Thursday, 24 October 2019

मुंबई इलाख्यातील स्त्रीमुक्ती व स्त्रीअस्मितेचा अविष्कार: एकोणिसावे शतक


मुंबई इलाख्यातील स्त्रीमुक्ती व स्त्रीअस्मितेचा अविष्कार: एकोणिसावे शतक : -   डॉ.हाजी नदाफ
‘स्व’ अस्मितेच्या शोधासाठी स्त्रीचा आजचा संघर्ष समजून घेण्यासाठी भूतकालीन इतिहासात जाऊन शोध घ्यावा लागतो. हे संघर्ष स्त्रीमुक्तीच्या नावाने ओळखले गेले नसले तरी आजच्या स्त्रीमुक्तीची बीजे १९ व्या शतकात दिसून येतात. या शतकात स्त्री शिक्षणाचे लोण पसरत गेल्यावर स्त्रियांनी शिकून केलेले स्त्रीसुधारणेचे कार्य महत्वपूर्ण ठरलेले दिसते. वसाहतीक काळखंडाच्या सुरुवातीस मुंबई इलाख्यातील सामाजिक परिस्थिती प्रवाहहीन झाली होती. मुंबई इलाखा भारतातील इतर प्रांताप्रमाणे जातीव्यवस्था, उच्च-नीचतेने ग्रासला होता. येथील जनता अंधश्रध्दा व परंपरा रूढीनी जखडलेली होती. स्त्रियांची स्थिती फारच हलाखीची होती. विवाह, कुटुंब, संपत्ती, वारसाहक्क, विधवेचे स्थान असे अनेक मुद्दे स्त्रियांच्या विरोधात लादले गेले होते. या  शतकात स्त्रियांचे शिक्षण, विधवा पुनर्विवाह, बालविवाह, स्त्री हक्क हे प्रश्न अत्यंत गंभीर झाले होते. स्त्रियांच्या या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी काही ख्रिचन मिशनरी, पाश्चात्य शिक्षित ब्राह्मण, पारसी व बहुजन लोकांनी समाजातील वेगवेगळ्या स्तरातील स्त्रियांना शिक्षित करून जागृत करण्याचे प्रयत्न केले. या शिक्षित स्त्रीयानी मुंबई इलाख्यात वेगवेगळ्या क्षेत्रातील संघर्षाला वाचा फोडून स्त्रियांमध्ये ‘स्व’त्वाची जाणीव निर्माण केली. सदर लेखात या शतकातील स्त्रियांनी प्राप्त केलेल्या अस्मितेचा व त्यांच्या कार्यकर्तुत्वाचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला आहे
मुंबई इलाख्यात एकोणिसाव्या शतकात अनेक कर्तृत्ववान स्त्रिया होवून गेल्या त्यापैकी फारच थोड्या स्त्रियांची नोंद मिळते. कारण या शतकामध्ये बहुतांशी स्त्रिया समता, स्वातंत्र्य, न्याय व हक्कापासून वंचित होत्या. अशा परिस्थितीत उदारमतवादी वासाहतिक धोरण, मुंबई इलाख्यातील पाश्चिमात्य शिक्षण घेतलेल्या सुधारकांच्या सहकार्याने काही स्त्रिया शिक्षण घेऊ लागल्या. व अनेक स्त्रियांचा शिक्षित होण्याइतपत, स्त्रीविषयीच्या सुधारणा घडवण्यात, तर काहींची लेखनाद्वारे स्त्रिअस्मिता व्यक्त करण्यापर्यंत वाटचाल राहिली. हा काळ स्त्रियांच्या कार्याची नोंद ठेवण्याइतपत उदार नव्हता. पण काही शिक्षित स्त्रिया व उदारवादी पुरुषांनी या शतकातील स्त्रियांविषयी लेखन केले आहे. पण अनेक स्त्रियांच्या कर्तुत्वाची दखल न घेतल्याने त्या उपेक्षित राहिल्या. उपलब्ध संदर्भांच्या आधारे या शतकातील स्त्रियांच्या योगदानाचे महत्व पुढे विसाव्या शतकातील विचारवंतानी साहित्यरुपात सामान्यांपर्यंत पोहचविले. ह्या साहित्याच्या आधारे या विषयास अनेकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न आजपर्यंत सुरु आहे. कारण गतकाळातील समकालीन परिस्थितीने भविष्यकालीन महत्व गृहीत न धरल्याने त्याकाळातील स्त्रिविषयक इतिहास उपेक्षित राहिला. आज स्त्रिअस्मितेच्या इतिहासाची मांडणी केवळ बहुतांशी स्त्रीवादी लेखनपरंपरेतील साहित्यिकांनी केलेचे दिसून येते. म्हणून हवे इतके अभ्यास व लेखन, इतिहास लेखनपरंपरामध्ये झालेला दिसून येत नाही. प्रत्येक घटितांबद्दलची ऐतिहासिक मांडणी शास्त्रीय पद्धतीवर आधारित केली जाते. ती मांडणी न्यायीक तत्वावर, वैचारिक बैठक स्थिर ठेऊन करणे ही अपेक्षित असते. ती अपेक्षा असण्याइतपत हा लेख आहे असे गृहीत न धरणे उचित ठरेल. याविषयी लिहिताना वसाहतकालीन स्त्रीजीवनाचे ओझरते दर्शन होईल हा उद्देश ठेऊन मुंबई इलाख्यातील स्त्री अस्मितेविषयी मांडणी करण्यात आली आहे. सदर लेख लिहिण्यासाठी स्त्री अस्मिता, स्त्रियांविषयक सुधारणा व समाजसुधारणाविषयी ताराबाई शिंदे, गेल ऑम्व्हेट, विद्यूत भागवत, मृणाली जोगळेकर, नायर सुशीला, पवार उर्मिला, रोहिणी गवाणकार, के.एल. शर्मा, पाटील शोभा, शेखर बंद्योपाद्यय, बिपीन चंद्र विद्वानांच्या साहित्याचा आधार घेतला आहे. या लेखामध्ये स्त्री अस्तित्वहिंनतेची जाणीव, समाजसुधारणेतील प्रवाह, मुंबई इलाख्यातील स्त्री-मुक्ती आणि स्त्रीवादी विचार, मुंबई इलाख्यातील स्त्रीविषयक समाजसुधारणा व स्त्रीविषयक सुधारणेचे परिणाम ह्या मुद्द्यांवर सविस्तर विवेचन करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
स्त्री-अस्तित्वहिनतेची जाणीव
एकोणिसाव्या शतकाचे प्रारंभ हे प्रबोधनाचे प्रथम चरण मानले जाते. प्राचीन काळापासून महाराष्ट्राचा इतिहास पाहता स्त्रियांचे स्थान नेहमीच दुय्यम राहिले. मध्ययुगीन सरंजामशाहीच्या कालखंडात हे स्थान आणखीनच खालावले, तरीही जेव्हा जेव्हा संधी मिळेल व गरज लागेल तेव्हा स्त्रियांनी राज्यकारभारात उत्तम प्रशासिक व रणागणांत वीरांगणांची भूमिका समर्थपणे पार पाडल्याचे दिसून येते. सरंजामशाही युगातल्या शेकडो वर्षाच्या सामाजिक शोषणाच्या व अन्याय अवहेलनेच्या अभेद्य भिंतीच्या आड मुंबई इलाख्यातले स्त्री जीवन कोंडून पडले होते. १८ व्या शतकाच्या अंतिम चरणात मुंबई इलाख्यात ब्रिटिश शासन स्थापित झाले. या वासाहतिक काळात इंग्रजी शिक्षणातून विवेकनिष्ठा, उत्क्रांतिवाद आणि उपयुक्तता या विचारंशी मध्यमवर्गाचा परिचय झाला. मानवहितवादी विचारसरणीतून व सामाजिक गरजेतून सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न त्यांनी सुरु केला. १९ व्या शतकातील समाजसुधारणेची जाणीव वेगवेगळ्या विचारदृष्टीने पुढे मार्गक्रमण होत गेली. एक सामान्य जनतेत राष्ट्रीय चेतनेचा प्रादुर्भाव. दुसरे म्हणजे हिंदू धर्माचा एक सहिष्णू आणि यथार्थरूपाने पुनर्जागरण, एकोणिसाव्या शतकात ख्रिश्चन धर्मामुळे हरवलेली प्रतिष्ठा पुनः स्थापित करणे. तिसरे बहुजन  समाजातील  स्त्रीया, अस्पृष्यता आणि पिडीत तथा दलित वर्गावरील अत्याचार व अमानवीयतेवर घाव. चौथे त्याग, सेवा, आणि तर्कबुद्धीवादाची भावना उत्पन्न करणे. पाचवे जाती प्रथेच्या वंशानुगत स्वरूप आणि कठोरतेवर प्रहार. सहावे संस्कृती आणि धर्मामध्ये समानता, देशीयकरण आणि सह-अस्तित्वाची भावना उत्पन्न करणे.   
बंगालमध्ये सामाजसूधारणावादी मोहिमेची सर्वात प्रथम सुरुवात झाली. त्यानंतर मुंबई इलाखा, मद्रासमध्ये होत ते भारतभर पोहचली. प्रादेशिक स्त्रीचळवळ त्या प्रदेशाची जीवनपद्धती, त्याचा इतिहास, त्याची भौगोलिक परिस्थिती, त्या काळातील तेथील विशिष्ठ व्यक्तिमत्वे याचा परिणाम त्या चळवळीच्या जडणघडणीवर  झालेला दिसतो. स्थानिक आणि प्रादेशिक पातळीवर सुधारणावादी सामाजिक संस्था व संघटनांनी समाजातील जातीव्यवस्था, अनेकेश्वरवाद, मुर्तीपूजा, बालविवाह, सती, विधवा-पुनर्विवाह अशा अनेक चालीरीतिंविरूद्ध लढा देण्याचे कार्य केले. स्त्री-प्रश्नाकडे लक्ष वेधलेल्या त्यावेळच्या सुधारकांना स्त्रियांचे समाजातील निम्नस्थान बदलण्यासाठी शिक्षण हे अत्यंत महत्वाचे साधन असल्याचे लक्षात आले. स्त्रीशिक्षण हे परंपरा व रूढी यांच्यात बसत नसल्यामुळे येथील स्त्रियांच्या शिक्षणाची तरतूद झालेली नव्हती. सुधारकांनी प्रारंभी ख्रिश्चन मिशनऱ्याच्या व नंतर खासगी शाळातून मुलींना पाठवून स्त्री-शिक्षण देण्याचे प्रयत्न केला.
१९ व्या शतकात स्त्री सुधारणांच्या प्रारंभकाळात देशातील इतर प्रदेशांच्या तुलनेने मुंबई इलाखा परिवर्तन स्वीकारण्यात पुढाकार घेतला. तत्कालीन समाजसुधारकांनी मुंबई इलाख्यातील स्रियांचे समाजिक प्रश्न सोडविण्यासाठी पेशवेकालीन सामाजिक अस्थिरता व स्त्री शोषण व्यवस्थेच्या वलयास बाजूला सारून वसाहतीक राज्यातील समाजसुधारणा, स्त्रीविषयक कायदे व स्त्रीशिक्षणाचा आधार घेतला. स्त्रीशिक्षण व स्त्रीसुधारणा या क्षेत्रात दूरगामी परिणाम घडवणाऱ्या व्यक्ती या प्रदेशात होऊन गेल्या. स्त्रीचळवळीच्या सुधारणेचे स्थूलमानाने काही कालखंड पडतात. पहिला कालखंड स्त्रीदास्य विमोचनाचा कालखंड दुसरा स्त्री जागृतीचा कालखंड (१८७० नंतर) आणि तिसरा स्त्रीस्वातंत्र्याचा कालखंड. इ.स.१८०० ते १९०० या शतकात मुंबई इलाख्यात स्त्री-प्रश्नाशी निगडीत सामाजिक सुधारणा चळवळ, जातीविरोधी चळवळ, भारतीय स्वातंत्र्यलढयातील स्त्रियांची चळवळ या चळवळी अस्तित्वात आल्या. यापैकी स्त्री चळवळ, स्त्रीअस्मितेची मांडणी प्रस्तुत लेखात करण्यात आली आहे.
समाजसुधारणेसंबंधी विचारप्रवाह व  वैचारिक केंद्रे
एकोणासाव्या शतकाच्या पहिल्या अर्धकात मुंबई व पुण्यातील शिक्षित मध्यमवर्गीय नेत्यांकडून विचार, कल्पना लोकांसमोर मांडण्यास सुरुवात झाली. हा इलाखा आधीपासून पाश्चिमात्य संस्कृतीशी संपर्कात असल्याने सामाजिक बदल व पुनर्स्थापना होण्यामध्ये वेगवेगळे विचारप्रवाह दिसून येतात. हे विचारप्रवाह विकसित होण्यामध्ये व्यक्ती व संस्थांनी महत्वाची भुमिका बजावली आहे. त्याची सुरुवात या शतकाच्या पूर्वार्धात झाल्याचे दृष्टीपथास येते. त्यातील एक महत्वाची बाब म्हणजे इ.स. १८०४ साली मुंबईत रॉयल एशियाटिक सोसायटीची स्थापना होय. या सोसायटीमध्ये मुंबईतील विद्वान मंडळी ज्ञान संपादन करण्यासाठी एकत्र येत असत. सोसायटीच्या वृद्धीबरोबर येथे मुंबई व पुण्यातील विद्वानांना एकत्र येण्याची संधी मिळाली. इ.स.१८३६ मध्ये बाळशास्त्री जांभेकरांनी सोसायटीचे सभासद होण्यास बॉम्बे दर्पण मध्ये आव्हान केले. यामुळे पुढील काळात येथे येणाऱ्या लोकांची संख्या वाढत गेली. पुढे इ.स. १८५४ मध्ये मुंबईत एलफिन्स्टन कॉलेजची स्थापना झाल्याने येथे अनेक विद्वान मंडळीनी शिक्षणाबरोबर वैचारिक देवाणघेवाण करू लागले. या मंडळीमध्ये दादोबा पांडुरंग तर्खडकर, भास्कर तर्खडकर, रामकृष्ण विश्वनाथ, भाऊ महाजन अशा अनेक समाजसुधारकांचा समावेश होता. येथे शिकलेल्या मंडळीनी नंतरच्या काळात मुंबई प्रांतातील वेगवेगळ्या भागामध्ये समाजकार्याची सुरुवात केली. याचेच एक फलित म्हणजे  डेक्कन व फर्ग्युसन कॉलेजची स्थापना होय. पुण्यातील भांडारकर, आगरकर, गोखले, रानडे या उच्चशिक्षित मंडळीनी या संस्थेची स्थापना करून यास वैचारिक केंद्र बनवले. मुंबई व पुण्यातील या शैक्षणिक संस्थांनी समाजसुधारणा कार्यात अत्यंत महत्वाची भूमिका बजावली आहे.
१९ व्या शतकातील सुधारणा कार्यामध्ये प्रामुख्याने तीन प्रवाह आढळून येतात. हे तीनही प्रवाह जरी भिन्न असले तरी त्यांचे अंतिम ध्येय मात्र समाजसुधारणा घडवून आणणे हेच होते. त्यापैकी ‘मेथ्यु लीडर्ले’ यांनी Philosophical Trends In Modern Maharashtraया ग्रंथात सामाजिक सुधारणा चळवळीचे तीन विचार प्रवाह स्पष्ट केलेले आहेत. ते म्हणतात, या काळात समाजसुधारणेची चळवळ दोन प्रवाहांनी पुढे एकमेकांशी समांतर वाटचाल करीत होत्या. एक, चळवळ उदारमतवादी सुधारणांची होती. पहिल्या गटातील सानाजसुधारकांना लोकजागृती बरोबरच कायद्याचे सहाय्य घेणे हितकारक व आवश्यक वाटत होते. सतीप्रथेविरुद्ध सातत्याने केलेला प्रसार आणि सातीबंदीला दिलेला पाठींबा किंवा विधवा विवाहाच्या समर्थनार्थ केलेले लिखाण आणि त्या कायद्याचा केलेला पाठपुरावा ही उदाहरणे बोलकी आहेत. लोकजागृतीसाठी सामुहिक संघटीत कार्याची गरज त्यांना जाणवल्यामुळे समाजसुधारकांनी अनेक संस्थाही स्थापन केल्या. अशा रीतीने समाजसुधारणेच्या हेतूने संस्थात्मक कार्याचा प्रारंभ या पहिल्या प्रवाहाने केला.
दुसरा प्रवाह कदाचित ब्रिटिश राजवटीने निर्माण केलेल्या वर्चस्वामुळे थोडीशी स्थितीवादी (जैसे थे) होती. या प्रवाहात अनेकांना प्रस्थापित समाजव्यवस्था टिकविली पाहिजे असे वाटत होते. या प्रवाहातील लोकांचा सुधारणात्मक धोरणांना विरोध झाल्याचेही दिसून येतात. समाजसुधारणा चळवळीतील तिसरा प्रवाह याहून काहीसा भिन्न विचारसरणीचा होता. या गटाला भारतीय समाजाच्या सुधारणेची, त्यात अंगभूत असलेल्या उणीवा व दोष नष्ट करण्याची निकड जाणवली होती. त्यासाठी पाश्चात्य ज्ञानाचा प्रसार होणे आवश्यकही वाटत होते. या उदिष्टपूर्तीसाठी इंग्रजी भाषेतून पाश्चात्य विद्येचा अभ्यासही त्यांना आवश्यक वाटत होता. या प्रवाहात म.ज्योतिबा फुले, वि.रा.शिंदे, बाबा वलंगकर, शाहू महाराज यांचे महत्वाचे योगदान आहे. मागासवर्गातील लोकांमध्ये सुधारणा घडून आणणे हे यांची महत्वाचे उद्दिष्ट् होते. हा प्रवाह एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात जास्त प्रबळ बनत गेला. एकंदरीत या तीन प्रवाहानेच एकोणिसाव्या शतकातील समाजसुधारणेची वाटचाल राहिली आहे हे निदर्शनास येते.      


स्त्री-मुक्ती व स्त्रीवादी विचार
स्त्रीवाद ही एक मानवी संबंधाचा मुळापासून वेध घेणारी राजकीय विचारप्रणाली आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता, या मुल्यांवर आधारित नवसमाजनिर्मितीच्या आड येणारी शोषणाची कारणे शोधणे आणि स्त्रिअस्मितेचा पुरस्कार करणाऱ्या नव्या पर्यायांची मांडणी करणे हे स्त्रीवादाचे स्वरूप आहे. स्त्रीवादाची जाणीव ही एकच एक नसते तर इतिहासाच्या भिन्न भिन्न टप्प्यांवर, विविध परीक्षेत्रातून स्त्रीवादी भान निर्माण होते. उदारमतवादी, मार्क्सवादी, समाजवादी, आधुनिक, आधुनिकेत्तर अशा अनेक विचारप्रणालींमध्ये स्वत:च्या ‘स्व’ची भर घालून स्त्रीवादी जाणीवेचे भान स्त्री-पुरुष विषमतेच्या प्रश्नांची मीमांसा करते. म्हणूच काळाच्या प्रत्येक टप्प्यावर स्त्रीवादाची भिन्न रूपे दिसतात. स्त्रीच्या स्वातंत्र्यासाठी सुरु झालेली चळवळ गेल्या चार शतकांमधील आहे. पण स्त्रीचे परावलंबन मात्र फार पुरातन आहे. जगात ज्ञात इतिहासाच्या मागोव्यातून हे स्पष्ट होते की, स्त्रियांना पुरुषाइतकेच समान स्थान होते. जीवनाच्या विविध क्षेत्रात तिचा मुक्त संचार होता. पण ब्रिटिश काळापर्यंत स्त्रीला आपल्या स्वत्त्वाची जाणीव नव्हती. ब्रिटिशकाळात महाराष्ट्रातील समाजसुधारकांनी स्त्रीसुधारणा व स्त्री शिक्षण यांची मोहीम सुरु केल्याने स्त्रियामध्ये व्यक्ती-स्वातंत्र्य, समानता व बंधुता या विचाराचा पाया घातला गेला. स्त्रीसुधारणांच्या संदर्भात स्त्रीमुक्तीचेच विचार त्यांनी मांडलेले दिसून येतात. त्या काळात feminism चा पर्यायी शब्द प्रचलित नव्हता. तसेच पाश्च्यात्य स्त्रीवादही आपल्याकडे अनोळखी होता. ताराबाई शिंदे व पं.रमाबाई या विचारवंतानी प्रत्यक्ष कृती व संघर्ष करीतच विचारांची मांडणी केलेली आहे. त्यातूनच स्त्री-मुक्ती विचारांची पायाभरणी प्रारंभीच्या काळात झालेली दिसते.
स्त्रीवाद हा शब्द आपल्याकडे इ.स.१९७५ नंतर उपयोजिला जाऊ लागला. परंतु स्त्रीवादाची जाणीव ताराबाई शिंदे यांच्या ‘स्त्री-पुरुष तुलना’ मधून इ.स.१८८२ मध्येच प्रकट झालेली दिसून येते. त्यामुळे भारतात स्त्रीवादाच्या मांडणीला ज्यांनी आपापल्या परीने प्रारंभ केला. त्यात सर्वप्रथम ताराबाई यांचे नाव घ्यावे लागेल. विजयालक्ष्मी नावाच्या गुजराती ब्राह्मण स्त्रीने केलेल्या भ्रूणहत्येसाठी सरकारने तिच्यावर खटला भरला होता आणि वृत्तपत्रांनी तिला व तिच्या निमित्ताने स्त्रीजातीला जी दुषणे दिली होती, त्याचा प्रतिवाद करण्यासाठी ताराबाईनी ‘स्त्री-पुरुष तुलना’ हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथामध्ये ताराबाईने विवाहित स्त्रीकडून केल्या जाणाऱ्या पतिव्रत्याच्या अपेक्षा, विधवा स्त्रीकडून केल्या जाणाऱ्या कठोर निर्बंधयुक्त आचरणाच्या अपेक्षा, पुरुषी नीतिमूल्यांचा दुटप्पीपणा, स्त्री-पुरुष विषमता व दुहेरी नैतिकमूल्य यांची चर्चा करताना ताराबाईनी स्त्रियांच्या परवशतेला पुरुषनिर्मित मूल्यव्यवस्थाच कशी जबाबदार आहे, याचा ऊहापोह अत्यंत परखडपणे केला आहे. ताराबाईचा विशेष म्हणजे रामायण-महाभारतासारख्या आर्ष महाकाव्यांपासून समकालीन मुक्तामाला, मंजूघोषा या कादंबऱ्या, मनोरमासारखे नाटक व पुणेवैभव वृत्तपत्रात स्त्रीप्रतिमा स्पष्ट करून स्त्रियांच्या दयनीय परिस्थितीला कारणीभूत असलेली पुरुषी मूल्यव्यवस्था स्पष्ट केली आहे. या निबंधाच्या विषयी स्त्रीवादी अभ्यासक डॉ.विद्युत भागवत ‘महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासाच्या दिशेने’ याग्रंथात अधोरेखित करतात, हा निबंध एका बाईने हिरीरीने बायकांच्या जातीची कड घेऊन पुरुषांविरुद्ध लिहिला, म्हणूनच केवळ महत्वाचा आहे असे मुळीच नाही. खरे तर ताराबाईने तत्कालीन स्त्रीजातीवर होणाऱ्या अन्याय-अत्याचारांवर फक्त ताशेरे झोडले असते किंवा स्त्रीजातीविषयी तत्कालीन समाजात फक्त सुरुंग लावण्याचा बेत केला असता तरी त्या काळी ते धाडसाचे कृत्य झाले असते. पण ताराबाईचा प्रकल्प त्यापेक्षा व्यापक आहे. बाईचे आयुष्य जगताना एक व्यक्ती म्हणून तत्कालीन स्त्री-पुरुष्यांच्या आयुष्याचे सखोल चिंतन आणि निरीक्षण करून जुन्या नव्या साहित्याचा अभ्यास करून एक खणखणीत प्रतिकार किंवा निषेध नोंदविण्याचे काम या निबंधाने केले आहे.
पं.रमाबाई यांनी स्त्री-मुक्ती हेच आपले जीवितकार्य ठरवून आपले जीवन समर्पित केले होते. पं.रमाबाईनी स्वजीवनात ब्राह्मणधर्म आणि परंपारिकता यांच्या विरोधात सतत बंडखोरी दाखवलेली दिसते. वेदविद्या व शास्त्रांचा अधिकार मिळवून पंडिता पदवी प्राप्त केली. एका बंगाली तरुणाशी आंतरजातीय विवाह केला, पतिनिधनानंतर केशवपन नाकारले व  ख्रिस्ती धर्माचा स्वीकार करून वैयक्तिक जीवनात पारंपरिकतेच्या विरोधात बंड करणारी स्त्री अशी त्यांची स्वतंत्र वाटचाल दिसते. रमाबाईने बालविवाहबंदी व संमतीवयाच्या कायद्यासाठी आवाज उठवला, स्त्रियांना वैद्यकीय तसेच व्यावसायिक शिक्षणाचा पुरस्कार, तसेच असहाय्य, विधवा व पतीत स्त्रियांना आधार देऊन त्यांना माणुसकीची वागणूक देण्यासाठी आश्रम काढला. स्त्रियांनी राजकीय चळवळीत उतरले पाहिजे असे पं.रमाबाईना वाटत होते. त्यावेळी कॉंग्रेसच्या अधिवेशनात सामाजिक परिषद देखील भरत असे. मुंबईत भरलेल्या कॉंग्रेसच्या पाचव्या अधिवेशनात नऊ स्त्री प्रतिनिधींना त्यांनी प्रवेश मिळवून दाखवला होता. तेथे झालेल्या सामाजिक परिषदेत पं.रमाबाईनी केशवपनाच्या बंदीच्या ठरावावर हृदयस्पर्शी भाषणात पुरुषांच्या पाशवीवृत्तीवर हल्ला चढवून व अत्यंत भेदक सवाल टाकून पुरुषांच्या स्वातंत्र्याविषयीच्या आपमतलबी वृत्तीवर प्रकाश टाकला होता. स्त्रियांना नाकारलेले स्वातंत्र्य प्राप्त व्हावे, पुरुषांच्या सामानतेपर्यंत जाता यावे त्यासाठी स्वतः धडपडत होत्या हे दिसून येते. स्त्रीधर्मनीति या ग्रंथातून स्त्रीयांसाठी विद्येचे महत्व, गुणांची जोपासना, दुर्गुणांचा त्याग, घरी व दारी स्त्रियांनी कसे वागावे याविषयींचे मार्गदर्शन केले आहे. त्यातून पं.रमाबाईचे मुक्तीविषयीचे विचार लक्षात घेणे क्रमप्राप्त ठरते. स्त्री-पुरुष समानतेला महत्व देताना स्त्री-पुरुष यांच्यामधील गुणांच्या भेदावर भाष्य करताना स्त्रित्वचा पारंपरिकतेकडे वळताना दिसतात. पं.रमाबाईना तत्कालीन समाजात पारंपारिकतेचा पगडा खोलवर रूजलेला असल्याने त्या समकालीन स्त्रियांवर तत्कालीन समाजव्यवस्थेचा असलेला पगडा लवकर सुटणे कठीण असल्याने ते टप्प्या टप्प्याने बदल होणे अपेक्षित होते. म्हणून रमाबाईनी स्त्रियांच्या स्वविकासाला महत्व देतात.
स्त्री-शूद्रांच्या दास्याचा अंत करून त्यांना सन्मानाने व समतेचे जिणे जगता यावे, हेच ध्येय बाळगणाऱ्या म.जोतिबा फुल्यांनी पुरुषसत्ता व जातीभेद यांवर सतत प्रहार केले होते. स्त्रियांसाठी शाळा उघडणे, स्वजनरोष पत्करूनही स्वतःच्या पत्नीला साक्षर करून शिक्षिका बनवणे, विधवांचे केशवपन करणाऱ्या नापितांचा संप घडवून आणणे, फसवणुकीला व सक्तीला बळी पडून मातृत्व लादल्या गेलेल्या निराधार स्त्रियांसाठी प्रसूतिगृह उघडणे-अशी स्त्रियांविषयीची अत्यावश्यक तात्कालिक कार्ये तर केलीच शिवाय स्त्रीदास्याच्या कारणांचा शोध घेऊन परखडपणे त्यांना उघड केले आहे. स्त्रीशिक्षण, प्रौढविवाह, विधवापुनर्विवाह, स्त्रियांचे आर्थिक स्वावलंबन या स्त्रीमुक्तीसाठी आवश्यक मुद्यांनाही त्यांनी हात घातलेला दिसतो.
ब्राह्मणांचे कसब, गुलामगिरी, सार्वजनिक सत्यधर्म या ग्रंथातून स्त्री-शूद्रांच्या शोषणाचे मूळ त्यांच्या अज्ञानात धर्म व धर्मप्रणीत कल्पनांवर, धर्मग्रंथावर, वर्णव्यवस्थेवरील अतीव श्रद्धेत कसे आहे हे स्पष्ट केलेले दिसते. त्यावरील श्रद्धा कमी झाल्याशिवाय सम्यक समाजपरिवर्तन होणार किंवा शोषणमुक्त समाजनिर्मिती होऊ शकणार नाही, हे जाणल्यामुळे म.फुल्यांनी ब्राह्मणी धर्म, धर्मग्रंथ, धर्मकल्पना, समाजव्यवस्था, दैवदेवता, आत्मा, पुनर्जन्म, स्वर्ग-नरक, मोक्ष यांची तर्कशुद्ध चिकीत्सा केलेली दिसून येते. विषमतामूलक समाजव्यवस्था आणि पारंपारिक मुल्यांवर असलेल्या अंधश्रद्धेवर घाव घालून शुद्रातिशुद्र आणि स्त्रियांच्या अस्मितेचा शोध घेणारी म.फुल्यांची चिकित्सापद्धती होती, असे म्हणता येते. कुटुंब–धर्म-परंपरा या सगळ्यांनी स्त्रियांचे दृढ केलेले दास्य, सार्वजनिक जीवनात भाग घेण्याची तिला नसलेली मुभा, सर्वच मानवी पातळीवर त्यांचे अतिमर्यादित केलेले हक्क हे सर्व तर म. फुल्यांनी दाखवून दिलेच शिवाय स्त्री ही मूलतःदूष्ट, नीच व बंधनात ठेवण्यास योग्य असते’ वगैरेंसारखी सनातन पारंपारिकतेने बिंबवलेली तिची अभावात्मक मांडणी, त्यांनी नाकारली आहे. एकूणच समाजपरिवर्तनात म.फुल्यांनी स्त्री-मुक्तीला प्राधान्य दिले. एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभीच स्त्री-पुरुष समतेचा पुरस्कार ज्या अत्यंत तर्कशुद्धपणे व परखडपणे सातत्याने त्यांनी केला, त्यामुळे म.फुले म्हणजे स्त्रीमुक्तीचे आद्य प्रणेते आहेत असे म्हणणे चुक ठरणार नाही.
सामाजिक प्रथा व घटनात्मक सुधारणा
१९ व्या शतकात बालविवाह, जरठ-कुमारी अथवा जरठ-बाल विवाहाची प्रथा सर्व जातीत रूढ होती. लहान वयात मुलीचा विवाह झाला पाहिजे अशी धर्माची आज्ञा आहे, असा त्या काळात सर्वत्र समज होता. मुलगी १३-१४ वर्षाची होऊनही तिचे लग्न झाले नाही, तर मुलीचे आई वडील अस्वस्थ होत. शास्त्र–पुराणे व हिंदू समाजातील रूढी-परंपरा स्त्रियांबाबत जास्त कठोर आणि आग्रही आहेत. पुरुषांनी कोणत्या वर्षी लग्न करावे, याविषयी हिंदू धर्माच्या शास्त्र-पुराणांत कसलाही नियम नव्हता. साठीचे वृद्ध देखील नऊ-दहा वर्षाच्या मुलीशी लग्न करीत. अशा इच्छुक पुरुषांना मुलगी देणारे समाजात लोक मोठ्या प्रमाणात होते. रत्नागिरी तालुक्यात एका ब्राह्मण व्यक्तीस नऊ मुली होत्या. त्याने दहा वर्षाचे मुलीस रुपये दीडशे, अकरा वर्षाचीस दोनशे, व बारा वर्षाचीस तीनशे रुपये प्रमाणे दर ठरवून विकल्याचे उदाहरणही पहावयास मिळतात.  
विषम विवाहामुळे पुष्कळदा मुली अकाली विधवा होण्याचा धोका असे. विधवा स्त्रियांनी गुरुचरित्रात विधवांसाठी दिलेल्या नियमांचे पालन केले पाहिजे, अशी एकोणिसाव्या शतकात सर्वत्र समजूत होती. विधवांचे दर्शन हा अपशकून मानला जात असे. याचे कारण असे की पुरुषप्रधान समाजव्यवस्थेने स्त्रीला कायम चंचल मानले. आपल्या मृत्यूनंतर आपल्या पत्नीने दुसऱ्या कोणाशी लग्न करु नये, या स्वार्थी भावनेपोटी केशवपनाची चाल सुरु झाली. ब्राह्मण समाजात ही प्रथा मोठ्याप्रमाणात रूढ होती. बहुजन समाजात ही प्रथा मर्यादित प्रमाणात होती. विधवेचे दर्शन अशुभ मानल्यामुळे असे कोठेतरी कोंडून घेतल्याशिवाय तिला पर्याय नसायचा. सकेशा व विकेशा विधवा, पवित्र व अपवित्र विधवा अशा दोन प्रकारे विधवांची तुलना केली जात असे.
इ.स.१८१७ पासून मुंबई शहरात विधवाविवाहाच्या चळवळीला प्रारंभ झाला. गंगाधर शास्त्री फडके, जगन्नाथ शंकर शेठ व भाऊ दाजी लाड हे चळवळीचे प्रणेते मानले जातात. दर्पण, प्रभाकर, मुंबई अखबार  या वृत्तपत्रांत या विषयावर चर्चा होण्यास सुरुवात होऊन इंग्रजी अमलात स्त्रियांनी त्याच्या विरोधात आवाज उठविण्यास सुरुवात केली. १८३५ पासून हा गंभीर स्वरूपाचा सामाजिक प्रश्न आहे असे सर्वांना वाटू लागले. विधवा पुनर्विवाहाचा प्रश्न ब्राह्मण समाजामध्ये जास्त उग्र बनला. १८५७ पर्यंत विधवाविवाहाला फार मोठ्या प्रमाणात उत्तेजन मिळाले नाही. मात्र एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात यास गती मिळाली. सोलापूर, नगर व कोकण भागात या चळवळीला पाठिंबा मिळत गेला. सोलापूरच्या एका तरूण विधवेनी विधवाविवाहाला परवानगी देणारा कायदा होणार, याबद्दल तिने आनंद व्यक्त करून समाजाने आपल्याला एक चांगला पुरुष पती म्हणून सुचवावा, असे वृत्तपत्रात आवाहन केले होते. या कार्यास मानवधर्मसभा, परमहंस सभा, प्रार्थना समाज, सत्यशोधक समाज या संघटनांनी विधवा पुनर्विवाहाच्या चळवळीला उत्तेजन दिले. १८५० च्या सुरुवातीला इशाचंद्र विद्यासागरांनी, विधवा पुनर्विवाहावरील बंदी हटविण्याची मोहीम सुरु केली होती. ती न्या.रानडे, कृष्ण्शात्री चिपळूणकर, विष्णुशास्त्री पंडित, लोकहितवादी, डॉ.भांडारकर वगैरे सुधारकांनी व वृत्तपत्रांनी चांगलीच उचलून धरली. १८५६ मध्ये विधिमंडळात पुनर्विवाहाला मान्यता देण्याचा ठराव समंत झाला. बालविवाह व बहुपत्नीत्व या रुढीमुळे, वैधव्य पदरी पडलेल्या स्त्रियांची संख्याही सुधारकांच्या नजरेत भरली. केसरी-मराठा व शतपत्रे यातील लेखनातून या प्रश्नांवर विपुल लेखन होत होते. इ.स.१८५६ मध्ये पुनर्विवाह करणाऱ्या स्त्रियांच्या बाजूने एक महत्वाचा कायदा संमत झाला.
इ.स. १८८५ च्या सुमारास बेहराम मलबारी या पारशी गृहस्थांनी बालविवाह व सक्तीचे वैधव्य या विषयावर लेख प्रसिद्ध केला. त्यानंतर त्यांनी संमतीवयाची मोहीम हाती घेतली. विवाह या धार्मिक संस्कारात ढवळाढवळ न करण्याचा ब्रिटिश सरकाचा पवित्रा होता. त्याचवेळी मुंबई इलाख्यात रखमाबाई यांनी अज्ञान वयातील विवाह अमान्य असल्यामुळे त्या हायकोर्टात गेल्या होत्या. आगरकर, रानडे यांसारखे सुधारक त्यांचे पाठीराखे होते. तत्कालीन परिस्थितीच्या ज्वलंततेमुळे संमतीवयाचे बील शासनाला आणावे लागले व १८९१ साली संमतीवयाचा कायदा संमत झाला. कायद्याच्या आधारे स्त्रियांचे प्रश्न सोडविण्यावर सुधारकांनी भर दिल्यामुळे सुशिक्षित समाजाचे स्त्री-सुधारणा चळवळीकडे अधिक लक्ष वेधले.
मुंबई इलाख्यात खानदानी, श्रीमंत व प्रतिष्ठीत अशा उच्च ब्राह्मण, मराठा जातींत सती प्रथा बऱ्याच मोठ्या प्रमाणावर होती. ही प्रथा मध्ययुगीन मानसिकतेतून पुरुषप्रधान समाजव्यवस्थेने रूढ झालेली होती. पुष्कळदा सती जाण्यासाठी त्या विधवेवर सक्ती केली जात असे, तिला स्वर्ग मिळेल, मोक्ष मिळेल, पुण्य लागेल असे भूलथापा देऊन सती जाण्यासाठी प्रवृत्त केले जाई. तिच्या मृत्यूनंतर तिच्या स्मृत्यर्थ देवालये उभारली जात. इ.स.१८२९ मध्ये सती प्रथेला बंदी घालणारा कायदा इंग्रजांनी अंमलात आणला, पण मुंबई इलाख्यात इ.स.१८१८ पासूनच या दृष्टीने एलफीन्सटनने या विषयावर विचारविनिमय सुरु केला होता. पुण्यातील शास्त्री पंडितांबरोबर त्यासाठी चर्चा करण्यात आली होती. यामध्ये सती जाणाऱ्या स्त्रीवर सक्ती होऊ नये, चितेतून बाहेर आलेल्या स्त्रीला सक्ती करू नये, याठिकाणी व्यवस्थेसाठी पोलीस पहारा राहील असे ठरले. इ.स.१८२५ मध्ये एलफीन्सटनने सती प्रथेची पाहणी केली असता, पुण्यात सती जाणाऱ्या पैकी एक स्त्री मराठा व सर्व ब्राह्मण जातीच्या होत्या आणि इतर जातीतून एकही स्त्री सती गेल्याची नोंद नव्हती. या कालखंडात १८२१ ते १८२७ मुंबई प्रांताच्या मराठी प्रदेशात उत्तर कोकण, दक्षिण कोकण, खानदेश, पुणे, अहमदनगर, सोलापूर येथील सती जाणाऱ्या स्त्रियांच्या प्रमाणात दक्षिण कोकणात सती जाणाऱ्यांची संख्या अधिक होती.
स्त्री शिक्षण व शिक्षणाचा आग्रह, संमती वयाची कल्पना, सती पद्धत, विधवा विवाह, केशवपन निषेध, बालविवाहास विरोध इत्यादींचा पुरस्कार करीत या सुधारकांनी पथदर्शक कार्य केले. या कार्यात प्राय: पुरुष समाज सुधारक अग्रणी असले तरी स्त्रियांचे भरीव योगदान राहिले. सुधारकांनी स्त्रीशिक्षणासाठी प्रयत्न चालवले होते तरी खेड्यातून पसरलेला अफाट बहुजन समाज अत्यंत उदासीन होता. दारिद्र्य, अज्ञान, धार्मिक समजुती, रूढी, अंधश्रद्धा, बालविवाह पद्धत यांच्या प्राबल्यामुळे या समाजात स्त्रीशिक्षणाची हेळसांडच अधिक झाली. स्त्रियांना स्वावलंबी व अर्थनिर्भय बनविणारे शिक्षण देण्याइतकी प्रगमनशीलता आली नव्हती. परंतु स्त्रीविकासाची वाटचाल अत्यंत मंदगतीने का होईना सुरु झाली होती.
स्त्रीविषयक सुधारणा व स्त्रीअस्मिता
इ.स.१८१३ च्या चार्टर ॲक्ट नुसार ख्रिश्चन मिशनऱ्याना भारतात शिक्षणाचा प्रसार करण्याची परवानगी देण्यात आली. एकोणिसाव्या शतकाच्या पहिल्या दशकात अमेरिकन प्रोटेस्टंट (१८१३), इंग्लिश मेथोडीस्ट (१८१७), ॲग्लीकन चर्च मिशनरी (१८१९), स्कॉटीश मिशनरी (१८२३) व आयरीश प्रेसबेटेरीयन (१८४१) असे ब्रिटिश आणि अमेरिकन मिशनरी व त्यांचे अनुयायी मुंबईत येऊन शिक्षणाचे कार्य सुरु केले. जनसामान्यांबरोबर संपर्क वाढवण्यासाठी त्यांनी शाळा व महाविद्यालये सुरु केले. शिक्षणाचे मध्यम शहरी भागात इंग्रजी व ग्रामीण भागामध्ये मराठी ठेवले. इ.स.१८१५ मध्ये मुंबई येथे हिंदू मुलांसाठी अमेरिकन मिशनऱ्यानी शाळा सुरु केली. पश्चिमात्य पद्धतीवर आधारित ती पहिली शाळा होती. कोकणात बाणकोट आणि हर्णे येथे मुलामुलींसाठी त्यांनी शाळा उघडल्या. माउंट स्टुअर्ट एलफिन्सटन मुंबईचा गव्हर्नर होण्यापूर्वी ब्रिटिश मिशनऱ्यानी शिक्षणाच्या कार्याला सुरुवात केली होती. पण माउंट स्टुअर्ट एलफिन्सटनला पाश्चिमात्य शिक्षणाची सुरुवात अत्यंत सावधगिरीने करायची होती. त्यांनी १८२४ मध्ये मुंबईमध्ये पहिली मुलींची शाळा स्थापन केली, यामुळे स्त्रीशिक्षणाची सुरुवात झाली. १८२९ ते १८४० दरम्यान श्रीमती एम.विल्सन यांनी मुंबई इलाख्यात मुलींसाठी अनेक शाळा सुरु केल्या. त्याचबरोबर पुण्यामध्ये त्यांनी उच्चकुलीन मुलींसाठी पाच शाळा सुरु केल्या. या शाळांमध्ये स्त्रियांना शिक्षण देऊन त्यांच्या स्थितीमध्ये सुधारणा घडवून आणण्याचे प्रयत्न सुधारकांनी सुरु केले. ख्रिश्चन मिश्चनऱ्याच्या शाळेत मुलींना पाठवण्यातून समाजाचा ओढवणारा रोष त्यांच्या लक्षात आला होता. त्यामुळे त्यांनी खाजगी शिक्षण संस्था स्थापन करण्यास प्रारंभ केला. १८४९ मध्ये मुंबईत एल्फिन्स्टन कॉलेजमधील शिक्षित मंडळीनी मुलींसाठी खासगी शाळा सुरु करून शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली. मुंबई प्रांताच्या दख्खन प्रभागात ‘असोसिएशन ऑफ इंडिया यंगमेन’ या संघटनेतील शिक्षित तरुणांनी मुंबई व पुणे येथे स्त्रियांसाठी चळवळ सुरु केली. त्यांच्या या प्रयत्नांना एल्फिन्स्टन कॉलेजच्या प्राध्यापकांनीही मदत केली. याच उत्साही तरुणांनी पुढे स्टुडेंटस लिटररी ॲड सांयटीफिक सोसायटीची स्थापन केली. या सोसायटीने स्त्रियांच्या शिक्षणाचे महत्व लोकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला. या संस्थेमार्फत मुंबईत १८५२ पर्यंत एकूण चार शाळा स्थापन केल्या. अशाप्रकारे माध्यमिक शिक्षणाचा प्रसार होत गेला. मुलींच्या उच्च शिक्षणासाठी मुंबईतील एल्फिन्स्टन, विल्सन, सेंट झेविअर्स, पुण्याचे फर्ग्यूसन, डेक्कन तर सांगलीतील वेलिंग्डन महाविद्यालयात मुली शिक्षण घेऊ लागल्या. या महाविद्यालयात मुलींना पाठविण्यासाठी समाजसुधारकांनी अथक प्रयत्न केले. याची फलश्रुती म्हणजे या ज्ञान व्यवहारातून अनेक स्त्रीयांनी समाजात आपले अस्तित्व उभे करून स्त्री ह्क्क्साठी लढा दिला. १८८१ मध्ये बिपिन चंद्र पाल म्हणतात- मुंबई बंगालपेक्षा स्त्री शिक्षणाच्या सामाजिक व सांस्कृतिक स्तरावर स्त्रियांच्या बाबतीत फारच आघाडीवर आहे. एस.डी.जावडेकरांनी मुंबईतील इलाख्यातील स्त्रियांच्या स्थितीवर प्रभाकरमध्ये भाष्य करतात- पुणे आणि इतर अंतर्गत भागात अगदी शिकलेल्या सरदार व ब्राह्मण जातीतही अतिशय कर्मठपणा व अंधकार ओतप्रोत भरला होता. एकोणिसाव्या शतकाच्या उतरार्धात सरकारने स्त्रियांच्या शिक्षणासाठी जास्त लक्ष पुरविल्याने शिक्षणाचा प्रसार मोठ्याप्रमाणात होऊ लागला. इ.स.१८८२ मध्ये एज्युकेशन कमिशनने मुलींच्या शिक्षणाच्या संदर्भात सुधारणा करण्यास सुरुवात केली. शिक्षण विभाग एज्युकेशन कमिशन व जिल्हा लोकल बोर्डाकडे सुपूर्द केल्याने शिक्षण प्रसारात आणखीन भर पडत गेली. या एका शतकाच्या शैक्षणिक अवस्थेत ब्रिटिश व महाराष्ट्रातील समाजसुधारकांनी स्त्रीयांना शिक्षित करण्यामध्ये अत्यंत महत्वाची भूमिका बजावाल्याने वर्षानुवर्षे शिक्षणापासून वंचित असलेल्या स्त्रीवर्गाला शिक्षण मिळू लागले. त्याचबरोबर महाराष्ट्राच्या  सामाजिक व सांस्कृतिक अवस्थेतही बदल होत गेले. या बदलत्या परिस्थितीत येथील स्त्रीया व समाजसुधारकांनी स्त्री अस्मितेला न्याय देण्याचे अथक प्रयत्न केल्याने स्त्रियांमध्ये स्वअस्मितेची जाणीव होण्यास सुरुवात झाली असे म्हणता येईल.
बाळशास्त्री जांभेकर हे मुंबईतील प्रथम सुधारक होते की, ज्यांनी ब्राह्मणवादी कट्टरता व हिंदू प्रथांमध्ये बदल करण्याचा प्रयत्न केला. १८३२ मध्ये त्यांनी दर्पण व प्रभाकरमधून विधवा पुनर्विवाहाविषयी लेख व वृत्तांत प्रसिद्ध केले. त्यातूनच स्त्रीशिक्षण, विधवा विवाह, शुद्धीकरण इत्यादी सुधारणांचा पुरस्कार केला. दादाभाई नौरोजी  मुंबईतील दुसरे प्रमुख सुधारक होते. पारसी धर्मसुधार संघटनेच्या संस्थापकांपैकी एक होते. या संघटनेनी महिलांना कायद्याचे हक्क देऊ करण्यासाठी व उत्तराधिकारासंबंधी समान कायदा बनविण्यासाठी आंदोलन केले. लोकहितवादिंनी प्रभाकरमधील शतपत्रातून स्त्रीविषयक विविध विषयांना चालना दिली. यांनी मराठी भाषेत १८४८- १८५० यादरम्यान शतपत्रात एकूण १०४ लेख लिहून ब्राह्मण वर्गातील निष्टुर वृत्तीला विरोध केला. ते म्हणतात, ‘समाजातील ब्राह्मणांच्या वृत्तीमुळे लहान मूले व स्त्रियांना नर्कयातना भोगाव्या लागत आहेत जर कोणी त्यांना वाचवायचा प्रयत्न केला तर त्यास राक्षस संबोधण्यात येते. जगात कुठेही शिकलेली इतकी अमानुष माणसे भेटणार नाहीत’. लोकहितवादिना व्यक्तीस्वातंत्र्यावर विश्वास होता. त्यांनी सदैव स्त्री-पुरुष समानतेचा पुरस्कार केला. विधवांचा पुनर्विवाहास मान्यता व स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार सर्व समाजातील स्त्रियांना मिळाले पाहिजे असे त्यांना वाटत होते. विष्णुशास्त्री पंडितांनी इंदुप्रकाशमधून विधवाविवाहावर समर्थनपर लेख लिहिले. यांनी विधवा पुनर्विवाहासाठी पाठिंबा देऊन पुनर्विवाह घडवून आणले. मुंबईत बद्रुद्दिन तय्यबजी आणि बेगम जंजिरा यांनी मुस्लिम मुलींसाठी शाळा सुरु करण्यात पुढाकार घेतला होता. तर पुण्याला इब्राहीम जाफर यांनी स्थापिलेल्या ट्रस्ट च्या वतीने मुस्लिम मुलींसाठी शाळा सुरु करण्यात आली होती. यांच्या प्रयत्नाने मुंबई व पुणे येथे मुस्लिम स्त्रिया शिक्षण घेऊ लागले.
प्रार्थना समाजाचे एक सदस्य म.गो. रानडे यांनी इंदुप्रकाश या वृत्तपत्राच्या इंग्रजी आवृत्तीतून स्त्रीसुधारणेवर अनेक लेख लिहिले. त्यांनी १८६५ मध्ये विधवा विवाह उत्तेजक मंडळ स्थापन करून पुनर्विवाहाला पाठिंबा दिला, अनेक विधवा विवाह घडून आणले. या कारणास्तव त्यांना विरोध झाल्यामुळे त्यांनी स्मुर्ती व पुराणांच्या आधारावर विधवा विवाहास शास्त्राधार असल्याचे दाखवून दिले. संमती विवाहाच्या विधेयकासही त्यांनी पाठींबा दिला. त्यांचे सहकारी सदस्य आर.जी. भांडारकर, एन.जी. चंदावरकर, डॉ. आत्माराम पांडुरंग यांनीही स्त्री सुधारणा विषयी विचार मांडण्याचा प्रयत्न केला आहे. या सभेच्या आश्रयाखाली विधवा पुनर्विवाह घडवून आणले. या समाजाने १८८१ मध्ये पंढरपुर येथे एक अनाथाश्रम स्थापन केले. तसेच गर्भवती स्त्रियांसाठी एक दवाखाना सुरु केला. १८८२ पासून त्यांनी येथील स्त्रियांसाठी सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात सहकार्य केले.
 गोपाळ गणेश आगरकर यांनी सुधारक हे वर्तमानपत्र सुरु करून बुद्धीप्रामण्यवाद व व्यक्तीस्वातंत्र्य या दोन गोष्टींना प्राधान्य दिले. बदलत्या परिस्थितीनुसार समाजपरिवर्तनही  झाले पाहिजे असे त्यांचे मत होते. बालविवाह, विधवांची स्थिती यांचे गंभीर परिणाम त्यांनी स्पष्ट केले. सतीची चाल, संमती विवाह, घटस्फोट, पुनर्विवाह, सामान हक्क ,केशवपन, बालविवाह, इत्यादीविषयी सरकारने कायदे करावे असा त्यांचा आग्रह होता. विष्णुशास्त्री पंडित यांनी इंदुप्रकाश या वर्तमानपत्रातून स्त्री सुधारणेसंबंधी लेखन केले. त्यांनी पुनर्विवाह उत्तेजक मंडळ स्थापन करून या संस्थेमार्फत अनेक विधवांचे पुनर्विवाह घडून आणले. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनाही मुंबई इलाख्यातील स्त्रिशिक्षणाच्या प्रसाराचे श्रेय द्यायला हवे. कर्वे हे पुनर्विवाह व विधवा विवाहाचे पुरस्कर्ते होते. समाजातील बालविधवांचे दैन्य संपावे म्हणून इ.स.१८९३ साली ‘विधवा विवाह प्रतिबंधक निवारण मंडळाची’ स्थापना केली आणि पुनर्विवाहाचे मेळावे घेतले. बालविवाहास विरोध केला. इ.स.१८९९ मध्ये पुण्याच्या सदाशिव पेठेत अनाथ बालीकाश्रमाची स्थापना करून त्यांनी आपल्या कार्याला सुरुवात केली. भारतातील पहिले महिला विद्यापीठ त्यांनीच स्थापन केले. कर्वेनी ‘विधवा विवाह उत्तेजक मंडळ’ या नावाची संस्था स्थापन करून समाजातील विधवा स्त्रियांमध्ये जागृती निर्माण करण्याचे कार्य केले. स्वत: आनंदीबाई कर्वे या बालविधवेशी पुनर्विवाह केला. विधवा स्त्रियांसाठी शाळा, अनाथ बालिकाश्रम, विधवांसाठी आश्रमाची स्थापना, वसतिगृह असणारे महिला महाविद्यालय यांची पुण्यात निर्मिती करून स्त्रीशिक्षण कार्यासाठी कर्वेनी आपले जीवन वाहिले.
सामाजिक आणि धार्मिक कार्यात, स्त्री-पुरुष हे समान असायला हवे; केवळ लिंगानुसार माणसांमध्ये भेदभाव करणे हे पाप आहे. समाजामध्ये एकोपा नांदावा आणि एकमेकांविषयी बंधुत्व, समानता आणि स्वातंत्र्याची भावना निर्माण व्हावी असे म.फुलेंना वाटे. सर्व स्त्रीपुरुषांसाठी त्यांनी स्वातंत्र्याचा पुरस्कार केला. स्त्रियांना कमी दर्जाची वागणूक देणाऱ्या धर्माच्या चुका आणि त्रुटींवर टीका केली. फुलेंनी स्त्रीउद्धारासाठी इ.स.१८४८ साली पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा काढली. ही मुंबई इलाख्यामध्ये अस्पृश्य व मुलींसाठी पहिली शाळा होय. त्यांनी स्वत:च्या पत्नीला सावित्रीबाई फुल्यांना शिक्षिका म्हणून तयार केले होते. घरोघर पालकांना भेटून-मुलींना शाळेत पाठविण्याविषयी त्यांचे मनपरिवर्तन करण्याचे कार्यही त्यांनी केले. पुणे शहर परिसरात त्यांनी सुमारे वीस शाळा सुरु केल्या. अस्पृश्याप्रमाणेच स्त्रियांचा दर्जा उंचावण्याचा म.फुल्यांनी सातत्याने प्रयत्न चालविला होता. अडचणीत सापडलेल्या विधवांची बळांपणे करण्यासाठी बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली. विधवा केशवपनाचे संकट दूर करण्यासठी नापितांचा बहिष्कार, विधवा पुनर्विवाह परिषदेची स्थापना या पुरोगामी कार्याला तत्कालीन अत्यंत कडव्या सनातनी वातावरणात म.फुल्यांनी हात घालुन त्याची अंमलबजावणी केली होती. सनातनी हिंदूंचा रोष ओढवला-समाजाने वाळीत टाकले तरीही ज्योतीबांनी स्त्रीदास्य विमोचनाचे कार्य खंडित केले नव्हते. १८८० साली इंग्लंडमध्ये ज्या प्रकारे प्राथमिक शिक्षण सक्तीने व मोफत केले गेले, तसे आपल्याकडे करावेत ही हंटर कमिशनपुढे म.फुले यांनी केलेली विनंती सनातनी लोकांना मान्य नव्हती. जोतीबा आणि सावित्रीबाई या फुले दाम्पत्याने स्त्री शिक्षणाला प्राधान्य दिले आणि शुद्रातिशुद्रांच्या दास्याबरोबरच स्त्री दास्याचीही अत्यंत परखड मांडणी केली. सती आणि सता, सवत व सवता असा भेद मांडत थेट स्त्री-पुरुष विषमतेच्या प्रश्नाला हात घातला. यांनी विधवा विवाहाला पाठींबा देऊन बालहत्याप्रतिबंधक गृहाची स्थापना केली. या संस्थेमुळे संकटात असलेल्या विधवांना जीवनाचा मार्ग मिळाला. महात्मा ज्योतिबा फुले हे प्रथम भारतीय होते ज्यांनी आधुनिक भारताच्या इतिहासात अतिसामान्य माणसं आणि स्त्रियांसाठी प्रगतीचे, विकासाचे नवे दालन उघडले होते. धनंजय कीर म्हणतात-फुलेंची प्रमाणिकपणावर अखंड श्रद्धा होती, समाजासाठी आयुष्य वेचणारी आधुनिक भारतातील अशी ती पहिली व्यक्ती होती जी ‘माणुसकी, सत्य आणि समानता’ या सूत्रांवर त्यांचा भर होता. महाराष्ट्राच्या ह्या महान सामाजसुधारकांने भारताच्या इतिहासात एक सुवर्णपांन लिहिले आहे.
अस्पृशोद्धार हे आपल्या जीवनाचे ध्येय मानलेल्या याच परंपरेतील महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनीही स्त्रीपुरुषसमतेची मुल्ये जोपासत स्त्री शिक्षणाचा पुरस्कार केला. अज्ञानाविरूद्ध वैचारिक बंड करून जुन्या धार्मिक अनिष्ठ परंपरा नष्ठ करण्याचा प्रयत्न करून स्वातंत्र्य, समता व बंधुत्व या तत्वांचा अवलंब करून समाज जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी प्रार्थना समाजाच्या माध्यमातून सामाजिक कार्य करण्यास सुरुवात केली. बारामतीचे समाजसुधारक रामचंद्र आण्णाजी कळसकर हे महार, मांग, जातीतील लोकांसाठी खेडयात उद्योग शाळा स्थापन करून शिक्षण प्रसाराचे कार्य चालवित होते. यांच्याकडून शिंदेनी प्रेरणा घेऊन मागासवर्गीयांसाठी कार्य करण्याचे ध्येय निश्चित केले. यांनी समाजातील जातीभेद, अंधश्रद्धा, रूढी या अनिष्ठ प्रथेमुळे समाजात मोठी सामाजिक विषमता निर्माण झाली होती ती दूर करण्याचे कार्य केले. सामाजिक विषमता नष्ठ झाल्याशिवाय सामाजिक प्रगती होणार नाही. शिक्षण हा उत्तम उपाय आहे हे ओळखून शिंदे यांनी ‘डिप्रेस क्लास मिशन सोसायटी ऑफ इंडिया’ या संस्थेची स्थापना केली. शिंदेनी ‘अस्पृश्यांचे राजकारण’ या लेखनातून समाजजागृती निर्माण करण्यासाठी भारतीय अस्पृश्यतेचे मूळ शोधण्याचा प्रयत्न केला. अस्पृश्य एकेकाळचे वैभव भोगलेले राजे होते परंतु जेत्यांनी त्यांचा पराभव केल्यामुळे त्यांच्या वाटयाला अस्पृश्यता आलेली असावी असे याविषयी विचार व्यक्त करतात. १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात कोल्हापूरचे राजर्षी छ. शाहूनी आपल्या संस्थानात स्त्री शिक्षणासाठी प्रयत्न करून स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात कायदे केले. त्यांनी मुलींकरिता शाळा सुरु करून त्यांना मोफत शिक्षण देण्याची सोय केली. फुले, शिंदे, शाहू यांनी बहुजनसमाजातील स्त्रियांना उन्नतीचा, समतेचा मार्ग दाखवण्याचा प्रयत्न केला.
समाजात अंधश्रदधा व धार्मिकता येथे रूढ स्वरुपात प्रचलित होती. या परिस्थितीमध्ये बदल होण्यासाठी सामाजिक विचारामध्ये बदल होणे अपेक्षित होते. अशा अवस्थेमध्ये एकोणिसाव्या शतकात मुंबई इलाख्यातील बदलत्या सामाजिक परिस्थितीने प्रेरित होऊन येथील स्त्रियांनी स्त्रीजीवनाच्या चौकटी मोकळ्या करण्याचा प्रयत्न केला. इ.स.१८७० नंतर मुंबई इलाख्यात पंडिता रमाबाई, डॉ.आनंदीबाई जोशी, डॉ.रखमाबाई, ताराबाई शिंदे, रमाबाई रानडे, मिस सोराबजी, काशीताई कानिटकर अशा महिलांनी शाळा, महिलाश्रम, अनाथाश्रम अशा संस्था स्थापन करून कृतीशील संघर्ष केले. येथील स्त्रियांनी स्वत:च स्वत:चे प्रश्न उभे केले व ते सोडविण्यासाठी संघर्षही केला .
मुंबई इलाख्यातील सातारा जिल्ह्यात नायगाव येथे सावित्रीबाई व जोतीबा यांना त्यांच्या लग्नात झालेल्या अवहेलनेमुळे उच्चवर्णीयांचे वर्चस्व असलेल्या समाजाविरुद्ध बंडाची निशाण उभारण्याची आणि दलित वर्गाना सामाजिक प्रतिष्ठा मिळवून देण्याची शपथ त्यांनी घेतली. दारिद्र्य, अज्ञान व शिक्षणाचा अभाव यात सामाजिक विषमतेचे बीज रुजले आहे असे जोतिबांचे स्पष्ट मत बनले. शिक्षण हे व्यक्तीविकासाचे महत्वाचे साधन आहे अशी जोतीबांची धारणा होती. विधवांची दु:स्थिती आणि पुरुषवर्गाकडून होणारे स्त्रियांवरील अत्याचार जोतिबा व सावित्रीबाईंना असह्य होत. सावित्रीबाईना स्त्रियांची दयनीय स्थितीचे मूळ अज्ञान व अशिक्षितपणात दडले आहे असे प्रकर्षाने वाटू लागले आणि या जाणीवेतून अज्ञानाच्या काळोखात डांबलेल्या महिला शिक्षित करण्याचे प्रयोजन केले. महिलांना शिक्षित करण्याचे कार्य त्यांनी हाती घेतले. हे कार्य करत असताना त्यांना अनेक सामाजिक संकटांना सामोरे जावे लागले. पुरुषांचे वर्चस्व असलेल्या जगात कोणतीही चांगली गोष्ट साध्य करणे हे नेहमीच स्त्रियांपुढे मोठे आव्हान असते. पुरुषांच्या विरोधावर मात करूनच त्यांना आपले उद्दीष्ट साध्य करावे लागते, हा अनुभव सावित्रीबाईनाही आला. १८४८ हे वर्ष क्रांतिकारी वर्ष मानले जाते. ही ऐतिहासिक घटना याच मुंबई इलाख्यातील पुणे शहरात घडली. सनातनी वर्गाकडून होणाऱ्या विरोधाची पर्वा न करता सावित्रीबाई फुल्यांनी पुण्यात स्त्रियांसाठी पहिली शाळा उघडून सामाजिक क्रांतीची तुतारी फुंकली. या कार्याचा गौरव म्हणून ब्रिटिश सरकारकडून १८५२ मध्ये विश्रामबाग वाडयात त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. केवळ शैक्षणिक कार्यात सावित्रीबाईनी पतीला साथ दिली असे नाही, त्यांनी सुरु केलेल्या प्रत्येक सामाजिक लढयात त्या उत्साहाने सहभागी झाल्या. आपली भोगलालसा पुरवण्यास पुरुष स्त्रियांचा वापर करत आणि नंतर त्यांना वाऱ्यावर सोडून देत. अशा अडचणीत सापडलेल्या स्त्रियांना आश्रय देण्याचा निर्धार फुले दांपत्याने केला आणि ज्यांच्यावर असे गरोदरपण लादले गेले होते अशा महिलांच्या मदतीसाठी प्रसुतिकागृह सुरु केले असल्याच्या पाटया रस्तोरस्ती लावल्या. ह्या प्रसुतीकागृहाला त्यांनी ‘बालहत्या प्रतिबंधक गृह’ असे यथार्थ नाव दिले. यांचे पुढील पाऊल इतकेच क्रांतिकारी स्वरूपाचे होते की त्याकाळी अनेक बालजरठ विवाह घडवून आणले जात. पती वृद्ध किंवा रुग्णाईत असल्यामुळे विवाहित अल्पवयीन मुलीवर वैधव्याची कुऱ्हाड कोसळत असे. त्यावेळी त्यांचे केशवपन करून त्यांना व्रतस्थ जीवन जगण्याची सक्ती केली जाई. विधवांची ही दुर्गती पाहून सावित्रीबाई व्यथित होत. यावर एक अभिनव तोडगा म्हणून गावातील न्हाव्यांना संघटीत करून विधवांची डोकी भादरणार नाही असा निर्णय घेऊन अभूतपूर्व संप घडविला. उच्चवर्णीयांसाठी असलेल्या पिण्याच्या पाण्याला अस्पृश्यांनी स्पर्श करू नये असा दंडक उच्चवर्णीयांनी घालून दिला होता. या दांपत्यांनी आपल्या परिसरातील विहीर अस्पृश्यांना खुली करून दिली. या कारणांवरून जोतीबांना सावित्रीबाईंच्या भावाने या कृतीवर टीका करणारे पत्र लिहिले. सावित्रीबाई या पत्रास ठामपणे उत्तर देतात, जोतीबांच्या सर्व कार्याचा मला अभिमान आहे, तुम्ही टीका करण्याचे धाडस कसे करता ? तुम्ही कुत्री मांजरी प्रेमाने अंगाखांद्यावर घेता परंतु माणसाचा स्पर्श मात्र अपवित्र मानता हे कसे ? माझे पती सर्वांना समान मानतात म्हणून मी त्यांना महान समजते. जोतिबांच्या सर्वच उपक्रमात सावित्रीबाई त्यांच्या बरोबरीने काम करत. जोतिबांच्या मृत्युनंतर त्यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाचे कार्य हाती घेतले. ह्या संस्थेची धुरा त्यांनी अतिशय क्षमतेने सांभाळली. त्यांनी सार्वजनिक सभा घेतल्या, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. प्लेगग्रस्त लोकांना मदतीचा हात दिला. सावित्रीबाईंना सामाजकार्याबरोबरच वाचन व लेखनाची आवड होती. सावित्रीबाईंना कविता करण्याचा छंद होता. त्यांच्या कविता व इतर लेखन आजही सर्वांना प्रेरक ठरण्याजोगे आहे. त्यांचे दोन काव्यसंग्रह ‘काव्यफुले’ व ‘बावनकशी शुद्ध रत्नाकर’ हे अनुक्रमे नंतरच्या काळात १९३४ व १९८२ साली प्रकाशित झाले. त्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या. पहिल्या शिक्षणतज्ञ, पहिल्या कवियत्री आणि स्त्रीमुक्तीच्या आघाडीच्या पुरस्कर्त्या होत्या. सावित्रीबींनी ज्या अग्निदिव्यांचा सामना करावा लागला तसे घडले नसते तर आज भारतीय स्त्रियांना समाजात जे स्थान, जो दर्जा प्राप्त झाला आहे, तसा तो झाला नसता. म्हणूनच त्यांचे जीवनकार्य पथदर्शक होते असे म्हणणे समर्पक ठरते.
वासाहतीक काळात ब्राह्मणी व्यवस्थापक ज्ञानबंदविरोधात शूद्रातिशूद्र जाती-जमाती आणि सर्वजातीय स्त्रीयांसाठी शिक्षणप्रसाराचे क्रांतिकारी कार्य करताना फुले दाम्पत्याने केवळ शाळा स्थापन करून त्या चालविल्या नाहीत तर त्याद्वारे क्रांतिकारी भान असलेले विध्यार्थीही घडविले. १८४८ ते १८५५ पर्यंत त्यांनी सुरु केलेल्या महार मांगांच्या सर्वाधिक शाळा पुण्यातील महारवाड्यांमध्येच स्थापित केल्या होत्या. त्याकाळात नाना पेठ, भवानी पेठ, मंगळवार पेठ, वेताळ पेठ, जुना कसब्याचा पूर्व भाग बहुसंख्य दलित वस्त्यांचा परिसर होता. वेताळ पेठेतील शाळेत शिकलेली मुक्ता साळवे ही १४ वर्षीय मातंग समाजातील मुलगी त्या  काळात आपल्या शालेय जीवनात लिहिलेल्या आत्मकथनात्मक निबंधात जे मत व्यक्त करते ती जातीव्यवस्थाविरोधी स्त्रीमुक्तीचे आद्यपर्व आहे. ज्ञानोदय या नियतकालीकेमध्ये हा निबंध प्रकाशित करण्यात आले. या निबंधाची दखल त्यावेळी ब्रिटिशांनीही घेतले होते. एकोणिसाव्या शतकात स्त्रियांच्या लेखनाचा प्रारंभ मुक्ता साळवेंच्या निबंधापासून झाला असे म्हणता येईल. जातीव्यवस्था धर्म, समाजरचना अशा गुंतागुंतीच्या पैलूंविषयी परखड चिकित्सा केली. या निबंधात तीव्र वेदनाग्रस्ततेबरोबरच तितक्याच तीव्रतेची बंडखोरी प्रत्ययास येते. वासाहतिक काळातील दलित स्त्री-पुरुष्यांच्या जीवनव्यवहाराची माहिती देणारी अत्यंत मर्यादित व अपुरी संहिता असली तरी स्त्रीमुक्तीचा प्रश्न जातीव्यवस्थेशी अविभाज्यपणे जोडलेला आहे. हे एकोणिसाव्या शतकात पहिल्यांदा मांडणारा तो लेखी दस्तावेज आहे. डॉ.मा.गो.गवळी यांनी सन १९८० मध्ये प्रकाशित केलेल्या त्यांच्या क्रांतीज्योती सावित्रीबाई जोतीराव फुले या पुस्तकात सावित्रीबाई फुले यांच्या सहकारी फातिमा शेख यांचा आधुनिक भारतातील पहिली मुस्लिम शिक्षिका असा उल्लेख करतात. फातिमा शेख यांनी सावित्रीबाई बरोबर समाजातील मुलींना शिक्षण देण्याचे कार्य केले.
ज्योतिबा फुल्यांना अपेक्षित असणारे स्त्री उत्थानाचे कार्य पं.रमाबाईनी पुढे चालवलेले दिसते. १८८९ ला मुंबईत ‘शारदा सदन’ ही बालविधवांसाठी वसतिगृह स्थापन केली. ती संस्था पुढे पुण्यात आणल्याने येथील सनातन्यांच्या विरोधाला तोंड द्यावे लागले. पं.रमाबाई स्वतः स्वीकारलेले ख्रिश्चन धर्म व आश्रमातील बालविधवांचा ख्रिश्चन धर्माकडे ओढा यामुळे तत्कालीन पुनरुज्जीवनवादी वातावरणात झालेल्या लोकक्षोभामुळे पं.रमाबाईनी १९०० साली केडगावला मुक्तीसदन स्थापन केले. या संस्थेत हजारो अनाथ पतिता, परित्यक्ता, दुष्काळग्रस्त, विधवा, रुग्णाईत, शूद्रातिशूद्र स्त्रियांना आश्रय देण्याचे कार्य केले. निराधार स्त्रियांना आश्रय देणे व त्यांना स्वावलंबी करणे हे कार्य त्यांच्या संस्थेने चालविले होते. म्हणून शालेय शिक्षणाबरोबर स्त्रियांना सुतारकाम, लोहारकाम, चुना मळण, छपाईकाम, शिवणकाम, भरतकाम, परिचारिकेच्या कौशल्याबरोबरच अर्थार्जनासाठी उपयुक्त कौशल्ये शिकविण्यावरही कार्य केले. १८८२ मध्ये नेमलेल्या हंटर कमिशनला स्त्रीशिक्षणाची गरज, स्त्री- शिक्षकांची नेमणूक, स्त्रियांना वैद्यकीय महाविद्यालयातून प्रवेश मिळणे वगैरेंचा आग्रह रमाबाईनी धरला होता. रमाबाईंचे स्त्रीशिक्षण व स्त्रीमुक्तीच्या कार्यात महत्वाचे योगदान राहिले.
रमाबाई रानडे यांनी मा.गो.रानडे यांच्या पत्नी म्हणून समाजकार्याला प्रारंभ केला असला, तरी अप्लावधीतच ह्या क्षेत्रात त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. रमाबाईनी महिलांना स्वावलंबी व आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र करण्यावर आपली शक्ती केंद्रित केली. स्त्री-पुरुष समानता आणि सामाजिक न्यायाच्या क्षेत्रात त्या करू लागलेले काम, त्यांच्या पतीच्या कार्याला पूरक असेच होते. एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभीच्या पंचवीस वर्षात झालेल्या महिलांच्या प्रगतीचे श्रेय ज्या एकनिष्ठपणे कार्य करणाऱ्या स्त्रीपुरुष्यांना आहे, त्यात रमाबाईचे स्थान अग्रगण्य आहे. १८७८ मध्ये रमाबाईनी सार्वजनिक क्षेत्रात पहिल्यांदा सहभाग घेतला. १८८१ मध्ये मुंबईच्या पार्थना समाजात काम करु लागल्या. हे करत असतानाच मुंबईत Hindu ladies Social and literary Club स्थापन केला होता. या क्लबच्या माध्यमातून महिलांना भाषा, ज्ञान, सामान्य ज्ञान, शिवण व कलाकुसरीच्या वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी अनेक प्रशिक्षण वर्ग सुरु केले. त्याचबरोबर समाजातील स्त्रियांना इंग्रजी भाषेचे ज्ञान मिळावे या हेतूने शिक्षण देण्यासाठी प्रशिक्षण वर्ग सुरु केले. पुढे पुण्यात आर्य महिला समाजाच्या एका शाखेची स्थापना केली. या समाजामार्फत पुण्यामध्येही सामाजिक कार्य सुरू ठेवले. १८९३ ते १९०१ याकालावधीत रमाबाईनी आपल्या सामाजिक कार्यात लोकप्रीयतेचे शिखर गाठले. वि.रा. शिंदे यांची बहिण जनाक्का शिंदे यांनी स्पृश्य आणि अस्पृश्य स्त्रियांना एकत्रित आणण्याचा प्रयत्न  केला. त्यांनी निराश्रित स्त्रियांसाठी सेवासदन या संस्थेची स्थापना केली. या सदनाच्या सहकार्याने वृद्ध, अविवाहित, विधवा, अनाथ स्त्रियांना आधार देण्याचे कार्य जनाक्काबाईनी सातत्याने केले.
एकोणिसाव्या शतकातील स्त्रीप्रश्न, स्त्रिअस्मिता, स्त्री-पुरुष समानता, सामाजिक विषमता अशा अनेक विषयांना न्याय देण्याचे कार्य उपरोक्त स्त्री-पुरुष समाजसुधारकांनी केला आहे. या शतकाच्या उतरार्धात स्त्री-अस्मितेच्या जाणिवेची तीव्रता वृद्धींगत होत जाऊन महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय पैलूंवर परिणाम झाल्याचे दिसून येते. महाराष्ट्रामध्ये विसाव्या शतकाच्या सुरुवातीस शिक्षण संस्था, सेवाभावी संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था, राजकीय संघटना, स्त्री संघटना, कामगार चळवळी, स्वातंत्र्य चळवळ अशा अनेक अवस्थेमध्ये स्त्रियां सहभाग होण्याच्या प्रमाणात तीव्रतेने वाढ होत राहिले. व स्वातंत्र्यानंतरच्या काळात सर्वच क्षेत्रात स्त्रियांना टप्प्याटप्प्याने अधिकार मिळत गेले. आजच्या समकालीन परिप्रेक्षयातून ‘स्त्रिअस्मितेचा’ विचार करता असे दिसून येतो की, दोन शतकापूर्वीच्या स्त्री-पुरुष सुधारकांनी केलेल्या सामाजकार्याचे फलित आहे असे म्हणावे लागेल.    
सारांश
     मुंबई इलाख्यात एकोणिसाव्या शतकात खऱ्या अर्थाने शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, व आर्थिक क्षेत्रात स्त्रीचे व्यक्तिमत्व फुलू लागले. स्त्रीला आपल्या शक्तीची जाणीव होऊ लागली. स्त्रीशिक्षण व स्त्रीजागृतीचे कार्य करीत असलेल्या स्त्रीसंस्थाना एकत्र आणण्याचा प्रयत्न याच शतकात झाला. या शतकाच्या पूर्वार्धात सुरु झालेल्या वैचारिक क्रांतीमुळे मानवी जीवनाकडे पाहण्याचा नवाधुनिक दृष्टीकोण विकसित होत गेला. बुद्धीवाद, तर्कनिष्ठा, मानवतावाद या तत्वांनी आधुनिक  दृष्टीकोणाला आकार मिळाला. या आधुनिक दृष्टीकोनातून काही सुबुद्ध लोक प्रचलित समाजव्यवस्थेचे, अंगोपांगाचे जीवनपद्धतीचे तौलानिकदृष्ट्या परीक्षण करू लागले. असे करताना समाजातील काही घटकांवर होणारा अन्याय, जुलूम, विषमता यांच्या दृष्टीस पडली. या अनिष्टप्रवृत्ती व ह्या पद्धती  नष्ट करण्याचा व समाज निरोगी बनवण्याचा प्रयत्न केला. या त्यांच्या प्रयत्नातून सामाजिक सुधारणेच्या युगाचा प्रारंभ झाला. पितृसत्ताक पद्धतीच्या बंदिस्तपणामुळे सर्जनशीलता ही फक्त पुरुषांचीच मक्तेदारी होती. स्त्रियांना शिक्षित होण्याची मुभा नव्हती. त्यामुळे स्त्रियांच्या लेखनाला मर्यादा पडल्या होत्या. पूर्वी शिक्षणाची संधी न मिळाल्यामुळे त्यांच्यात निर्माण होऊ शकणारे विचार पुढे येण्यास विलंब लागले. सर्व समाजसुधारकांनी स्त्रीपुरुष समानतेसाठी फार मोठी मोहीम हाती घेतली. स्त्री शिक्षण, स्त्री सुधारणा, स्त्री-पुरुष समानता प्रस्थापित करण्याच्या कार्यात या सुधारकांचे फार मोठे योगदान राहिले. विविध संस्था-संघटना, जातीय संस्था, वर्गीय संस्था यांनी स्त्रियांचे प्रश्न हाती घेऊन स्त्रीसुधारणेचा प्रयत्न केल्या. या शतकात स्त्रीसुधारणा कार्यात सहभागी झालेल्या स्त्रीया, स्वातंत्र्यपूर्वकाळात राजकीय क्षेत्रात सहभागी झालेल्या स्त्रीया, साहित्यातून वैचारिक व सामाजिक प्रश्नांचे विश्लेषण करणाऱ्या स्त्रीया या सर्व ठिकाणी पुरुषसत्ताकतेच्या विरोधात स्वतंत्रपणे वाटचाल करताना स्त्रियांची स्व-अस्तीत्वाची जाणीव व्यक्त होताना दिसते. या स्त्रीवादाच्या खुणाच आहेत, असे आपण म्हणू शकतो. सामाजिक सुधारणेच्या चळवळीत उदारमतवादी स्त्रीवादाची बीजे होती, पण हिंदू पुनुरुज्जीवनवादाने भरलेल्या सनातनी सुधारणावादाने त्यावर मात केली. या शतकात झालेला स्त्री सुधारणेचा प्रयत्न मात्र केवळ भूतदयावादी होता. स्त्रीला एक स्वायत्त व्यक्ती म्हणून मान्यता देण्यास तो अपुरा पडला. असे असले तरी एकोणिसाव्या शतकाने महाराष्ट्राला स्त्रीप्रश्नाकडे बघण्याची जी वैचारिक प्रगल्बता दिली, ती पुढे स्वातंत्र्योत्तर काळात दिशादर्शक ठरली.
संदर्भ सूची
ऑम्व्हेट गेल, (१९९०), जोतीबा फुले आणि स्त्रीमुक्तीचा विचार, लोकवाङ्मयगृह, पुणे
बंद्योपाध्याय शेखर (२००८), पलासी से विभाजन तक और उसके बाद, आधुनिक भरतका इतिहास, ओरीयंट ब्लैकस्वान,  दिल्ली.
चंद्र बिपीन, (२००८), आधुनिक भरतका इतिहास, ओरीयंट ब्लैकस्वान,  दिल्ली.
भागवत विद्यूत, (१९९७), महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासाच्या दिशेने, स्त्री अभ्यास केंद्र, पुणे विद्यापीठ, पुणे
भागवत कमल, (१९८५), स्त्री चळवळीची वाटचाल, प्रागतिक पुस्तक प्रकाशन, पुणे
भागवत विद्युत, (२००४), स्त्री-प्रश्नाची वाटचाल, प्रतिमा प्रकाशन, पुणे
गवळी पी.ए., (२००५), पेशवेकालीन गुलामगिरी व अस्पृश्यता, प्रियदर्शी प्रकाशन, कोल्हापूर
गवाणकार रोहिणी, मराठी स्त्रीशक्तीचे राजकारणी रूप, आदित्य प्रकाश, एम.फील अप्रकाशित शोधप्रबंध, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर
गरुड सचिन, (२०१३), मुक्ता साळवे, फातिमा शेख आणि लहूजी वस्ताद (प्रतिके व समकालीन सांस्कृतिक राजकारण ), नाग नालंदा प्रकाशन, इस्लामपूर
घोडके ह.म., (२०००), महाराष्ट्र्गाथा, राजहंस प्रकाशन, पुणे
जोगळेकर मृणाली. (१९९१), स्त्री अस्मितेचा अविष्कार, भाग- १,२,३. पॉप्युलर प्रकाशन, मुंबई
नायर सुशीला, माणकेकर कमला (संपा), (२०१३), शांता कोठेकर (अनुवाद), भारतीय प्रबोधनाच्या महिला प्रणेत्या, नेशनल बुक ट्रस्ट, नवी दिल्ली
पाटील शोभा, (२००७), स्त्रीवादी विचार आणि समीक्षेचा मागोवा, स्नेहवर्धन प्रकाशन, पुणे
पवार उर्मिला, मीनाक्षी मून, (२०००), आम्हीही इतिहास घडविला, सुगावा प्रकाशन, पुणे
रानडे मो.गो., (१९७१), महाराष्ट्रातील समाजविचार १८१८-१८७८, सुविचार प्रकाशन, नागपूर
शर्मा के.एल., (२००६), भारतीय सामाजिक संरचना एवं परिवर्तन, रावत प्रकाशन, जयपूर