्रित केले.

सबाल्टर्न  इतिहास लेखनावरील आक्षेप:

सबाल्टर्न अभ्यासाने स्वीकारलेल्या आणि स्पष्ठ केलेल्या ग्रामचिच्या संकल्पना उदा. वर्चस्व, दुय्यमत्व, अधिसत्ता, सबाल्टर्न जाणीव आदीबाबत निरनिराळे प्रश्न उभे केले गेले. त्यांची समाधानकारक उत्तरे या अभ्यासामध्ये आढळत नाहीत. स्वायत्तता आणि नेतृत्व यांचा परस्परसंबंध कसा लावणार याविषयी कोणतीच स्पष्ट भूमिका यात नाही. सबाल्टर्न इतिहासकरांनी सामाजिक इतिहासाकडे, राजकीय इतिहासाकडे दुर्लक्ष केले. बऱ्याच वेळा केवळ द्विमानांमधून इतिहास पाहिला गेला. अभिजन/ सबाल्टर्न, वसाहतिक/एत्तदेशीय, युरोपीय/युरोप बाहेरचे, पहिले जग/तिसरे जग, यांमुळे सामाजिक संरचनामधील अन्य बदलाकडे एकत्रित पाहता आले नाही. आफ्रिका, अमेरिका इत्यादी इतिहासलेखनांनी त्यांच्या संदर्भात सबाल्टर्न प्रकल्प पाहिला त्यामुळे तो मूळ गाभ्यापासून दूर जातो काय, असे वाटले. सांस्कृतिक लिखाणाचे महत्व वाढले. ज्ञान आणि सत्ता यांच्यात संदर्भात संस्कृतीचे विवेचन आले. परंतु त्याचा भौतिक पाया न तपासल्याने हे लेखन एकांगी वाटू लागले. उत्तर मार्क्सवादी, उत्तर वासाहतिक लिखाण म्हणूनही या लिखाणाची ओळख करून दिली गेली. हिंदुत्वाचे राजकारण गतिमान असताना कोणते  सांस्कृतिक विषय सबाल्टर्न प्रकल्पाच्या लेखनात यायला हवे होते, याबद्दल सबाल्टर्न अभ्यासक काहीच बोलताना आढळले नाहीत. सांस्कृतिक अभ्यास, पॉप्युलर कल्चरच्या अभ्यासाशीही बर्याचदा जोडला गेला. या सर्वांचा परिणाम म्हणजे सबाल्टर्न जाणीवेबद्दलचे लिखाण, त्यातील स्पष्टता नष्ट झाली. शेतकऱ्यांची जाणीव ही सबाल्टर्न जाणीव असली तरी ते पुरुषसत्ताक आहे, याकडे अभ्यासकांनी दुर्लक्ष केले आहे. परंपरा आणि  आधुनिकता यांना ही जाणीव कसा प्रतिसाद देते याबद्दलचे कोणतेच स्पष्टीकरण आढळत नाही. आदिवाशिंच्या स्वायत्त राजकीय परंपरा पुढे कशा नष्ट झाल्या किंवा वर्चस्वशाली गटांनी त्या कशा नष्ट केल्या, याविषयी समग्र आकलन पुढे येत नाही. दलित, स्त्रिया यांच्याबद्दल त्यांच्या जाणिवेबद्दल तितकेसे लिखाण आढळत नाही. जात जाणीव आणि सबाल्टर्न जाणीव यांच्या परस्परसंबंधावर कोणताच प्रकाश टाकत नाही. सबाल्टर्न जाणिवेची स्वायत्तता जर गृहीत धरली तर सबाल्टर्नच नष्ट होईल. त्यामुळे सबाल्टर्न जाणीवेला पूर्णत्व येण्यासाठी कोणती दिशा या प्रकल्पाने पकडली पाहिजे याविषयीचा विचार वाढला पाहिजे.

समारोप:

सबाल्टर्न स्टडीजची सुरुवात 1980 च्या दशकात विद्यमान इतिहासलेखनाची समीक्षा म्हणून झाली. लोकांच्या आवाजाकडे पुनर्लेखणीतून दुर्लक्ष केल्याचा आरोप त्याच्या सबाल्टर्न आरंभकर्त्यांनी केला होता. या लेखकांनी सबाल्टर्न प्रकल्पामध्ये एक पूर्णपणे नवीन प्रकारचा इतिहास लोकांसमोर आणले. भारतीय अभ्यास क्षेत्रामधील अभ्यासक आणि विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रियांचा अंदाज घेत सुरुवातीच्या काळात, हे प्रकल्प काही प्रमाणात पूर्ण झाल्याचे दिसते. सुरुवातीच्या काळात रणजित गुहाने संपादित केलेल्या खंडात सबाल्टर्न स्टडीजने चेतना आणि कृतींचा शोध घेण्याचा प्रयत्न केले. भारतीय समाजातील दुर्लक्षित गटावर अभ्यास करण्याचे काम या ग्रुपने केल्याचे दिसते. या प्रवाहाच्या वाढत्या प्रभावामुळे पाश्चात्य शैक्षणिक वर्तुळातील महत्त्वाचे उत्तर आधुनिकतावादी आणि उत्तर-वसाहतवादी लेखन झाल्याने नंतरच्या काळात, या प्रवाहाने जागतिक इतिहास लेखकांच्या कार्यांवर वर्चस्व गाजवले. वंचित इतिहासलेखनावर टीका होत असले तरीही या विचारप्रवाहाने सबाल्टर्न इतिहासकारांनी इतिहासलेखन करून विपुल प्रमाणात वंचित घटकास न्याय देनायचा प्रयत्न केला हे दिसून येते. या विचारप्रवाहाने इतिहासकारांनी वंचित इतिहासलेखन केल्याने तळागाळातील विषयास न्याय मिळत राहिला हे मान्य करावे लागेल.

संदर्भ:

1.      Umesh Bagade, Yashpal Jogdand, Vaishnavi Bagade, Subaltern Studies and the Transition in Indian History Writing”, Critical Philosophy of Race (2023) 11 (1): 175–208.

2.      Ranajit Guha (1982). ‘On Some Aspects of the Historiography of Colonial India’, In Ranajit Guha (ed.), Subaltern Studies, Vol. I, Oxford University Press, New Delhi

3.      E. Sreedharan, A Textbook of Historiography, 500 B.C. to A.D. 2000, Orient Blackswan, 2004 

4.      Sabyasachi Bhattacharya, Approaches to HistoryEssays in Indian Historiography, Primus Books, Delhi, 2011

5.      चव्हाण प्रविण, सबाल्टर्न इतिहास लेखन मुक्तीगीत ? नव्हे शोकात्मिक, साधना दिवाळी अंक, २००६, पृ. ११७

6.      कोठेकर शांता, इतिहास तंत्र आणि तत्वज्ञान, श्री साईनाथ प्रकाशन, नागपूर , २००७

7.      देव प्रभाकर, इतिहासशास्त्र  संशोधन, अध्यापन आणि लेखनपरंपरा, ब्रेन टोनिक प्रकाशन गृह, नाशिक, २००७

8.      गाठाळ एस.एस., इतिहासलेखनशास्त्र, कैलास पब्लिकेशन, औरंगाबाद. २०११

9. https://www.encyclopedia.com/environment/encyclopedias-almanacs-transcripts-and-maps/subaltern-studies

 

 

 


वंचित इतिहासाच्या परिप्रेक्षातून दक्षिण महाराष्ट्रातील स्त्रियांचे स्वातंत्र्य चळवळीत योगदान Contribution of women in the freedom movement of South Maharashtra : the perspective of deprived history

वंचित इतिहासाच्या परिप्रेक्षातून दक्षिण महाराष्ट्रातील स्त्रियांचे स्वातंत्र्य चळवळीत योगदान 

प्रस्तावना: 
ब्रिटिश सत्तेच्या प्रभावातून भारतीय रूढी व परंपरेत बदल घडून आले. या बदलातून स्त्रियांनाही समाजामध्ये पुरूषांच्या बरोबरीने हक्क व अधिकार टप्याटप्याने मिळत गेले. स्त्रियांच्या सहभागाशिवाय सामाजिक, आर्थिक व राजकीय बदल शक्य नाही या जाणिवेतून स्त्रियांना स्वातंत्र्य चळवळीत सहभाग करून घेण्यास सुरुवात झाली. भारतामध्ये ब्रिटिश साम्राज्यापासून देशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी विविध टप्यावर विविध संघटना कार्यरत होत्या. मात्र या संघटना विशिष्ठ वर्गापुरत्याच मर्यादित असल्याने व या संघटनेस बहुजनांचा पाठिंबा नसल्याने त्यांचे बळ वाढले नाही, त्यामुळे या चळवळीचे यश मर्यादित राहिले. मात्र १९२० नंतर भारतीय स्वातंत्र्य चळवळीत महात्मा गांधीचा उदय झाला. गांधींनी प्रथम संपुर्ण देश पायी चालून भ्रमण केले त्यावेळीच त्यांच्या लक्षात आले की, खरा भारत खेडयात आहे व हा चळवळीपासून अनभिज्ञ व वंचित आहे. जोपर्यंत यांना चळवळीमध्ये सामावून घेतले जात नाही तोपर्यंत आपला प्रभाव व ताकद वाढणार नाही हे गांधीच्या लक्षात आले व त्यांनी शेतकरी, कामगार, महिला यांना आवाहन करून त्यांच्यात जागृती निर्माण केली. घराबाहेर न जाणाऱ्या स्त्रिया, नेहमी बुरखा वापरणाऱ्या स्त्रिया, तरूण माता, विधवा, अविवाहित मुली सर्वजण गांधींच्या प्रेरणेने चळवळीत सामिल झाल्या. आंदोलन, निदर्शने व मोर्चे काढून तुरूंगवास ही सहन करू लागल्या. कित्येक महिलांनी गांधीच्या या प्रभावातून आपले संपुर्ण आयुष्य देशसेवेसाठी अर्पण केले. आणि भारतीय स्वातंत्र्य चळवळीत आपला सहभाग नोंदविला. अशा स्त्रियांच्या कार्याचे मूल्यमापन करावे ही आजची गरज असल्याने प्रस्तुत लेखामध्ये भारतीय स्वातंत्र्य चळवळीत दक्षिण महाराष्ट्रातील काही ज्ञात व अज्ञात स्त्रियांच्या कार्याचे अवलोकन केले आहे. 
स्वातंत्र्यलढ्यातील स्त्रिया आणि सबाल्टर्न दृष्टीकोन: 
इ.स.१९८५ नंतरच्या काळात इतिहास लेखनाचा सबाल्टर्न दृष्टीकोन लोकप्रिय होऊ लागला. सबाल्टर्न गटाच्या इतिहासकारांनी वंचित किंवा दुय्यम समूहांचा इतिहास लिहिण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या मते राष्ट्रवादी दृष्टीकोनातून केलेले इतिहासलेखन हे ‘अभिजनवादी’ असते. त्यांचा आरोप होता की राष्ट्रवादी इतिहासकारांनी आपल्या मांडणीत ‘अभिजनवादी नेतृत्वाला’ खूप महत्त्व दिले. त्यांच्या इतिहासलेखनामध्ये स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झालेल्या शेतकरी, कामगार, आदिवासी, तत्समजाती-जमाती आणि स्त्रिया यांच्या कार्याचा उल्लेख क्वचितच झालेला आढळतो. मात्र तळागाळातील समाजाच्या घटकांबद्दल लिहून त्यांना इतिहासात जागा मिळवून देण्याच्या हेतूने सबाल्टर्न इतिहासकार लिखाण करू लागले. सबाल्टर्न गटाच्या इतिहासकारांनी स्वातंत्र्यलढ्याच्या संदर्भात एक सैद्धांतीक मांडणी केली आहे. ती ही की, भारतीय स्वातंत्र्य लढा हा एकसंध स्वरूपाचा नव्हता. त्यांच्यामते राजकारणाची दोन क्षेत्रे होती- अभिजन क्षेत्र आणि सबाल्टर्न क्षेत्र. ही दोन्ही क्षेत्रे वेगवेगळी असली तरी त्यांचा एकमेकांवर प्रभाव पडतो. अभिजन क्षेत्राकडून सबाल्टर्न क्षेत्राला नियमित/ नियंत्रित करण्याचे प्रयत्न केले जातात. म्हणजेच वास्तविक अभिजन लोकांनी वंचित व दुय्यम समूहातील लोकांचा ब्रिटीशविरोधी लढ्यात उपयोग करून घेतला. स्वातंत्र्यलढ्यात अशा अनेक घटना घडल्या ज्यामध्ये कामगार, शेतकरी, आदिवासी या सारख्या दुय्यम आणि वंचित समूहांनी सहभाग घेतल्याचे दिसून येते. सबाल्टर्न गटाचे इतिहासकार सर्वजाती-जमातींच्या स्त्री वर्गाला देखील ‘सबाल्टर्न’ (वंचित, दुय्यमसमूह) समजत असल्यामुळे ही मांडणी स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झालेल्या स्त्रीवर्गाला देखील लागू होते. भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासलेखनातील वंचितता:
भारताला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी अनेक लोकांनी बलिदान दिले आहे. लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वजण स्वातंत्र्य मिळविण्यासाठी आसुसलेले होते. त्यात महिलादेखील मागे नव्हत्या. त्यांनी आपल घर, कुटुंब ही जबाबदारी सांभाळताना स्वातंत्र्य चळवळीतही सहभाग नोंदविला. ज्यांनी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून लढा दिला, त्रास सहन केला, त्या महिलांचे योगदान विस्मृतीत गेले आहे. अॅनी बेझंट, सरोजिनी नायडू, कस्तुरबा गांधी, अरुणा असफअली इ. प्रसिद्ध महिलांच्या कार्याचा उल्लेख मिळतो. पण प्रादेशिक आणि स्थानिक पातळीवरील बहुतांशी स्त्रियांना आजही इतिहासलेखनात अदृष्य ठेवले गेले आहे. भारतीय स्वातंत्र्याची चळवळ मोठ्या शहराप्रमाणे तालुका, गाव, खेडे, वाड्या-वस्त्या, भटक्या आणि आदिवासींच्या जंगलापर्यंत विस्तारली होती. यात प्रौढ, तरुण, मुले ते अबाल वृद्ध स्त्री-पुरुषांचा समावेश होता. वसाहतवादी धोरण सुरु झाल्यापासून ते स्वातंत्र्य मिळेपर्यंत ही चळवळ सुरु होती. त्यामुळे भारतीय इतिहासावर या चळवळीचा दूरगामी परिणाम दिसून येतो. अभ्यासाच्या पातळीवर याचा साचेबद्ध अभ्यासही झाल्याचे दिसते. पण त्यातील अनेक महत्वाचे आणि कळीचे मुद्दे अभ्यासल्याचे दिसत नाही. अशाच काही महिलांबद्दल आज चिंतन होणे गरजेचे आहे. स्वातंत्र्यलढ्यातील स्त्रियांची भूमिका: स्वातंत्र्यलढ्याच्या पहिल्या पर्वात फारच थोड्या स्त्रियांचे उल्लेख मिळतात. १९०५ च्या वंगभंग आंदोलनानंतर स्वातंत्र्यलढ्यात स्त्रियांचा सहभाग वाढत गेला. ऑगस्ट १९४२ च्या ‘भारत छोडो’ घोषणेनंतर प्रमुख राजकीय नेते तुरुंगात गेल्यावर ‘प्रत्येक नागरिकांनी आपण स्वतंत्र झालो आहे असे समजून स्वातंत्र्यलढ्यामध्ये क्रियाशील बनावे’ हा गांधींचा संदेश अनेक युवक युवतींना प्रेरणादायी ठरला. ही स्वातंत्र्याची प्रेरणा घेऊन दक्षिण महाराष्ट्रातील स्त्रिया पुरुषांप्रमाणे स्वातंत्र्य चळवळीत महत्त्वपूर्ण सहभाग नोंदवला होता. या कालखंडातील अनेक स्त्रियांना कौटुंबिक राजकीय पार्श्वभूमी होती. या कालखंडात स्त्रिया स्वातंत्र्य चळवळीत सहभाग होण्याचे प्रयत्न होण्यास सुरुवात झाली होती. भारतातील बहुतेक भागातील स्त्रिया स्वातंत्र्याच्या चळवळीत सहभागी होत्या. कोणताच प्रांत स्त्रियांच्या चळवळीविना खाली नव्हता. महाराष्ट्र, गुजरात, पंजाब, राजस्थान, जम्मू-कश्मीर, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, बिहार, ओरिसा, बंगाल, आसाम, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश असे सर्वच प्रांत व त्यातील स्त्रिया स्वातंत्र्याच्या चळवळीत मुख्य भूमिकेत तर कधी सहकार्याच्या भूमिकेत सहभागी होत्या. त्यांचे संघटनाचे जाळे भारतभर पसरले होते. स्वातंत्र्याच्या चळवळीत वेगवेगळ्या माध्यमातून प्रत्यक्षात भाग घेतलेल्या या स्त्रियांनी तुरुंगात गेलेल्या कार्यकर्त्यांच्या मुला-बाळाला आधार देणे, त्यांचे संसार चालविणे, क्रांतीकारकांना आपल्या घरात आश्रय देणे, निराधार लोकांना अन्न-पाणी पुरवणे, संग्रामात आवश्यक असलेली शास्त्रांची ने-आण करणे, कैदेत असताना साक्षरता वर्ग घेणे, रझाकारांच्या छावण्या जाळणे, बंदुका चालवणे अशा प्रकारची कामे केली. आणि आशा प्रकारच्या मुक्ती आंदोलनात स्त्रियांनी आपला सहभाग नोंदविला. 
 महाराष्ट्रातील स्त्रिया आणि स्वातंत्र्यलढा: 
भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीतील आपणाला काही स्त्रियांची नावे माहित असतील. पण यापेक्षा खूप मोठ्या संख्येने स्वातंत्र्याच्या चळवळीत स्त्रियाचा सहभाग होता. यात आपण उदाहरणार्थ हैद्राबाद मुक्ती संग्रामातील स्त्रियांचे कार्य पाहिले तरी स्त्रियांचे कार्य आपल्या लक्षात येईल. या संग्रामाच्या काळात रुक्मिणीबाई विठ्ठल कोरडे यांनी इ.स. १९३१ च्या जंगल सत्याग्रहात सक्रीय सहभाग नोंदविल्याबद्दल त्यांना ६ महिने सक्त मजुरीची शिक्षा भोगावी लागली होती, तसेच त्या बरोबरच त्यांनी वैयक्तिक सत्याग्रहात भाग घेतल्याने इ. स. १९४१ मध्ये त्यांना ८ महिने कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. १ ते ३ जून १९३८ रोजी हैद्राबाद मुक्ती संग्रामासाठी महाराष्ट्र परिषद संपन्न झाली. त्यात महिलांनी विशेष सहभाग नोंदविला. यात काशिबाई किर्लोस्कर, सुशीलाबाई दिवान, गौरी किर्लोस्कर, कमलाबाई किर्लोस्कर, इंदुबाई शर्मा, गोदावरी दास यांचे प्रबोधनकारी कार्य विशेष महत्वाचे आहे. अशा हजारो कार्यकर्त्या हैद्राबाद मुक्ती संग्रामात कळीची भूमिका निभावत होत्या. १९३०-३२ च्या सविनय कायदेभंगाच्या चळवळीत विदर्भातील स्त्रियांनी महत्वाची कामगिरी पार पडली. बुलढाना, अकोला, अमरावती, यवतमाळ या जिल्ह्यातील स्त्रियांनी म. गांधींच्या सांगण्यानुसार स्वातंत्र्याचे प्रचार दौरे काढले. दुर्गाबाई जोशी, रुक्मिणी कोरडे, इंद्राबाई गद्रे, कमलबाई रेगे, रमाबाई केळकर, उमाबाई देशमुख इत्यादी महिलांनी मिठाचा सत्याग्रह, जंगल सत्यागृह इत्यादी सत्याग्रह करून मोठी कामगिरी केली. निफाड तालुक्यातील अयोध्याबाई लक्ष्मण मोरे यांनी स्वातंत्र्याच्या चळवळीत भूमिगत राहून कार्य केले. अकोला येथील गोयांकाबाई यांनी सरकारने बेकायदा ठरविलेल्या काँग्रेस मैदानात जाऊन १९४२ च्या आंदोलनात राष्ट्रध्वज लावण्याचा प्रयत्न केला होता. त्यांना त्याबद्दल सक्तमजुरीची शिक्षा झाली होती. ऑगस्ट १९४२ च्या चळवळीत सोलापूर येथे द्वारकाबाई देशपांडे, सुमतीबाई शाह, जनाबाई जाधव, कलावंती भोसले यांचे कार्य महत्वाचे आहे. सुमतीबाई शाहच्या शाळेत शिकणारी विद्यार्थीनी राजमती पाटील यांनी स्वातंत्र्याच्या चळवळीत उघडपणे सहभाग घेतला, त्यांना त्यात अटक झाली व येरवडा कारागृहात ठेवण्यात आले होते. ही विद्यार्थिनी पुढे साताऱ्याच्या प्रतीसरकारमधील प्रसिद्ध क्रांतिकारक म्हणून पुढे आली. ९ ऑगस्ट १९४२ च्या आंदोलनाचा स्फोट मुंबईतून झाला. यात स्त्रियांचा सहभाग लक्षणीय होता. केसरी साड्या परिधान करून मुंबईतील हजारो स्त्रिया चौपाटीवर जात होत्या, त्यांना गोऱ्या सोजीऱ्यानी अडविले आणि निशस्त्र स्त्रियांवर गोळीबार केला. काही स्त्रिया जागीच ठार झाल्या. पण त्यांनी आंदोलन थांबविले नाही. चिमूर गावात अशाच काही महिलांवर आणि शाळकरी मुलींवर लष्करी जवानांनी अत्याचार केले. याची न्यायालयीन चौकशी करणारी मागणी स्त्रियांकडून पुढे आली. डॉ. आंबेडकरांच्या आंदोलनात अनेक दलित स्त्रियां होत्या. काळाराम मंदिर प्रवेशाच्या वेळी मंदिर प्रवेशाच्या आड येणाऱ्या पुजाऱ्याला त्यांनी चांगलाच चोप दिला होता. भगतसिंह-राजगुरू-सुखदेव या क्रांतिकारकांच्या चळवळीत व आजाद हिंद सेनेत काही स्त्रिया होत्या. या स्त्रिया महाराष्ट्रातील स्वातंत्र्य चळवळीत मोलाचे योगदान दिले आहेत. 
स्वातंत्र्यलढ्यातील दक्षिण महाराष्ट्रातील स्त्रियांची भूमिका: 
भारतीय स्वातंत्र्यचळवळीत इंग्रज राज्यकर्त्यांनी वेगवेळ्या आरोपाखाली महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांना तुरुंगात टाकले. त्यामुळे ब्रिटीशांच्या विरोधात स्वातंत्र्य सैनिकांनी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात स्वातंत्र्य चळवळ भक्कम करण्यास सुरु केले. पुढे या चळवळीला लोक चळवळीचे स्वरूप प्राप्त झाले. याचे पडसाद दक्षिण महाराष्ट्रात ठीक ठिकाणी उमटले. सोलापूर, कोल्हापूर, पूर्वीचा सातारा आणि आत्ताच्या सांगली जिल्ह्यात प्रथम मोर्चे व नंतर भूमिगत चळवळ यास्वरुपात क्रांतिकारकांनी स्वातंत्र्य चळवळ अव्याहतपणे सुरु ठेवले. स्वातंत्र्याच्या चळवळीत वेगवेगळ्या माध्यमातून तुरुंगात गेलेल्या कार्यकर्त्यांच्या मुला-बाळाला आधार देणे, त्यांचे संसार चालविणे, क्रांतीकारकांना आपल्या घरात आश्रय देणे, निराधार लोकांना अन्न-पाणी पुरवणे, संग्रामात आवश्यक असलेली शास्त्रांची ने-आण करणे, कैदेत असताना साक्षरता वर्ग घेणे, बंदुका चालवणे इत्यादी हजारो प्रकारची कामे स्त्रियांनी केली. या सर्व प्रकारच्या उपरोक्त सहकार्याने पुरुषांना पाठिंबा देवून स्वातंत्र्य चळवळीस मदत करण्याचे काम या ग्रामीण भागातील स्त्रियांनी केला. भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासात सातारा जिल्हयातील क्रांतीकारकांनी केलेले कार्य हे भारताच्या इतिहासात एक सुवर्ण पान आहे. कारण भारतातील ब्रिटीश सत्तेविरूद्ध जी प्रतिसरकारे स्थापन झाली, त्या सरकारांचा लगेचच बीमोड झाला. परंतु, सातारा जिल्हयातील प्रतिसरकार स्वातंत्र्य मिळेपर्यंत कार्य रूपाने टिकून होते. जसे भारतीय स्वातंत्र्य चळवळीत स्त्रियांनी अनेक क्रांतीकारकांना साथ दिली, तसेच प्रतिसरकार चळवळीत स्त्रियांनीही आपल्या ताकदीनुसार क्रांतीकारकांना साथ दिली. ‘‘प्रतिसरकार चळवळीमध्ये राजुताई बिरनाळे, इंदुताई पाटणकर यांच्याप्रमाणे लक्ष्मीबाई नायकवडी, हौसाबाई पाटील, इंदुताई पाटील, गंगुबाई लाड, विजयाताई लाड, लिलाताई पाटील, जनाबाई, गुणाबाई, भामिर्थी गुरव अशी अनेक नावे घेता येतील. १९४३ ते १९४६ कालखंडात खानापूर, तासगांव, वाळवा, सांगली, आष्टा, बुधगाव मिरज हा सातारा जिल्हयातील भाग प्रतिसरकारच्या चळवळीने गाजला. खरे तर ही चळवळ ब्रिटीश सरकारच्या विरूध्द गनिमीकावाच होता. सातारा जिल्हयातील भूमिगत कार्यकर्त्यांची बैठक ३ जून, १९४३ रोजी वाळवे तालुक्यातील कामेरी या गांवी घेण्यात आली. आणि ब्रिटीश सत्तेविरूध्द प्रतिसरकारची स्थापना झाली. प्रतिसरकारच्या स्थापनेपूर्वीपासून राजूताई पाटील ऐतवडे बु।।. यासारख्या स्त्रिया स्वातंत्र्य चळवळीत काम करीत होत्या. प्रतिसरकारच्या मार्गदर्शनाखाली भूमिगतांनी १९४२ ची चळवळ चालू ठेवली होती. या कामात नागनाथ आण्णांनी जी कामगिरी बजावली होती. त्याच नागनाथ आण्णांच्या आई क्रांतिमाता लक्ष्मीबाईंनी मोलाचे सहकार्य केले होते. ग्रामीण भागात प्रतिसरकारचे कार्य सुरू होते. प्रत्येक गावात, खेडयात क्रांतीकारकांबरोबर स्त्रियांचा प्रत्यक्ष सहभाग होता. राजमती पाटील, लीला पाटील-कुंडल गट यांनी ग्रामीण भागात जाऊन मुक्ताबाई साठे, लक्ष्मीबाई पाटील, इंदुमती पाटील, सुभद्राबाई सावंत, इंदिराबाई देशपांडे इ. स्त्रियांच्या सहाय्याने प्रतिसरकारमधील सहभाग वाढविला. रामानंद भारती यांच्या नेतृत्वाखलीदेखील या स्त्रियांनी कार्य केले. क्रांतिवीरांगना लक्ष्मीबाई नायकवडी यांनी क्रांतिवीर नागनाथ आण्णा यांना प्रतिसरकारच्या प्रत्येक कार्यात नेहमीच साथ व संस्कार दिले. म्हणूनच प्रतिसरकाचा हा छावा क्रांतिवीर नागनाथ आण्णाचे कार्य सिध्दीस गेले. इंदुमती पाटणकर या महाराष्ट्रातील कासेगाव येथील ग्रामीण भागात राहणार्‍या स्वातंत्र्यसैनिक आणि दीर्घकाळ ज्येष्ठ कार्यकर्त्या होत्या. इंदुताईंचे वडील दिनकरराव निकम १९३० पासून स्वातंत्र्य चळवळीत होते आणि सत्याग्रहासाठी तुरुंगात असताना ते कम्युनिस्ट झाले आणि भाई व्ही. डी. सारख्या कम्युनिस्ट नेत्यांना भेटले. इंदुताईंनी गावातील काँग्रेसच्या मिरवणुकांमध्ये भाग घेतला. पुढे ती राष्ट्रसेवा दलात जाऊ लागली. १९४२ मध्ये, इंदुताईंनी वयाच्या १६ व्या वर्षी आपले आई-वडिलांचे घर सोडले आणि १९४२ च्या ब्रिटिश राजवटीविरुद्धच्या स्वातंत्र्य चळवळीत सामील झाल्या. महिलांना संघटित केले आणि राष्ट्र सेवा दलाचा प्रचार व प्रसार केला. तिने हळूहळू १९४३ पर्यंत प्रतिसरकारच्या भूमिगत चळवळीत भाग घेण्यास सुरुवात केली आणि लढवय्यांकडे शस्त्रे नेली. त्यांनी आपले घर सोडले, गावोगावी जाऊन पूर्ण टाइमर म्हणून काम केले. बंदुका किंवा इतर शस्त्रे घेऊन, गरज पडल्यास पोलिसांचा सामना करण्यामध्ये इंदूताईंची भूमिका महत्वाची होती. लिलाबाईं माळवदे यांचा जन्म ३०जुलै १९२० ला मिरजेच्या विनायक आणि आंबुताई पिसे यांच्या पोटी झाला. लहान वयातच वयाच्या तेराव्या वर्षी त्यांचा विवाह १९३३ मध्ये कोल्हापूर संस्थानातील रेंदाळच्या पितांबर माळवदेशी झाला. त्यांच्या घरी आचार्य भागवत, बाबासो खंजिरे, भाई माधवराव बागल अशा चळवळीतील नेत्याचे येणे जाणे असे. पितांबर माळवदे ही शालेय जीवनापासून गांधी चळवळीकडे आकृष्ट झाले होते. या राजकीय वातावरणाचा परिणाम सौ. लिलाबाई यांच्यावरही झाला. १९३९ मध्ये कोल्हापूर संस्थानात प्रजा परिषद चळवळ सुरु झाली. पितांबर माळवदे या चळवळीशी जोडले गेले. पोलिसांनी कोल्हापूर संस्थान प्रजा परिषद बेकायदा ठरवून संबंधित कार्यकर्त्यांची धरपकड केली. त्यावेळी ४ एप्रिल १९३९ मध्ये पितांबर माळवदेंनांही पकडले. जयसिंगपूर कोर्टात यासंबंधी केस चालली. त्यांना सहा महिने सक्त मजुरी आणि २०० रुपये दंडाची शिक्षा झाली. १९४२ मध्ये चलेजाव आंदोलन वेगाने साऱ्या भारतभर पसरले. इकडे पितांबर माळवदेंचे स्वातंत्र्य चळवळीत भाग घेणे सुरु होतेच. पितांबर माळवदेंनी कोल्हापूरला काही सहकाऱ्यासमवेत रेसिडेन्सी बंगल्यावर मोर्चा काढला. बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांची नजर चुकवत तिथे तिरंगा फडकविला. त्यांना परत कैदेत टाकले गेले. पितांबर माळवदेंच्या गुप्त निरोपानुसार लिलाबाईनी काही स्त्री पुरुषांना मोर्चासाठी तयार केले आणि सहकाऱ्या समवेत कोल्हापुरातील रेसिडेन्सी बंगल्यावर मोर्चा काढला. लिलाबाईबरोबर असलेल्या रामचंद्र गिरीबुवा, दत्तात्रय विभुते, लक्ष्मण कदम यांना पोलिसांनी लॉरीत चढविले. लक्ष्मीपुरी पोलीस स्टेशनमध्ये आणून चौकशी करून आणि समज देऊन त्यांना सोडण्यात आले. १० ऑक्टोबर १९४२ रोजी कोल्हापुरात शिवाजी पुतळ्याच्या जागी त्यावेळी माजी गव्हर्नर लेस्ली विल्सन याचा पुतळा होता. या पुतळ्यावर आंदोलक स्त्रियांनी अॅसिडमिश्रित डांबर फेकून विद्रुप केला. यामध्ये भागीरथीबाई तांबट, जयाबाई हावीरे यांच्याबरोबर लिलाबाई माळवदे सहभागी झाल्या होत्या. याप्रकरणी लिलाबाईना सहा महिन्याची सक्त मजुरीची शिक्षा झाली. त्यांची मुले लहान असल्याने कोर्टाची माफी मागून सोडण्याचा प्रस्ताव या महिलांपुढे ठेवला मात्र या स्वाभीमानी व स्वातंत्र्याच्या प्रेरणेने प्रेरित विचारामुळे त्यांनी कारावासात जाणे मान्य केले. १९४३ मध्ये लिलाबाई माळवदेनी कोल्हापुरात पुन्हा एकदा पिकेटिंग केले. यावेळी पोलिसांनी त्यांना अटक करून कोल्हापूरच्या सेंट्रल जेलमध्ये ठेवले. लिलाबाईना तीन महिने सक्तमजुरी व ५० रुपये दंड ठोठावला गेला. ब्रिटिश सत्तेला त्यांनी विरोध केलाच शिवाय समाजातल्या अपप्रवृतीनाही त्यांनी विरोध केला. रेंदाळ गावात दरवर्षी चैत्र शुद्ध नवमीला शेरअली यांचा मोठा उरूस भरत असे. या उरुसात मोठ्या प्रमाणावर दारूची विक्री होत असे हे थांबविण्याचा प्रयत्न लिलाबाईनी केला. दारू विक्रीच्या दुकानावर मोर्चा काढून दारू विक्री न करण्याचे आवाहन त्यांनी केले. या कृत्याने पोलिसांनी त्यांना हातकणंगले कोर्टासमोर उभा केले. मात्र कोर्टाने त्यांना निर्दोष सोडले. स्वातंत्र्योत्तर काळापर्यंत लिलाबाईंचे हे कार्य सुरु राहिले. स्वातंत्र्य लढ्यातील त्यांचे योगदानाबद्दल महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्याकडून त्यांना सन्मानपत्र प्रदान करण्यात आले तर स्वातंत्र्य दिनाच्या रौप्यमहोत्सवाच्या वेळी राज्याचे माजी गृह राज्यमंत्री रत्नाप्पा कुंभार यांच्या हस्ते ताम्रपट देण्यात आला. पुढे त्या स्थानिक राजकारणात व समाजकारणात सक्रिय राहिल्या. अशा कर्तुत्ववान स्त्रीचे २४ जुलै १९९१ मध्ये निधन झाले. भारतभर कोटयावधी देशबांधव स्वातंत्र्यलढयात उतरले. लाठीमार, गोळीबार, अटकसत्रांच्या बातम्या देशभर पसरल्या. सोलापूर यास अपवाद नव्हते. सोलापूरचे कस्तुरबाई दोशी यांच्याबरोबर राजमती पाटील, सुमतीबाई शहा या क्रांतिकार्यात सक्रिय बनल्या होत्या. सोलापूर शहरातील गंगुबाई किनरे यांना १९४२ च्या चले जाव आंदोलनात सहभागी झाल्याबद्दल अटक करून १०० रु. दंड आणि एक वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा थोठवण्यात आली. अखेर त्यांचा जेलमध्ये मृत्यू झाला. शहरातील स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतलेल्या स्त्रियांपैकी हौतात्म्य पत्करणार्‍या गंगूबाई किनरे ह्या सोलापूर जिल्ह्यातील ‘पहिल्या स्त्री हुतातम्या’ होत. 
 समारोप: 
उपरोक्त विवेचनावरून भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीतील दक्षिण महाराष्ट्रातील स्त्रियाचे योगदान अधोरेखित होते. ज्या काळात ब्रिटीश सरकारच्या विरोधातील वातावरणात स्त्रियांनी आवाज उठवणे, आंदोलन करणे, लिहिणे, सरकार विरोधी घोषणा देणे, क्रांतीकारकांना मदत करणे खरेच धाडसाचे होते, ऐतिहासिक होते. त्यांची ब्रिटीश सत्तेच्या विरोधी कृती पारतंत्र्य मुक्तीची होती असे म्हणता येईल.. 
  संदर्भ सूची: 
 १. माने रणजीत, (संपा)., भारतीय स्वातंत्र्य चळवळीत स्त्रियांचे योगदान, प्रकाशक-डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, पेठ वडगाव, २०१८ 
२. नदाफ हाजी, मुंबई इलाख्यातील स्त्रीमुक्ती व स्त्री अस्मितेचा अविष्कार: एकोणिसावे शतक, माने रणजीत, (संपा)., भारतीय स्वातंत्र्यलढ्यातीलत स्त्रियांचे योगदान, प्रकाशक-डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, पेठ वडगाव, २०१८ 
३. पाटील पद्मजा, इंदूमती नाईक: तेजस्वी स्वातंत्र्यसैनिक, मालती प्रकाशन, माणगांव,२००९, पृ. ६२-७२. 
४. पाटील पद्मजा, भारतीय स्वातंत्रलढयातील क्रांतिकारी महिला राजमती पाटील, महावीर जयंती स्मरणिका, छिंद्वाडा, मध्यप्रदेश, १९९५, पृ. १९ 
५. तांबट प्रभाकर, ‘क्रांतीच्या ज्वाळे’, मधुश्री प्रकाशन, पुणे, २०१० 
६. पाटील अवनीश, भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील स्त्रियांचे योगदान समजून घेताना, माने रणजीत, (संपा)., भारतीय स्वातंत्र्यलढ्यातीलत स्त्रियांचे योगदान, प्रकाशक-डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, पेठ वडगाव, २०१८ 
 ७. Mane Ranjit, (Ed) Contribution of Women in India's Struggle for Freedom, Principal, Dr.Babasaheb Ambedkar Mahavidyalaya, Peth Vadgaon, 2018 
८. कुंटे ग.ग., स्वातंत्र्यसैनिक चरित्रकोश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृतिक मंडळ, मुंबई 
९. https://en.bharatpedia.org.in/wiki/Indumati_Babuji_Patankar 
१०. http://www.posterwomen.org/Posterwomen/?p=5743 
११. News, Maharashtra (15 July 2017). "Indumati Patankar, freedom fighter dies at 91". Maharashtra Today. Retrieved 14 December 2019. 
१२. https://www.lokmat.com/sangli/great-contribution-women-sangli-district-freedom-movement-a697/ १३. Khole Supriya, Nadaf Haji (Ed), Local History and Cultural Identity in India, Dnyanjyo Publication, Kolhapur, 2019